पहाटपावलं : मेंदू, हात नि हृदयाचा संगम

डॉ. श्रीकांत चोरघडे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

आमीर खानच्या ‘थ्री इडियट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते वैज्ञानिक सोनम वांगचुक नुकतेच नागपुरात येऊन गेले. त्यांच्या मते आपली शिक्षणपद्धती व मुलांच्या बुद्धिमत्तेचं मूल्यांकन यात बदल आवश्‍यक आहेत. आज मुलांना मिळणारे गुण त्यांची बुद्धिमत्ता ठरवतात. हे मापक बदलायला हवं.

आमीर खानच्या ‘थ्री इडियट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते वैज्ञानिक सोनम वांगचुक नुकतेच नागपुरात येऊन गेले. त्यांच्या मते आपली शिक्षणपद्धती व मुलांच्या बुद्धिमत्तेचं मूल्यांकन यात बदल आवश्‍यक आहेत. आज मुलांना मिळणारे गुण त्यांची बुद्धिमत्ता ठरवतात. हे मापक बदलायला हवं.

शिक्षण पद्धतीत ’Head-बुद्धी’, ’Hands-हात’ व ’Heart म्हणजे हृदय’ या तिन्हींचा वापर करण्यासाठी प्रेरित करायला हवं. मूळ संशोधनाकडे मुलांचा कल वळण्यासाठी Head, Hands व Heart यांचा अभ्यासात वापर कसा करता येईल, हा विचार करायला हवा. या दृष्टीनं विचार करून त्यानुसार कार्यक्रम राबविणारे समीर जोशी नुकतेच भेटले. शिक्षणाने ते इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर असले तरी एम.बी.ए. करून पुढे मार्केटिंगमध्ये विविध आस्थापनांमध्ये त्यांनी सेवा केली. जवळजवळ २३ देशांमध्ये त्यांची भटकंती झाली आहे. पन्नाशीमध्ये आर्थिकदृष्ट्या स्थिर झाल्यावर काहीतरी समाजोपयोगी करता येईल काय, या दृष्टीनं विचार सुरू झाला. मराठी, हिंदी, इंग्रजीवर जोशींचं प्रभुत्व आहे. संवादकौशल्य आहे. आपले विचार इतरांपर्यंत पोचविण्याची क्षमता आहे.

या सगळ्यांचा वापर करून शिक्षणाशी संबंधित काही उपक्रम करावा ज्यातून काम व दाम दोन्ही मिळेल. त्यातून ’I Transform’ - ‘बदल घडवेन’ असा उद्देश अभिप्रेत असलेली संस्था स्थापन करून त्यांनी काही उपक्रम सुरू केले. त्यातील एक शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘शाळेतील शाळा’ हा उपक्रम होता. मुलांचे पाठांतर व पुस्तकावर आधारित तास संपले, की एक तास अनुभव व प्रात्यक्षिकातून शिक्षण देण्याचा कार्यक्रम त्यांनी ठरविला. मुलांना विज्ञानाचं शिक्षण वेगळ्या पद्धतीनं द्यायचं, विज्ञानाची प्राथमिक संकल्पना समजावून सांगायची आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल यासाठी त्यांना विचार करायला प्रवृत्त करायचं आणि विविध साधनं उपलब्ध करून द्यायची. त्यातून स्वत: खटपट करून ते काहीतरी घडवतील ही अपेक्षा.

यातून अनुभव घेत घेत मुलं पुढे स्वत:च्या कल्पना लढवून उपलब्ध साधनांतून वेगवेगळे प्रयोग करतात, यंत्रे तयार करतात. मुंबईतील कांदिवलीतील गुंदेचा एज्युकेशन अकादमीमध्ये गेली दोन वर्षे हा Explorium चा प्रयोग सुरू आहे. त्यात मुलांनी स्वत: अनेक यशस्वी प्रयोग करून संयंत्रे बनवली आहेत. सहा वर्षांच्या मुलानं ड्रोन तयार केला आहे. एका मुलानं सोलर ऊर्जेचा वापर शेतीसाठी कसा करता येईल, याचं मॉडेल तयार केलं आहे. अशा उपक्रमांना असाच चांगला प्रतिसाद मिळाला, तर विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे ओढा वाढेल व संशोधनाचं प्रमाण वाढेल, अशी आशा आहे. समीर जोशी यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अशा तऱ्हेच्या शिक्षणाचा प्रसार वाढावा, ही अपेक्षा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article shrikant chorghade