पहाटपावलं : उपक्रमाला जोड छंदाची

Shrikant-Chorghade
Shrikant-Chorghade

नागपुरात रमेश सातपुते या नावाचं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. धनवटे कुटुंबातून आलेली त्यांची आई उत्तम चित्रकार होती. आईकडून त्यांना कलेचा वारसा मिळाला, तसाच शिवप्रेमाचाही वारसा मिळाला आहे. पन्नास वर्षांपूर्वी धनवटे कुटुंबीयांनी त्यांच्या शिवराज लिथो प्रेसच्या चौथ्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवला. त्याचं अनावरण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं.

१९८६ पासून रमेश दिवाळीच्या सुमारास शिववैभव किल्ले स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धेसाठी वयाची अट नाही. ज्याला इच्छा आहे, सर्जनशीलता आहे, कष्टाची तयारी आहे अशी कुठल्याही वयोगटातील व्यक्ती त्यात भाग घेऊ शकते. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळतो. दरवर्षी ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेतली जाते. किल्ले तयार करताना दगड, माती, पर्यावरणपूरक सामग्री वापरली जावी अशी अपेक्षा असते. नाममात्र शुल्क देऊन स्पर्धकाला नोंदणी करावी लागते. परीक्षक प्रत्येक किल्ल्याला भेट देऊन पाहणी करतात. यशस्वी महिला स्पर्धक व ज्येष्ठ नागरिक यांना विशेष पुरस्कार दिले जातात. दृष्टिहीन व दिव्यांग व्यक्‍तीसुद्धा स्पर्धेत भाग घेतात.पूर्वीपासून दिवाळीचे किल्ले हाही दिवाळी साजरी करण्याचा भाग आहे. या निमित्तानं मुलांमधील सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि रिकामा वेळ सत्कारणी लागतो; पण हळूहळू शहरी संस्कृतीमुळे हा उपक्रम लुप्त होऊ लागला होता. या उपक्रमाच्या पुनरुज्जीवनासाठी इच्छाशक्ती, सातत्य, नियोजन, मेहनत, ऊर्मी या गोष्टींची आवश्‍यकता असते. त्याचबरोबर सामाजिक भान असणंही आवश्‍यक असतं. हे सगळं रमेश सातपुते यांच्यामध्ये आहे. त्यामुळेच या उपक्रमाला एका चळवळीचं स्वरूप आलं.

सामाजिक भान जपणारे आणखी काही उपक्रम सातपुते राबवत असतात. देहदानासाठी जनतेला जागरूक करण्याचं व प्रोत्साहित करण्याचं काम ते करीत आहेत. त्यांचं घर म्हणजे जुन्या मूर्ती व शिल्प यांचं जणू प्रदर्शनच आहे. मसाल्याची आणि औषधी वनस्पतींची लागवड व जोपासना आणि त्यासाठी मार्गदर्शन असाही उपक्रम ते राबवत असतात. एक कलाकार असल्यामुळे घराच्या सजावटीसाठी ते सल्लागार म्हणून काम करतात. याशिवाय त्यांनी आणखी एक छंद जोपासला आहे. जुनी गाणी, भावगीतं, नाट्यगीतं यांचा प्रचंड मोठा संग्रह त्यांनी जमविला आहे. त्यात फोनवर चालणाऱ्या, प्लेअरवर चालणाऱ्या जुन्या हिंदी, मराठी ध्वनिमुद्रिका आहेत, टेप्स आहेत, सीडी आहेत. इतिहास, चित्रकला, संगीत या विषयावर बोलण्यासारखं त्यांच्याकडं बरंच असतं. अशा बहुआयामी व्यक्तीचं कौतुक करावं तेवढं थोडंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com