पहाटपावलं : ‘रिनोवातिया’ची साथ

Shrikant-Chorghade
Shrikant-Chorghade

दिवाळीत जिथे भरपूर पाऊस होता, तिथे लोकांना दिवाळीवर विरजण पडल्याचं दु:ख झालं. पण, काही मंडळी अशीही असतात की ज्यांना अनुकूल परिस्थिती असतनाही फराळ, आतषबाजी यात रस नसतो. नकुल अग्रवाल हे त्यातलेच एक. लोकांना सकारात्मक विचार देऊन त्याचं मनोबल उंचावणं यासाठी ते व्याख्यानं देतात. पण, त्यांची जडणघडण आणि संस्कार यामुळे त्यांचं समाधान होत नव्हतं. तळागाळातील गरजू लोकांना, दीनदुबळ्यांना काहीतरी द्यावं ही ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. काय करता येईल असा विचार ७-८ वर्षांपूर्वी त्यांच्या मनात आला. दिवाळीत लोक घर स्वच्छ, सुंदर करतात. त्या वेळी रद्दी, जुने कपडे, लोखंडी सामान, फर्निचर, निकामी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू प्रसंगी मातीमोल भावाने विकल्या जातात. हे सामान गोळा करून विकलं, तर त्या पैशातून गरजूंना मदत करता येईल. नको असलेलं सामान घरातून बाहेर गेलं हा दात्यांना आनंद व त्यातून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग ज्या मंडळींसाठी होईल त्यांनाही आनंद. या दोघांच्या आनंदामुळे नकुललाही आनंद मिळू लागला. ‘शेअर द स्पेअर’ म्हणजे ‘नको असलेला वाटा’ असं त्यांच्या अभियानाचं नाव. हा उपक्रम वर्षभर राबविला जात असला, तरी दिवाळीत त्याला विशेष गती दिली जाते. या उपक्रमातून जे पैसे मिळतात त्यातून दारिद्य्ररेषेखालील बालकांना अन्न, वस्त्र, शिक्षण यांसाठी मदत व अन्य वस्तू पुरवल्या जातात. 

‘रिनोवातिया’ हा लॅटिन शब्द आहे. त्यात Renewal म्हणजे नवीनीकरण. Restortion पुनर्बांधणी, rebirth म्हणजे पुर्नजन्म असा अर्थ अभिप्रेत आहे. नकुल यांनी हा उपक्रम सुरू केला, तेव्हा ते २१ वर्षांचे होते. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. या काळातच त्यांना दारिद्य्ररेषेखाली जगणाऱ्या कुटुंबांच्या अडचणी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ या गोष्टी लक्षात आल्या होत्या.

विशेषत: इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय शिकायला त्यांना जड जातं. त्यांना मनोरंजक पद्धतीनं, प्रात्यक्षिक दाखवून, हसत- खेळत शिकवलं गेलं तर त्यांना शिक्षणात रस निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन Experienced learning चा उपयोग करून त्यांच्या संस्थेचे स्वयंसेवक या मुलांना आठवड्यातून एक दिवस शिकवतात. संस्थेचा व्याप आता अकोला, अमरावती, पुणे, मुंबई असा पसरला आहे. सुमारे १५०० स्वयंसेवक या कार्यात सहभागी आहेत. केवळ सामाजिक किंवा आर्थिक कारणांपोटी कित्येकांना शिक्षणात मागे राहावं लागतं. आधार मिळाला तर त्यांच्यातसुद्धा स्फुल्लिंग जागृत होतात. असे कितीतरी खडकावरले अंकुर शोधून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम ‘रिनोवातिया’च्या माध्यमातून घडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com