निवडुंगासमोर नसतो पर्याय... 

आसावरी काकडे
सोमवार, 15 जानेवारी 2018

लोकांच्या प्रतिक्रियांमुळे विचित्र माणसं आणखी तशीच वागत राहतात. बऱ्याचदा लक्ष वेधण्यासाठी जाणूनबुजून ती तसं वागत राहतात. बाहेर वावरताना थोडा वेळ भेटणाऱ्या अशा माणसांकडे दुर्लक्ष करणं तितकं अवघड नाही; पण अशी व्यक्ती घरातच असेल तर ते नातं निभावणं फार क्‍लेशकारक होतं..! 

कार्यालयात माझ्या शेजारी बसणारा माझा सहकारी जागेवर नव्हता. कुठेतरी गेला होता. त्याच्याकडे काम असलेला एक ग्राहक बराच वेळ त्याची वाट पाहात होता. वाट पाहून शेवटी मी त्या ग्राहकाला त्याचं काय काम आहे ते विचारलं आणि करून दिलं. ग्राहक निघून गेला. मी माझ्या कामात होते. शेजारचा सहकारी आला. माहिती म्हणून मी त्याच्या अनुपस्थितीत काय झालं, ते सहज त्याला सांगितलं. मी फार काही केल्याचा जराही आविर्भाव त्यात नव्हता. मला तसं वाटलेलंही नव्हतं. कार्यालयात वेळप्रसंगी एकमेकांची कामं करणं ही अगदी गृहीत गोष्ट आहे; पण मी सांगितलेलं ऐकून औपचारिकता म्हणून "धन्यवाद' असं काही म्हणण्याऐवजी तो म्हणाला, "तुम्हाला कुणी सांगितलं होतं ते करायला?' ही अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून मी चकित झाले. "नव्हतं कुणी सांगितलं.. चुकलंच माझं' असं म्हणून मी वाद टाळला..! 

तो तसाच होता. फटकन काही तरी विचित्रच बोलायचा. त्याच्या वाट्याला न जाणं 
काहीजण पसंत करायचे, तर काहीजण मुद्दाम वाट्याला जाऊन त्याला उचकवायचे... आपल्या आजूबाजूला अशी बरीच माणसं असतात. त्यांना समजून घेणं अवघडच असतं. का ऐकून घ्यायचं? हा सरळ साधा मुद्दा असतो. मग वाद वाढत जातात. कधी कधी विकोपाला जातात. 

लोकांच्या प्रतिक्रियांमुळे विचित्र माणसं आणखी तशीच वागत राहतात. बऱ्याचदा लक्ष वेधण्यासाठी जाणूनबुजून ती तसं वागत राहतात. बाहेर वावरताना थोडा वेळ भेटणाऱ्या अशा माणसांकडे दुर्लक्ष करणं तितकं अवघड नाही; पण अशी व्यक्ती घरातच असेल तर ते नातं निभावणं फार क्‍लेशकारक होतं..! 

अशा व्यक्तीला समजून घेत वाद, संघर्ष टाळणं सोपं नसतं. कसं समजून घ्यायचं हा प्रश्न तर असतोच; पण खरा प्रश्न किती समजून घ्यायचं हा आहे. समजून घेण्यातून तेवढ्यापुरते वाद टळतीलही; पण त्यामुळं ती व्यक्ती तसंच वागत राहाते. तिनं बदलणं... सुधारणं ही प्रक्रियाच सुरू होत नाही. त्यासाठी वेळप्रसंगी त्या व्यक्तीची चूक तिच्या लक्षात आणून देऊन, त्यातून निर्माण होणाऱ्या भांडणाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं काही प्रमाणात का होईना तिच्यात बदल होऊ शकतात. तिचं व्यक्तित्व संतुलित होऊ शकतं. 

मात्र रंग, उंची.. हे माणसाला जन्मजात मिळतं, तसे काही स्वभाव-दोषही जन्मजात 
असतात. त्यात पूर्ण बदल होत नाही. किती बदल होऊ शकेल आणि काय जन्मजात म्हणून स्वीकारायला हवं यात सीमारेषा आखणं कौशल्याचं काम आहे; पण आत्मीयता आणि थोडं धैर्य असेल तर ते जमू शकतं. मग समजून घेता येतं की वाट्याला आलेल्या बीजातून उगवल्यावर निवडुंगाला शोषून घ्यावा लागतो जमिनीखालचा काटेरी अंधार आणि सजवावे लागते ताठ मानेने मिळालेले रूप... निवडुंगासमोर नसतो पर्याय निशिगंध असण्याचा..! 

Web Title: editorial article social

टॅग्स