पहाटपावलं : ऐक ना जरा...

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure

‘ये रे ये रे पावसा’ अशी प्रार्थना करणारे आपण अवघ्या पंधरवड्यात ‘नको नको रे पावसा’ अशी आळवणी करायला लागलो आहोत. चराचराला चैतन्याचं दान देणारा पाऊस यंदा अधिकच बरसतोय. उन्हाशी लपंडाव खेळत, लता-वेलींशी झिम्मा खेळत येणाऱ्या नाजुक-साजुक श्रावणसरींनी अक्राळविक्राळ रूप धारण केलं. रानावनाला, शेतशिवाराला झोडपत पावसाचं पाणी नदी-नाल्यांतून उधाणलं. उसळत-घुसळत फेसाळत गावां-शहरांत शिरलं. धरणं तुडुंबली. काठावरच्या देवळांच्या पायरीशी भाविकपणे थबकणारं पाणी गाभाऱ्यात शिरलं. झाडा-माडांच्या शेंड्यांवर चढलं. लहान-मोठ्या खोपटांमध्ये घुसून धुडगूस घातला. दशदिशांत पाणीच पाणी. रस्त्यांच्या नद्या झाल्या. 

मोटारींच्या जागी बोटी धावल्या. डोंगर खचले. रस्त्यावर आले. ‘भूतली चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी अवस्था. अन्नान्न दशा झाली. मुक्‍या जनावरांनी तर निमूट जलसमाधी घेतली. माणसाच्या मनातल्या द्वेष-मत्सरासारखं बेफाम फुगत राहिलं पुराचं पाणी. त्याच्या रौद्ररूपानं भयभीत माणसानं सामूहिक आकांत मांडला, तेव्हा आल्या वाटेनं माघारी परतलं पाणी. नदीपात्रातून सागरात गुडुप्प होताना पुटपुटलं स्वत:शीच, ‘हा माणूस केव्हा शहाणा होणार? समुद्राच्या खारेपणात मिसळून अस्तित्वशून्य होण्याऐवजी विहिरी-तलावात राहून माझं ‘स्व’त्व जपायला आवडतं मला, हे कळत नाही का या बुद्धिमान माणसांना? का नाही माझा थेंब न्‌ थेंब जमिनीत मुरवत? का वाहून जाऊ देतात मला शेतशिवारातून? बांध घालून अडवलं तर राहीन की मी आनंदानं तिथंच. झिरपेन जमिनीत. पिकवत राहीन शेत-मळे. फुलवत राहीन बाग-बगीचे. हसवत राहीन फुला-मुलांना. बहरणाऱ्या जीवसृष्टीला पाहून मीही कृतार्थ होईन.

काठांची बंधनं झुगारून बेबंद वागायला मलाही नाहीच आवडत. अफाट लोकसंख्येच्या वाढत्या गरजा, भौतिक प्रगती, सुशोभीकरण नि काय काय नावं देऊन नदीचं अस्तित्वच संपवून टाकायला लागली ही माणसं तर मी राहणार कुठं? वाहणार कुठून? सगळ्या जमिनीवर यांनी कॉन्क्रीटचं जंगल उभं केलं तर मी भूगर्भात शिरायचं कसं? जंगलं उजाडली. कुरणं गेली. नाले- तलाव बुजले. नदीपात्रं आक्रसली. मग नाईलाजानं पसरावे लागतात मला माझे हातपाय... सैलावण्याकरिता. ‘क्रूर, उद्दाम, मनमानी’ नि कसकसली शेलकी विशेषणं बहाल केलीत मला. पण तुम्हाला तडफडताना पाहून मलाही आनंद नाही होत. ‘जीवन’ म्हटलंयत ना मला, मग ‘मृत्यु’दूत कसा होऊ? बा माणसा, समजून घे माझी तडफड!’ गहिवरल्या पाण्याच्या डोळ्यांतून पाझरला अश्रू आणि मिसळला अथांग सागरात. पाण्याचे हे शहाणे बोल जरा ऐक ना माणसा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com