पहाटपावलं : प्रत्यय आंतरिक ऐश्वर्याचा

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure

आली आली म्हणता सरली की दिवाळी. अर्थात फराळाचे जिन्नस संपेतो तशी बरीच लांबतेही. नातेवाईक, शेजारी नि मैत्रिणींकडून आलेल्या फराळाच्या ताटातले जिन्नस अद्याप चाखायचे आहेत. दरवर्षी दिवाळीत एखादा हटके पदार्थ त्यातून गवसतो. मग त्याच्या रेसिपीची देवाण-घेवाण, स्वत: तो आजमावून बघणं, जमल्यास आनंद द्विगुणीत, नसल्यास मूळ कर्त्याकडं सपशेल शरणागती नि तिच्या सुगरणपणाचं आणखीनच कौतुक याशिवाय माझी दिवाळी सफल होत नाही. त्याच पणत्या, रांगोळ्या, आकाशकंदील, फराळ, घराची सजावट, झेंडूच्या माळा, किल्ले, फटाके... पण मातीच्या पणत्यांना सुरेख रंग देऊन मणी-टिकल्यांनी त्या सजवून एकमेकींना देता-घेताना आणि एकमेकींचं कौतुक करताना होणारा आनंद प्रत्यक्ष ते दिवे उजळवण्यापेक्षा अधिक असतो. कधी तरी येईल उपयोगाला म्हणून अडगळीत जपलेल्या वस्तूंपासून घरातली बच्चेमंडळी ‘यू-ट्युब’च्या मदतीने अफलातून आकाशकंदील बनवतात. विकतच्या नाजूक नक्षीदार कंदिलापेक्षा तो कितीतरी कलात्मक भासतो. किल्ला उभारताना मुलांनी अंगणात केलेला विटा-मातीचा राडा पाहून करवादली नाही ती आई कसली?

पण किल्ला पूर्ण झाल्यावर शिवराय नि मावळ्यांच्या मातीच्या मूर्ती ठेवून मुलं एकमुखानं गजर करतात, ‘हर हर महादेव!’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ तो ऐकताना आतून जी थरथर जाणवते नि स्फुरण चढतं तशी मी तरी केवळ नाटकातल्या एंट्रीपूर्वी विंगेत उभी असताना अनुभवलीय. मुलीनं दारात रेखलेली रांगोळी नि त्यात भरलेले रंग निरखताना कौतुकाचं पाणी डोळ्यांत तरारतं नि एकदमच जाणीव होते, मुलगी मोठी झालीय हं आपली.

केशरी-पिवळ्या झेंडूबरोबर आंब्याची पानं लावून केलेल्या लांबलचक माळा काय किंवा नाजूक-साजूक करंज्या काय, हे वेळखाऊ प्रकार करताना रंगलेला अंताक्षरीचा खेळ केवढी मजा आणतो. दोन पिढ्यांमधलं अंतर चुटकीसरशी दूर होतं. नव्या कपड्यांचा नि उटणं-साबणाचा सुगंध, फराळाचा आस्वाद, फटाक्‍यांची आतषबाजी, नातेवाईक-मित्रमंडळींच्या भेटीगाठी यात तर दिवाळीचा आनंद दडलेला आहेच; पण तो शतगुणित होतो पहाटेच्या संगीत मैफली नि खास मराठीजनांचं वैशिष्ट्य असलेल्या दिवाळी अंकांच्या आस्वादाने. ‘आई गं, ओवाळणीचे पैसे सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्त मुलांना मदत म्हणून पाठवूया का?’ अशी विचारणा कानावर पडते आणि पंचेंद्रियांची तृप्ती करणारा भौतिक समृद्धीचा हा सण आंतरिक ऐश्वर्याचा आणि समाधानाचाही प्रत्यय देऊन जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com