पहाटपावलं : पर्यावरणस्नेही उत्सव

डॉ. श्रीकांत चोरघडे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पूर्वी लोकसंख्या कमी होती. गावं, शहरं आकारानं लहान होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं मोजकीच होती. गणेशोत्सवाचं असं स्वरूप विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होतं. नंतर बदल होत गेले आणि उत्सवाला स्पर्धेचं स्वरूप आलं. कोणत्या मंडळाचा गणपती किती मोठा, कुठली आरास मोठी असं करत मूर्तींचे आकार वाढत गेले. आधी मातीचे गणपती असत.

पूर्वी लोकसंख्या कमी होती. गावं, शहरं आकारानं लहान होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं मोजकीच होती. गणेशोत्सवाचं असं स्वरूप विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होतं. नंतर बदल होत गेले आणि उत्सवाला स्पर्धेचं स्वरूप आलं. कोणत्या मंडळाचा गणपती किती मोठा, कुठली आरास मोठी असं करत मूर्तींचे आकार वाढत गेले. आधी मातीचे गणपती असत.

त्यातले शाडूच्या मातीचे गणपती सरस गणले जात. पुढे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर सुरू झाला. त्यामुळे मूर्ती विसर्जनाच्या कल्पनेलाच छेद गेला. कारण अशा मूर्तींचे विसर्जन होत नाही. त्यामुळे विसर्जनानंतर या मूर्ती समुद्राच्या, तलावांच्या, नदीच्या काठी पडलेल्या दिसू लागल्या. आपल्या लाडक्‍या गणरायाची यात विटंबना होते, याचा कुणाला खेद वाटत नाही, याचं दु:ख होतं.  आरास करताना थर्मोकोल, प्लॅस्टिकचा वापर सुरू झाल्यामुळे नदी, नाले, तलाव, समुद्राचं पाणी प्रदूषित होऊ लागलं. या समस्येनं भयानक स्वरूप धारण केलं आहे. जलचरांचं अस्तित्व धोक्‍यात आलं आहे. यात समाधानाची गोष्ट एवढीच, की पर्यावरणाबद्दल जागृती होऊ लागली आहे.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली गेली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नाही. तेव्हा तीच मूर्ती दरवर्षी वापरली जाऊ शकते. काही मंडळांनी हा मार्ग अवलंबला आहे. काही घरी तांब्याच्या, पितळेच्या, मिश्र धातूंच्या, चांदीच्या मूर्ती गणेशोत्सवापुरत्या वापरून पुढील वर्षासाठी जपून ठेवल्या जातात. आरास पाना-फुलांची असेल तर त्यातून खतनिर्मिती होऊ शकते. प्लॅस्टिकचा किंवा थर्माकोलचा वापर केला तर विघटन न होणारा कचरा साचत जातो व तो पर्यावरणाला हानीकारक ठरतो.

गणेशोत्सवात स्थित्यंतरं झाली, पण भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. सादरीकरणाचे प्रकार व मार्ग बदलले, पण उत्साह कायम आहे. जनजागृती हा मूळ उद्देश असलेला गणेशोत्सव अजूनही काहीअंशी हा उद्देश पूर्ण करीत असतो. अनाठायी खर्च कमी करून पूरग्रस्तांना मदत पाठवली जाते. काही ठिकाणी गरिबांना भोजन दिलं जातं, समाजोपयोगी कामं केली जातात.

उत्सवाच्या निमित्तानं पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांचे मानवजात, प्राणीजात, जलचर व पक्षीगण सगळेच बळी ठरत आहेत. पण पुढील पिढीपर्यंत हे दुष्परिणाम इतक्‍या जास्त प्रमाणात वाढणार आहेत की अख्ख्या जीवजंतूंच्या अस्तित्वावर गदा येऊ शकेल. तेव्हा निदान उत्सवाच्या निमित्तानं होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा घालण्याचा प्रयत्न होईल, अशी आशा करूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Shrikant Chorghade