पहाटपावलं : लेडी बिट्‌स...

सोनाली नवांगुळ
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

शीर्षक होतं ‘लेडी बिट्‌स’ नि त्याखाली उपओळ होती, ‘मला आता गर्भाशय का नाहीये आणि हे मी सगळ्यांना सांगायचं का ठरवलंय...’ पुढे ती एकेक गोष्ट सांगत जाते. ती म्हणजे अनुष्का शंकर. अतिशय कुशल आंतरराष्ट्रीय प्रयोगशील सतारवादक, स्वतंत्र निर्भय स्त्री. दोनदा शस्त्रक्रिया करून म्हणजे हिस्टेरेक्‍टॉमी करून तिचं गर्भाशय काढलं.

शीर्षक होतं ‘लेडी बिट्‌स’ नि त्याखाली उपओळ होती, ‘मला आता गर्भाशय का नाहीये आणि हे मी सगळ्यांना सांगायचं का ठरवलंय...’ पुढे ती एकेक गोष्ट सांगत जाते. ती म्हणजे अनुष्का शंकर. अतिशय कुशल आंतरराष्ट्रीय प्रयोगशील सतारवादक, स्वतंत्र निर्भय स्त्री. दोनदा शस्त्रक्रिया करून म्हणजे हिस्टेरेक्‍टॉमी करून तिचं गर्भाशय काढलं. कारण; तिला भयंकर वेदना होत होत्या, हळूहळू गर्भाशयातल्या फायब्रॉइड्‌ची वाढ इतकी जास्त होत गेली, की तिचं पोट ती सहा महिन्यांची गर्भार असावी, असं दिसायला लागलं होतं.

काही फायब्रॉईड्‌सनी तिच्या स्नायूंच्या आतली जागाही व्यापली व ते पोटातून आपलं अस्तित्व दाखवायला लागलं होतं. डॉक्‍टरांनी गर्भाशय काढण्याबद्दल सांगितल्यावर मात्र अनुष्का हवालदिल झाली. ही सगळी अवस्था तिनं आपल्या ‘इन्स्टाग्राम’ पोस्टमध्ये जाहीर केली. नैराश्‍याचे, मनातल्या गोंधळाचे सगळे टप्पे न लपवता चर्चेस आणले.

शस्त्रक्रिया सुचवली गेली त्या वेळेबद्दल सांगताना ती म्हणते, ‘काही काळासाठी मला तीव्र निराशेनं घेरलं. गर्भाशय नसेल तेव्हा मी स्त्री उरेन काय या विचारानं मी गांगरून गेले. भविष्यात मला आणखी एक मूल हवं वाटलं तर? शस्त्रक्रियेदरम्यान माझा मृत्यू झाला, तर माझ्या मुलांना आई कुठली? लैंगिक आयुष्याचं काय? मग जवळचे मित्रमैत्रिणी नि कुटुंबीयांशी बोलल्यावर कळलं की त्यातल्याही खूप जणींना या दिव्यातून जावं लागलंय, तर मग कुणीच कधी का चर्चा केली नाही? गर्भाशय काढणं ही इतकी साधारण गोष्ट आहे तर त्याबद्दल मौन का? हे दु:ख कोपऱ्यात, एकांतात का सहन करतात बायकामुली? मुळात मी इतकी मोकळी आहे की कुठलाही विचार, अनुभव शेअर करण्यात कसलीच भीड मला नाही, तरीही स्वत:च्या गर्भाशयाबाबतीत निर्णय घेताना लैंगिक स्वातंत्र्य, आरोग्य, मासिक पाळीचं चक्र, प्रजोत्पादन या सगळ्यांभोवती चुप्पी नि शरम का दाटून आली?’ 

अनुष्कानं हे बोलून दाखवलं तर एक बाई म्हणाल्या, ‘बाईपणाच्या या गोष्टी मिरवण्याच्या थोड्याच असतात! आणि त्यानंतर आपली पाळी केव्हा सुरू झाली त्यापासूनचा सगळा ‘गायनोकॉलॉजिकल सीव्ही’ अनुष्का देते. मासिक पाळी नि दोन बाळंतपणाच्या काळात सहन करण्याच्या टोकाच्या प्रसंगांबद्दल सांगते. डोकेदुखी, वेदनेनं गडाबडा लोळणं, जंतुसंसर्ग, अपुरी झोप व त्यातून स्वत:चं काम करण्याची एनर्जी टिकवणं या सगळ्याच झुंजीबद्दल ती बोलते नि जणू विचारते, ‘बायका आपली मुलं, मौजमस्ती इतका आवाज करत समाजमाध्यमांवर झळकवतात. मग त्या चित्रामागची आपली दुखणी, पिळवटणं का लपवून ठेवतात? का स्तब्ध राहून सोसण्याला जवळ करतात? प्रजोत्पादनापलीकडे स्त्री माणूस म्हणून स्वत:ची बूज राखते काय? प्रतिष्ठा देते काय?’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Sonali Navangul