बुद्धिमत्ता, भाषाकौशल्याला खुणावणारा जपान

श्रीकांत अत्रे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जपानमधील दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ आणि वाढत जाणारा जपानी नागरिकांचा वयोगट, यामुळे भारतासारख्या ‘तरुण’ देशातील तरुणांना तेथे मोठी संधी आहे. मात्र, या संधीला बुद्धिमत्तेची जोड आवश्‍यक आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास तरुणांना जपानसारखी दुसरी संधी नाही.

जपानमधील दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ आणि वाढत जाणारा जपानी नागरिकांचा वयोगट, यामुळे भारतासारख्या ‘तरुण’ देशातील तरुणांना तेथे मोठी संधी आहे. मात्र, या संधीला बुद्धिमत्तेची जोड आवश्‍यक आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास तरुणांना जपानसारखी दुसरी संधी नाही.

जपानची ओळख ‘पोलादी पडद्याचा देश’ अशी आहे. जपानचा इतिहास लक्षात घेतल्यास या देशाचे अन्य देशांबरोबर कधी फारसे संबंध नव्हते. एडो कालखंडापासून विचार केल्यास अगदी मोजक्‍या देशांबरोबरच जपानचे संबंध जुळलेले दिसतात. त्यामुळे बाहेरून आलेल्यांचा स्वीकार करताना ते खूप विचार करतात. अर्थात, आता परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे.

परंतु, मूळ मानसिकता अजून कायम आहे. जपानी लोकांमध्ये आपण वेगळे आहोत; त्याचबरोबर ‘सुपिरिऑरिटी कॉम्लेक्‍स’ विशेषत्वाने जाणवतो. दुसऱ्या देशांतील व्यक्तीला स्वीकारण्यासाठी या देशाचे काही ठोकताळे आहेत, ते जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जपानी’ भाषा येणे. सध्याचा विचार करता जपानमध्ये चीन, कोरिया या देशांतील नागरिक जास्त असून, त्यानंतर व्हिएतनाम, म्यानमार, नेपाळ यांचा क्रमांक लागतो. भारताचा क्रमांक त्यानंतर येतो. अर्थात, चीन आणि कोरियाची भाषा आणि लिपी जवळची वाटत असल्याचा तो परिणाम आहे.

जपानमधील शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधींचा विचार करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. जपानमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षण किंवा नोकरीसाठी किमान जपानी भाषा येणे आवश्‍यक असते. अगदी क्वचितप्रसंगी जपानी भाषा येण्याचा नियम काही प्रमाणात शिथिल केला जातो. जपानी भाषा येण्याच्या एकूण पाच कसोट्या आहेत. याला सर्वसाधारणपणे ‘एन-१’ ते ‘एन-५’ असे संबोधले जाते. आपल्याकडे बारावी झाल्यानंतर तीन वर्षांचा ‘बीए इन जपानी’ असा कोर्स आहे. त्याशिवाय, पदवीनंतरही काही अभ्यासक्रम आहेत. ते झाल्यानंतर जपानमध्ये जाण्यापूर्वी ‘जेएलपीटी’ (जपानी लॅंग्वेज प्रोफेशनल टेस्ट) ही परीक्षा देणे अनिवार्य असते. जुलै आणि डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेतली जाते. एकट्या पुण्यातून प्रतिवर्षी साधारण दोन हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात, त्यामध्ये जेमतेम ३०० ते ५०० विद्यार्थी उत्तीर्ण होतात. यामध्ये ‘एन-१’ ग्रेड मिळाली, तरी तो पुढील शिक्षणाचा राजमार्ग ठरतो. ‘एन-१’ आणि ‘एन-२’ झालेले विद्यार्थी अधिक योग्य समजले जातात आणि ते जपानमध्ये नोकरीही करू शकतात. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी ते सोईचे ठरते. कारण, ‘एन-१’ आणि ‘एन-२’ झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात फारशी अडचण येत नाही.

शिक्षण आणि नोकरीच्या संधी
जपानमध्ये गुणवत्तेला अपरंपार महत्त्व आहे. तुम्ही उच्चशिक्षित आहात आणि काहीतरी करून दाखविण्याची हिंमत असल्यास भाषेची अनिवार्यता काही प्रमाणात शिथिल केली जाते. जपानमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष संधी आहेत. आपल्याकडील ‘आयआयटी’मधील बुद्धिमान विद्यार्थ्यांना तेथे खास करून मागणी आहे. त्यांना शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. अर्थात, त्यासाठी बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम, याकडे लक्ष असते. जपानमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स, संशोधन, रोबोटिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनोटेक, अवकाश संशोधन या क्षेत्रांत भारतीय विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. 

याशिवाय नर्सिंग, बांधकाम, उत्पादन आणि फिशिंग यामध्येही तेथे मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. उच्च शिक्षण आणि काम करण्याची जिद्द असलेल्यांसाठी जपानमध्ये अक्षरश: ‘रेड कार्पेट’ घातले जाते.

द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा
जपान हा एकेकाळी ‘सील्ड’ देश होता. या देशाचा १६०३ ते १८६८ या काळात बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध नव्हता. कालांतराने यात बदल होत गेला. जपानच्या लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस त्यांना ‘काम करणाऱ्या मनुष्यबळा’ची वानवा जाणवत आहे. जपानला दरवर्षी १० ते ५० लाख मनुष्यबळाची आवश्‍यकता असून, तेवढ्या प्रमाणात ते उपलब्ध होत नसल्याने भारतासारख्या देशाला विशेष संधी आहे. यामुळे जपानची कवाडे हळूहळू उघडत गेली. परंतु, त्यात आपल्या देशाचा समावेश नव्हता. या देशाला लागून असलेल्या चीनसह कोरिया, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, लावोस, मलेशिया, थायलंड आदी देशांबरोबरच जपानचे संबंध होते. आता कोरिया आणि चीनबरोबर अनेकविध कारणाने चांगले संबंध नसल्याने भारताकडे त्यांचे लक्ष वळले आहे. जपानचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन गेल्या वीस वर्षांत, विशेषतः डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रथम कार्यकाळानंतर बदलत गेला. भारतासारखा दीर्घकालीन मित्र त्यांना हवा आहे. गेल्या वीस वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर खंबीरपणे पावले टाकली आणि त्यादृष्टीने वाटचाल सुरू असल्याचा हा परिणाम आहे.

आपल्या देशाने मध्यंतरी केलेल्या अण्वस्त्र चाचण्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसविलेली कणखर भूमिका यांचा सकारात्मक परिणाम आता होत आहे.

...तर संधीचे सोने!
जपानमध्ये संधी असल्याने भारतातील अनेक जण करिअरचा पर्याय म्हणून जपानकडे पाहतात. त्यामध्ये अडचणी खूप आहेत. सर्वांत मोठी अडचण म्हणजे राहणीमान. भारताच्या रुपयाच्या तुलनेत तेथील येन महाग आहे.

त्यामुळे साहजिकच खर्चाचे प्रमाण मोठे आहे. शिक्षणासाठी जाताना याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. माझ्या मुलांचे शिक्षण जपानमध्ये झाले. अगदी ‘केजी’च्या प्रवेशासाठीही सहा लाख रुपये शुल्क लागते; यावरून उच्च शिक्षणासाठी किती खर्च होईल, याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नपदार्थ. भारतीयांच्या दृष्टीने हा मोठा विषय आहे.

आपल्या दृष्टिकोनातून असलेला ‘शाकाहार’ त्यांना मान्य नाही. समुद्राच्या पोटातून बाहेर पडलेले सर्वच शाकाहारी, असे जपानी लोक मानतात.

जपानमध्ये ६१ टक्के अन्न आयात करावे लागते. त्यामुळे त्याच्या किमती जास्त असतात. परिणामी, राहणीमानाच्या खर्चात वाढ होते. तिसरा प्रश्‍न म्हणजे जपानी भाषा शिकणे ही थोडी अवघड बाब आहे अन्‌ प्रत्येकाला पचनी पडेल, असा हा विषय नसतो. खर्च करायची तयारी असली, तरी भाषेचा मुद्दा असतोच. त्यामुळे जपानमध्ये करिअरचा विचार करताना या गोष्टी नजरेआड करून चालणार नाहीत.जपानला दीर्घकालीन मित्र या नात्याने भारताची निकड आहे आणि भारताची बाजारपेठही त्यांना खुणावत आहे.

त्यामुळे जपान समजून घेणे आवश्‍यक ठरते. योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास जपानसारखी दुसरी संधी नाही. शैक्षणिकदृष्ट्या अव्वल असणाऱ्यांनी जपानकडे करिअर म्हणून जरूर पाहावे. कारण, या देशाला तंत्रस्नेही अभियंत्यांसह नर्सिंग आणि फिशिंग क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी आवश्‍यकता आहे. नर्सिंगमधील संधींसाठी सांगतो, जपानमध्ये आजमितीला शंभरी गाठलेले ५० हजार नागरिक असून, त्यांच्या शुश्रूषेचा मोठा प्रश्‍न आहे.

योग्य पद्धतीने भाषा शिकून घेतली आणि कष्ट करायची तयारी असल्यास जपान खुणावतो आहे. जपानने मैत्रीसाठी घेतलेल्या पुढाकाराचा आपल्याला योग्य पद्धतीने फायदा घेता येईल.
(शब्दांकन - अाशीष तागडे)
(लेखक इंडो-जपान बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील जपानी भाषा विभागाचे प्रमुख आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article shrikant atre