पहाटपावलं : जगण्याचा आनंदस्वर

डॉ. श्रीकांत चोरघडे
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नुकताच ९० वा वाढदिवस साजरा झाला. लताबाईंचं गाणं आणि माझा परिचय होऊन सत्तर वर्षे लोटली आहेत. माझं वय दहा वर्ष असेल, तेव्हा ‘महल’ चित्रपट पाहायला आमचं कुटुंब गेलं होतं.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नुकताच ९० वा वाढदिवस साजरा झाला. लताबाईंचं गाणं आणि माझा परिचय होऊन सत्तर वर्षे लोटली आहेत. माझं वय दहा वर्ष असेल, तेव्हा ‘महल’ चित्रपट पाहायला आमचं कुटुंब गेलं होतं.

चित्रपट लक्षात राहिला नाही; पण गाणं आवडलं. ‘ये जिंदगी उसीकी है, जो किसीका हो गया’ या गाण्यानं लतादीदींची ओळख पहिल्यांदा झाली. पुढे आमचं कुटुंब वर्धा सोडून नागपूरला आलं. महाल भागात फोनोच्या रेकॉर्ड विक्रीचं दुकान होतं. लतादीदींची नवी रेकॉर्ड आली की दुकानदार फोन करायचा. त्यामुळे केवळ चित्रपटांचीच गाणी नाही, तर भावगीतं, गझल, भजनं अशा गीतांच्या तबकड्यांचा संग्रह घरी गोळा झाला. साठीच्या दशकात कधी तरी रेकॉर्डप्लेअर हा प्रकार आला. पुढे लताबाईंच्या गाण्यांच्या अनेक टेप्स हळूहळू बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. माझ्या मेहुणीनं अशा डझनभर टेप्स परदेशातून आणून दिल्या. त्यातून मी वेगळा श्रीमंत झालो.

पुन्हा पुन्हा ऐकून सगळी गाणी मधल्या पार्श्वसंगीतांसह पाठ झाली होती.
त्या काळात प्रसिद्ध कवयित्री शांताताई शेळके वडिलांना भेटायला आल्या. वडील साहित्यिक असल्यानं त्यांची चांगली ओळख होती. शांताबाईंना विमानतळावर सोडायची जबाबदारी वडिलांनी मला दिली. रात्री आठ वाजता मी व पत्नी त्यांना सोडायला विमानतळावर गेलो. सोबत टेपरेकॉर्डवरची लताबाईंची गाणी होती. ती ऐकत शांताबाईंशी गप्पा रंगल्या. विमान दोन तास उशिरा येणार असं कळलं. त्या काळात नागपूर विमानतळ लहान होता.

धावपट्टीशेजारच्या हिरवळीपर्यंत प्रवेश असे. हिरवळीवर लताबाईंची गाणी ऐकत आमच्या गप्पा सुरू होत्या. शांताबाई व लतादीदीचं घट्ट मैत्र होतं. त्यांच्या अनेक आठवणींना शांताबाईंनी उजाळा दिला. ‘मुंबईला याल तेव्हा लताबाईंकडे घेऊन जाईन,’ असं त्यांनी वचन दिलं; पण लतादीदीच्या भेटीचा योग नव्हता, कारण आम्ही मुंबईला गेलो, तेव्हा शांताबाई गुडघ्याच्या व्याधीनं त्रस्त होत्या. शांताबाईंनी त्या रात्रीच्या भेटीची आठवण म्हणून लतादीदींच्या दुर्मीळ गाण्यांची टेप भेट म्हणून पाठवली.

फोनोच्या रेकॉर्डपासून लतादीदींचा प्रवास सुरू झाला आणि संगीत क्षेत्रातील अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. लतादीदींनी गाणं आज बंद केलेलं असलं तरी, नव्या तंत्रज्ञानामुळे त्यांनी गायलेली हजारोंच्या संख्येतील गाणी मोबाईलमध्ये सहज उपलब्ध होतात. हवं ते गाणं, हवं तेव्हा ऐकता येतं, हे आमच्या पिढीचं भाग्य. प्रत्येक गाण्यासोबत खूप गोष्टी आठवतात. या वयात या आठवणी रवंथ करणं हा मोठाच आनंद असतो. विरंगुळा म्हणून या वयात गाणी ऐकणं ही वेगळीच अनुभूती असते. जगण्यातला आनंद वाढवायला लतादीदींचा स्वर नेहमीच उपलब्ध असतो. नव्या तंत्रज्ञानामुळे लतादीदींची गाणी आणि त्यांची आठवण चिरंतन झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Shrikant Chorghade