बलात्काराचे गुन्हे रोखण्यासाठी...

नवी दिल्ली - हैदराबादमधील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त निदर्शने.
नवी दिल्ली - हैदराबादमधील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त निदर्शने.

‘कुठल्याही स्त्रीला तुझ्या सहवासात सुरक्षित वाटेल असे तू वाग. दिवस असो व रात्र त्या स्त्रीला तुझ्यासोबत सुरक्षित वाटायला हवे. जसे मला किंवा तुझ्या बहिणीला वाटते, तोच खरा पुरुषार्थ आहे,’ हा संस्कार मातांनी आपल्या मुलांवर करायला हवा. 

हैदराबादमधील महिला डॉक्‍टरवरील सामूहिक बलात्कार व निर्घृण खुनाबाबत देशभर संतापाची लाट उसळली आहे. अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर २०१८मधील आकडेवारीनुसार देशात रोज सरासरी १०६ बलात्कार होतात. ही आकडेवारी चिंताजनक आहे. पण मुळात हे गुन्हे का वाढताहेत? बलात्कार करणाऱ्यांची मानसिकता काय असते? बलात्कार रोखण्यासाठी नेमके कुठे चुकते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणती पावले उचलली तर या घटना कमी होतील, याचा विचार होण्याची गरज आहे.

परदेशी माध्यमांमध्ये सध्या मधुमिता पांडे हे नाव चर्चेत आहे. मूळची भारतीय असलेली २६ वर्षांची मधुमिता इंग्लंडमधील एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीतील क्रिमिनॉलॉजी विभागात पीएच डी. करत आहे. प्रबंधासाठी तिने बलात्काराचा आरोप असलेल्या, भारतातील शंभर जणांच्या मुलाखती घेतल्या. त्याबाबत मधुमिताने एका लेखात म्हटले आहे, की तिच्या मते हे आरोपी राक्षस आहेत. पण त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा लक्षात आले, की हे आरोपी कुणी असाधारण पुरुष नाहीत. त्यापैकी अनेकांना हेच माहीत नसते, की शारीरिक संबंधांसाठी सहमती आवश्‍यक असते. त्यामुळे गुन्हे घडतात. खरेतर आपण केले ते चूक होते हे आरोपींना समजणे अत्यावश्‍यक आहे. त्यांना याचीच जाणीव नसते, की नेमकी चूक कुठे आहे? ही बाब खूप काही सांगून जाते.

बलात्काराच्या सुधारित क्रिमिनल लॉ (अमेंडमेंट) २०१३नुसार लैंगिक संबंधासाठी संमतीची वयोमर्यादा १८ वर्षांपर्यंत वाढविलेली आहे. याचा अर्थ असा, की अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी /स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवणे हा, तिची संमती असली तरी कायद्यानुसार तो बलात्कार आहे. या माहितीचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमात करायला हवा. आपण जी कृती करतो आहोत किंवा आपल्याबरोबर जी कृती होते आहे तो गुन्हा तर नाही ना? आणि त्याची शिक्षा आपल्याला मृत्यूच्या दारात तर उभी करणार नाही ना? याची जाणीव मुला-मुलींना करून देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा प्रश्‍न पडतो की लैंगिक शिक्षण म्हणजे नेमके काय? लैंगिक शिक्षणात नुसती शरीराच्या भागांची माहिती करून देणे नाही, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्या आंदोलनाना संयमित करायला शिकणे यांचाही अंतर्भाव होतो. लैंगिकतेशी संबंधित विचार विवेकपूर्ण बनवणे अपेक्षित आहे. याची जबाबदारी पालकांनीच घेतली पाहिजे.

मुली वयात येऊ लागल्या की आई त्यांना थोडी फार तरी माहिती देत असते; पण बऱ्याचदा मुलांना गृहीत धरले जाते. तो मुलगा आहे, त्याला काय सांगायचे? पण मुलगा वयात येतो म्हणजे त्याच्यातही शारीरिक, मानसिक बदल होत असतात. त्यालाही प्रश्न पडत असतात. मुलीला वयात येताना समजावून सांगितले जाते, तसाच मुलांशी संवाद का साधला जात नाही? त्याला शास्त्रशुद्ध माहिती मिळाली तर त्याला पडणारे प्रश्‍न व वाईट विचार नक्कीच कमी होतील. वयात येणाऱ्या मुलांमध्ये इतकी समज नसते की काय बरोबर आणि काय चूक. त्यांना हवी असतात फक्त त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे. मग ते वेगवेगळे मार्ग शोधतात. कमी वयात मिळणारा मोबाईल, टीव्ही, इंटरनेट आदी गोष्टी मुलांना सुलभपणे उपलब्ध होतात. कधी कधी ही माहिती अतिरंजक बनवली जाते, तर कधी कधी चुकीचीही असते. तेव्हा याबाबतीत वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली सक्षम व सुजाण पिढी घडविणे आपल्याच हातात आहे, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. मुलांच्या शंकांचे समाधान समर्पक व शांतपणे उत्तर दिल्यानेच होईल. 

खरेतर या सगळ्यांचे मूळ म्हणजे कुटुंबात नसणारा किंवा कमी असलेला सुसंवाद. आई- वडील दोघेही नोकरदार असले किंवा नसले तरीही मुलांसाठी त्यांच्याकडे नसलेला वेळ यातून अनेक समस्या उद्‌भवतात. मुलांमध्ये होणारे बदल वडिलांनी समजावून सांगावेत आणि संस्कार आईने करावेत. आईने मुलांशी संवाद साधला पाहिजे. आपल्या आसपास काय सुरू आहे यावर चर्चा केली पाहिजे. ‘तू मुलगा असलास तरी तुझ्यासोबत कुठल्याही स्त्रीला सुरक्षित वाटेल असे तू वाग. दिवस असो व रात्र त्या स्त्रीला तुझ्यासोबत सुरक्षित वाटायला हवे. जसे मला किंवा तुझ्या बहिणीला वाटते, तो खरा पुरुषार्थ आहे,’ असे आईने मुलांना सांगायला हवे.

या सगळ्या समस्येवर उपाय हा, की आपण चांगले पालक होऊया. कदाचित आपल्या पालकांनी नसेल आपल्याला समजावून सांगितले, नसेल समजून घेतले, पण आपण चांगले पालक होऊया. मुले दहा- बारा वर्षांची होतात, तसा त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टी असतील तरी त्यात त्यांची मते घ्या. असे म्हणू नका किंवा समजू नका की मुलांना काय कळते? मुलांना सगळे कळते. आपण नेहमी समस्येवर लक्ष केंद्रित करतो, पण कारण त्याच्या मुळातच असते. एका रात्रीत सर्व सुधारणा होतील, असे समजण्याचे कारण नाही. पण बलात्कार घडल्यानंतर निषेध करण्याबरोबरच ते घडण्याआधीच रोखण्याची सुरुवात आपण घरातूनच करू शकतो. त्याची सुरुवात स्वतःपासून करूया.
(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com