ध्येयाच्या ‘दुर्गम’ वाटेवर संवेदनशील साथ

दुर्गम भागातील ‘साने गुरुजी रुग्णालय’.
दुर्गम भागातील ‘साने गुरुजी रुग्णालय’.

आदिवासीबहूल किनवट तालुक्‍यात ध्येयवादी डॉक्‍टरच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या रुग्णालयात आता ‘अतिदक्षता विभाग’ही सुरू करण्यात आला असून, त्यासाठी पुण्यातील डॉ. कांचन जोशी यांनी आर्थिक सहकार्याचा हात उत्स्फूर्तपणे पुढे केला. या समाजोपयोगी प्रकल्पाविषयी.

मराठवाड्याच्या उत्तर पूर्व टोकाला नांदेड जिल्ह्यात आदिवासीबहूल किनवट तालुका आहे. डोंगराळ भागातील जनता अज्ञान, दारिद्र्य याबरोबरच प्रशासकीय अनास्थेचा सामना करत करत कसेबसे दिवस काढत असते. या गावात २५ वर्षांपूर्वी अशोक बेलखोडे या ध्येयवेड्या डॉक्‍टरने ‘साने गुरुजी रुग्णालया’ची स्थापना केली. विदर्भातील या तरुणाने औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असताना आपल्या इतर मित्रांसोबत ‘हॅलो’ या आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या चळवळीत आपले भरीव योगदान दिलेले आहे. औरंगाबादमध्येच अशोक यांचा साने गुरुजी कथामाला, राष्ट्र सेवा दल या संघटनांशी संपर्क झाला. ‘आंतरभारती’ प्रवृत्ती रुजविण्यासाठी झटणाऱ्या यदुनाथ थत्ते यांच्या मार्गदर्शनाने ते प्रभावित झाले. पुढे बाबा आमटे यांच्या प्रेरणेने निघालेल्या ‘कन्याकुमारी ते काश्‍मीर’ आणि ‘इटानगर ते ओखा’ अशा दोन ‘भारत जोडो’ सायकल यात्रांमध्ये ते होते. सायकल यात्रेतून त्यांना खऱ्या भारताचे दर्शन घडले आणि त्यांच्या भावी कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

एम.एस. झाल्यानंतर त्यांनी शहरी भागातील सुबत्तेच्या संधी नाकारून किनवटचा रस्ता धरला. बाबा आमटे यांनी डॉ. अशोक बेलखोडे यांच्याकडून शब्द घेतला होता, की आयुष्यभर किनवटच्या आदिवासी, गोरगरीब जनतेची साथ सोडणार नाही. किनवटमधे हळूहळू साने गुरुजी रुग्णालय उभे राहिले.

बहुसंख्य आदिवासी आणि बंजारा समुदायाच्या जनतेला रुग्णालयात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवतानाच त्यांचे पाडे, तांडे आणि वस्त्यांवर जाऊन आरोग्य व तपासणी शिबिरे यांचा धडाका डॉ. अशोक बेलखोडे आणि सहकाऱ्यांनी सुरू केला. महाराष्ट्र- आंध्र सीमेवरील जवळपास ३९२ खेड्यांतील हजारो गावकऱ्यांना साने गुरुजी रुग्णालयाच्या सेवेचा आधार आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांसोबतच हजारो छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया इथे मोफत किंवा माफक दरात झालेल्या आहेत. डॉ. अशोक यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या नऊ-दहा जिल्ह्यांत जवळपास दीड लाख किलोमीटरचा प्रवास करून आजवर ८८ हजार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रेरणांशी नाते राखण्यासाठी ‘भारत जोडो युवा अकादमी’ या धर्मादाय संस्थेमार्फत हे रुग्णालय चालविले जाते. 

आरोग्यसेवा पुरवितानाच साने गुरुजी कथामालेच्या वतीने परिसरातील कुमारवयीन मुली-मुलांशी आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने युवती-युवकांशी संवाद करत, त्यांची शिबिरे घेत भारतीय संविधानाला अपेक्षित आदर्श नागरिक घडवण्याच्या राष्ट्रकार्यातही डॉ. अशोक कार्यरत असतात. 

किनवट आणि आजूबाजूच्या तालुक्‍यांतील हजारो नागरिकांना आजही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी; तसेच गंभीर व तातडीच्या आजारांसाठी हैदराबाद, नांदेड किंवा यवतमाळला जावे लागते. डोंगराळ जंगल भागातून २५०-३०० किलोमीटरवरील आधुनिक रुग्णालय गाठेपर्यंत कित्येक रुग्ण मध्येच जीव गमावतात. ही अडचण दूर करण्यासाठी किनवट येथे माफक दरात सुविधा देणारे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा संकल्प डॉ. अशोक बेलखोडे आणि सहकाऱ्यांनी सोडला आहे. त्यांच्या या कामाविषयी कळताच ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या स्नुषा डॉ. कांचन जोशी यांनी सहकार्याचा हात पुढे केला. एसेम यांचे चिरंजीव दिवंगत डॉ. अजेय जोशी हे पुण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ होते. त्यांनी व डॉ. कांचन यांनीही पुण्यात हजारो गरीब बालकांना कधी मोफत, तर कधी माफक दरात उपचार केले होते. डॉ. अजेय यांच्या स्मरणार्थ किनवटच्या रुग्णालयात बालकांसाठीचा ‘आय.सी.यू.’ विभाग सुरू करण्यासाठी डॉ. कांचन अजेय जोशी यांनी आपल्या कमाईतून पंचवीस लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. 

डॉ. अशोक बेलखोडे आणि सहकाऱ्यांच्या ध्येयवादी वाटचालीला मिळालेला हा संवेदनशील प्रतिसाद समाजात सकारात्मक संदेश रुजवणारा आहे. रविवारी १७ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे एस. एम. जोशी जयंतीनिमित्त होत असलेल्या ‘गझलरंग’ या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते या मदतीचा धनादेश प्रदान कार्यक्रम होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com