esakal | पहाटपावलं : ध्येयपूर्तीची ऊर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

Jayprakash-Baraskar

व्यवसायानं बालरोगतज्ज्ञ असल्यानं गेल्या ५५ वर्षांत विविध वयोगटांतील मुलांशी संपर्क आला. आजारी नसलेल्या बालकांशी गप्पा मारताना ‘कुठल्या वर्गात आहेस? कुठली शाळा? पुढे काय व्हायचं आहे?’ असे प्रश्‍न विचारले जातात. ‘पुढे काय होणार?’

पहाटपावलं : ध्येयपूर्तीची ऊर्जा

sakal_logo
By
डॉ. श्रीकांत चोरघडे

व्यवसायानं बालरोगतज्ज्ञ असल्यानं गेल्या ५५ वर्षांत विविध वयोगटांतील मुलांशी संपर्क आला. आजारी नसलेल्या बालकांशी गप्पा मारताना ‘कुठल्या वर्गात आहेस? कुठली शाळा? पुढे काय व्हायचं आहे?’ असे प्रश्‍न विचारले जातात. ‘पुढे काय होणार?’ या प्रश्‍नाचं उत्तर बालकाचं वय व विचारांची परिपक्‍वता यावर अवलंबून असतं. यातली फार कमी मुलं-मुली ठरवल्याप्रमाणं आपलं आयुष्य घडवू शकतात. काही वेळा आयुष्यात घडणाऱ्या घटना पुढील वाटचालीला वळण देतात. यामुळे ठरविलेल्या ध्येयपूर्तीसाठी ऊर्जा मिळते. 

डॉ. जयप्रकाश बारस्कर शिकत असताना त्यांच्या बहिणीचं गर्भाशयाच्या कर्करोगानं निधन झालं.त्याआधी तिचे झालेले हाल, इलाजासाठी करावी लागणारी पैशाची सोय, कुटुंबातील आर्थिक, भावनिक वादळं त्यानं अनुभवली. त्या काळी नागपुरात कुणी कर्करोगतज्ज्ञ नव्हतं. जयप्रकाशच्या बहिणीनं तिची अंतिम इच्छा बोलून दाखवली, की त्यानं कर्करोगतज्ज्ञ व्हावं. जयप्रकाशनं तसा निश्‍चयच केला. एमबीबीएस झाल्यावर त्यानं १९९४ मध्ये नागपूरमधील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमएस ही शल्यतज्ज्ञाची पदवी मिळविली आणि पुढं कर्करोगतज्ज्ञ होण्यासाठी चेन्नईला अपोलो कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये तो रुजू झाला. पुढे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटमधून M.ch. ही कर्करोग शल्यतज्ज्ञासाठीची पदवी त्यानं मिळविली. नंतर हैदराबादेतील निझाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कॅन्सर सर्जरी विभागात अनुभव घेऊन २००१ मध्ये तो नागपूरला परत आला. नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालयात कर्करोग शल्यतज्ज्ञ म्हणून सेवा बजावली आणि २००३ मध्ये स्वत:चं कर्करोग रुग्णालय सुरू केलं. जयप्रकाश यांच्या इस्पितळात कर्करोगाचं निदान, त्यासाठीची उपाययोजना व शस्त्रक्रिया अशी सेवा उपलब्ध आहे. त्यांच्या पत्नी डॉ. वंदना रस्तोगी-बारस्कर या मूत्रपिंड व्याधीतज्ज्ञ आहेत.

डॉ. जयप्रकाश यांचे वडील गांधीभक्त व स्वातंत्र्यसैनिक होते. व्यवसायानं शिक्षक असले तरी त्यांना समाजसेवेची आवड होती. जयप्रकाशनं त्यांचा समाजसेवेचा वारसा जपला आहे. म्हणूनच कर्करोगाचं निदान व उपचार यांच्या पलीकडे जाऊन कर्करोगाविषयी जनतेत जागृती करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर व आसपासच्या गावांमध्ये जाऊन तपासणी शिबिरं घेतली जातात. आर्थिक अडचण असेल, अशा रुग्णांसाठी कमीत कमी खर्चात इलाज करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी त्यांनी ट्रस्ट स्थापन केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अलीकडेच ‘सकाळ’तर्फे ‘एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा डॉक्‍टर असून, त्यालाही वडिलांचा वारसा सुरू ठेवायचा आहे. बारावीत शिकणाऱ्या लहान मुलाचंही ध्येय वडिलांसारखं आहे. संपूर्ण कुटुंब असं ध्येयानं झपाटून जाणं हे अभावानंच पाहायला मिळतं.

loading image