पहाटपावलं : रचना नि अर्थ

Sonali
Sonali

तिथं पोचलो तेव्हा तिथली शांतता, रमणीयता खासच ऐकू आली. नोत्रदॅम होतं ते फ्रान्समधल्या रोन्शाम्प इथलं. तिथल्या सुंदर रस्त्यावरून वेड्यासारखी नुसती फिरत राहिले. आवारातल्या तीन घंटांच्या प्रतिबिंबाकडे बघत आतबाहेरचा खेळ खेळत राहिले. आजूबाजूला हिरव्या रंगाच्या शक्‍य तितक्‍या छटा दाखविणाऱ्या टेकड्या-डोंगर. ऊन येतंय-जातंय. बाजूलाच कुठंतरी विशिष्ट स्वरातलं उत्साही क्वायर ऐकू येतंय. रचना इतकी गमतीची, की आवाजाच्या दिशेचं भान मिळत नाहीये. बाहेरचं सगळं शक्‍य तितकं नजरेनं पिऊन झाल्यावर आत इमारतीत जायचं ठरवलं.

इतकी मोठी इमारत नि तिच्याबाहेर पसरलेल्या कठड्यांसह तिच्या इतक्‍या रचना की नजरेत नेमकं चित्र तयार होईना. आत गेल्यावर गारउबदार सुंदर उंच अवकाश. खूप खिडक्‍या. पण एकही दुसरीसारखी नाही. तिच्या रंगीत काचांमधून येणारे उजेडही वेगळे. एका जमिनीशी समतल कोनाडेवजा जागेत एक टेबल, त्यावर मेणबत्ती नि एक मोठासा ग्रंथ; त्यावर अचूक उजेड पडतोय छताच्या दिशेनं निमुळत्या होत गेलेल्या उभ्या बोगद्यातून.

अंधाराचा भाग अधिक असलेल्या त्या विलक्षण उजेडात मन खूप शांत झाल्याचं कळत गेलं. मुळातच ‘असा’ चर्च किंवा चॅपेल, असा पोहण्याचा तलाव, अशी बैठकरचना, अशी प्रार्थनास्थळं या कुठल्याच ‘असाअशी’च्या चौकटीत न अडकता रचनाकारानं जे केलं त्यानं अद्‌भुत वाटत होतं. एक साधा कोपरा किंवा तिथले लाकडी बेंच नि मेणबत्त्या लावायची जागाही वैशिष्ट्यपूर्ण वाटू लागली. ते होडीसारखं छत, अनेक ठिकाणी तसाच राहू दिलेला प्राकृतिक ओबडधोबडपणा, लोभावणारी अनियमितता, आतल्या खिडक्‍यांमधून ढगांचे पुंजके नि झाडांमधलं वारं जाणवणं. आतून बाहेरपण कळणं नि बाहेरून आतल्या खोलीविषयी कुतूहल दाटलेलं राहाणं... कमाल!

ठरावीक पठडींच्या या धाडशी मोडतोडीने ‘मेमरीज इन मार्च’मधला संवाद आठवला. सामान हलवायचं ठरल्यावर ती सांगते, फिशटॅंक घेऊन जा. तो म्हणतो, ‘ही कल्पनाच मला पसंत नव्हती तेव्हाही. कुठलंही सळसळतं जगणं कैद होण्याचं मला दु:ख वाटतं. पक्षी दिसला ठेवा पिंजऱ्यात, सुंदर मासा दिसला सजवा पेटीत. प्रत्येकाला का घालायचं चौकटीत? मोकळं करा, ते जे आहेत तसे असू द्या त्यांना.’ थोड्या वेळानं मात्र तिची अस्वस्थता बघून म्हणतो, मी घेईन त्यांना. मला हे कंफर्टेबल नसलं तरी तुझ्यामाझ्या सिडला मासे आवडायचे.-आणि मी कोण हे ठरवणारा की त्यांनी बॉक्‍समध्ये राहावं की मुक्त व्हावं. कदाचित ती छोटी पेटी हेच त्यांचं जग असेल. त्याबाहेर जगणं अवघड असू शकेल त्यांच्यासाठी.- रचना इमारतींची असो किंवा आपल्या जगण्यातली. तिची कारणं, कृती, परिणाम याचे अर्थ लावता नि सांगता यायला हवेत. तारतम्य नि मूल्यनिर्णय आपली रिस्क!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com