पहाटपावलं : का? का? कशामुळं?

Sonali-Navangul
Sonali-Navangul

इवान सतत अस्वस्थ असतो. मयूर म्हणाला, ‘आजकाल असंच असतंय. तिसरीत गेलेत हे नि परीक्षा आमची चाललीय. रोजच्या दीडदोनशे प्रश्‍नांची उत्तरं देईस्तोवर पुरेवाट होतीय. झेंडावंदन करून आला. म्हणाला, बाबा, का फडकवायचा झेंडा?’ मयूरनं सांगितलं, ‘या दिवशी स्वातंत्र्य मिळालं देशाला.’ म्हणाला, ‘कुठून मिळालं?’ तर इंग्रज वगैरे जमेल तसं त्यानं सांगितलं. पुढं आणखी की ठिकाय, पण मग २६ जानेवारीला परत का झेंडा फडकवायचा? मयूर तेही सांगायला लागला, पण प्रजासत्ताकाचं जरा अवघड जात होतं.

तितक्‍यात इवानच म्हणाला, ‘अरे, सगळे इंग्रज एकावेळी गेले नसतील, थोडे उरले ते जानेवारीत गेले असतील. त्यामुळं पुन्हा ध्वजवंदन.’ पुढं कधीतरी कुणी कसले शोध लावले त्याचा अभ्यास सुरू झाला. म्हणाला, ‘क’ असं कुणी ठरवलं असेल? शोध लावला असेल? मयूर आदिमानव नि गुहेतली चित्रांची भाषा सांगायला लागला. तर म्हणाला, ‘ते ठिकाय, पण इंग्रजीत लहान नि मोठं अक्षर कशाला लिहीत असतील? मला लहान लिपीतलं ‘जी’ वगैरे काढायला अजिबात आवडत नाही. माझं स्पेलिंग लहान किंवा मोठ्या दोन्ही लिपींत लिहिलं तरी तेच होतं. कशाला उगीच लक्षात ठेवायला लावतात!

उपयोग नाही तर ठेवायचं कशाला.’ कधीतरी आला विषय आडनाव कुठून आलं याचा. मयूरनं सांगितलं, ‘दहा इवान असतील तर कुलकर्णी, कुंभार, शेटे, कांबळे की सुतार अशा आडनावानं कळतं ना कुठला ते.’ तेवढ्यानं भागलं नाही. म्हणाला, ‘सुतार, कुंभार आडनावं असतात?’ ‘-हो, कामावरून पण ठरतात आडनावं!’ त्यावर प्रश्‍न, ‘तू कलाकार आहेस तर तुझं आडनाव ‘कलाकार’ का नाही?’

कुठल्याही गोष्टीत ‘का?’ विचारल्याशिवाय मानवतच नाही त्याला. संकल्पना नीट कळावी म्हणून मग मयूर शोधत राहतो गोष्ट, कारण अमुक कळावंच अशी सुरसुरी मुलांना असते तोवर त्यातल्यात्यात लॉजिकलशी उत्तरं देत राहायला पाहिजे. पुढं मोठं होताना वेळ नि चौकसपणा गोठत जातो. अभ्यास करण्यापेक्षा चित्रं काढण्यात मज्जा येते इवानला. तर शाळेत जाण्यापूर्वी, आल्यानंतर आता फक्त चित्रंच काढायची असतात. सध्या पिकासोची चित्रं बघत त्याच्यासारखी रेघ मारायचा प्रयत्न करतो तो.

सगळेच नेहमीपेक्षा वेगळे आकार. एक चित्र समोर आलं ते वास्तवादी होतं जरा. खुर्चीत बसलेल्या बाईचं. पण खुर्ची नुसती आऊटलाइन काढल्यासारखी होती. म्हणाला, ‘खरंच काय बाबा, हे पिकासोनं काढलंय? हे वेगळं वाटायला लागलंय. बरं, मग ती बाई नीट आहे तशी खुर्ची नीट का नाही काढलीय?’ मयूर म्हणाला ‘त्याची स्टाइल आहे अरे ती.’ तर गंभीर तोंड करत म्हणाला, ‘तसलं काही नाही. मला माहितीय, कारण नसताना पिकासोनं आळशीपणा केलाय!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com