पहाटपावलं : चळवळ ‘प्लॉगिंग’ची

Shrikant-Chorghade
Shrikant-Chorghade

मला नव्या पिढीचं कौतुक वाटतं. सामाजिक जाणीव, उत्साह आणि सर्जनशीलता यातून समाजभान ठेवणारे उपक्रम राबविण्यात या पिढीचा सहभाग वाढत आहे. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग अशा उपक्रमांमध्ये दिसतो. मधल्या काळात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेऊन मुलामुलींनी आपापल्या परिसरात वृक्षारोपण केलं. त्याआधी नागपुरातील तलावाच्या परिसरात सहल व बीजारोपण अशा दुहेरी उद्देशानं उपक्रम राबवला गेला.‘प्लॉगिंग’ हा नवा उपक्रम हल्ली सुरू झाला आहे. ही मूळ कल्पना परदेशातील असली, भारतातही नव्या पिढीनं ती उचलून धरली आहे. गांधी जयंतीचं निमित्त साधून काही विद्यार्थ्यांनी ‘प्लॉगिंग’चा उपक्रम नागपुरात राबवला.

गेल्या वर्षा-दोन वर्षांमध्ये हा शब्द व ‘प्लॉगिंग’ची चळवळ इतकी जगभर पसरली की हा शब्द ‘कॉलिन्स’च्या इंग्रजी शब्दकोशामध्ये समाविष्ट केला गेला. ‘प्लॉगिंग’ हे प्लोका व जॉगिंग या दोन शब्दांचं एकीकरण आहे. यात स्वार्थ व परमार्थ असं दोन्ही साधलं जातं. जॉगिंगमुळे व्यायाम घडतो व त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुनिश्‍चित होतं. मोकळ्या हवेमुळे शुष्क प्राणवायू मिळतो. फुफ्फुसं पूर्णपणे कार्यरत व्हायला मदत होते. याच्या जोडीला तुमच्या धावण्याच्या रस्त्यावर पडलेला कचरा व विशेषत: प्लॅस्टिक गोळा करायचे, असा दुहेरी उद्देश असलेला हा व्यायाम म्हणजे ‘प्लॉगिंग’. या उपक्रमाची सुरवात स्वीडनमध्ये २०१८मध्ये झाली. ‘ऑनलाइन’मुळे त्याचा जगभर प्रसार झाला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सामाजिक चळवळीतील सहभागाची किमया भारतात तरी नवीन नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात कितीतरी विद्यार्थी महात्मा गांधींच्या प्रेरणेमुळे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. कित्येकांनी त्यासाठी शिक्षण सोडलं. त्यातल्या काहींनी तुरुंगवास भोगला. काही तर मरणाला निधड्या छातीने समोर गेले होते.

१९७७ मध्येसुद्धा जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने कितीतरी विद्यार्थी, तरुणांनी चळवळीमध्ये झोकून दिलं होतं.ही पौगंडावस्थेतील व तारुण्यातील ऊर्जा आणि ऊर्मी सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापरली गेली, तर चमत्कार घडवू शकते, सत्ता उलथवू शकते. फक्त प्रेरणा देणारा जननायक तसा मिळायला हवा. मात्र हीच शक्ती व ऊर्जा योग्य मार्गदर्शनअभावी चुकीच्या पद्धतीनंही वापरली जाऊ शकते. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे समाजमाध्यमे प्रभावी झाली आहेत आणि कानाकोपऱ्यात पोचली आहेत.

त्यामुळे कुठल्याही चळवळीचा प्रसार व्हायला वेळ लागत नाही. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यामुळेच सर्वदूर परिणामकारकरीत्या पोचवला गेला आहे आणि नव्या पिढीकडून या चळवळीला पाठिंबा मिळतो आहे. ‘प्लॉगिंग’ या चळवळीतून लहान-थोरांपर्यंत स्वच्छता व प्लॅस्टिकमुक्ती या दोन विषयांबद्दल संदेश जाईल आणि स्वच्छ भारत घडण्याला बळ येईल. नव्या पिढीला ही जाणीव होण्याला विशेष महत्त्व आहे, कारण भविष्यकाळ त्यांच्यासाठी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com