पहाटपावलं : शोध कस्तुरीचा

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure

सकाळची प्रसन्न वेळ. पिवळी उन्हं सभोवार सांडलेली. घरासमोरच्या मोकळ्या जागेत एका लहानग्याचा खेळ रंगलेला. एकट्यानंच. खेळ होता आपल्याच सावलीला पकडण्याचा. तो छोटू दबा धरून बसायचा आणि सावली स्थिर झालीय याची खात्री पटताच झेपावायचा. अर्थातच सावलीही त्याच वेगानं पुढे निसटून जायची. आपल्या चंचल स्वभावाला न शोभणारा गांभीर्याचा आव आणून त्या मुलाचा खेळ चालला होता. त्या प्रयत्नात तो अनेकदा पडला. गुडघे फुटले. कोपरांना खरचटलं. पण नाउमेद न होता तो प्रत्येक वेळी सर्वशक्तीनिशी धावायचा. या वेळी आपण सावलीला नक्की पकडणार, या खात्रीनं झेप घ्यायचा. पण व्यर्थ! अखेर तो जेरीस आला.

भोकाड पसरण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात दुरून ही गंमत पाहणारे गणपती बाप्पा मानवरूपात त्याच्या जवळ आले आणि म्हणाले, ‘बाळ, तुला तुझी सावली पकडायचीय ना? मग आधी स्वत:ला पकड.’ काही न कळून तो छोटू त्यांच्याकडे नुसताच पाहत राहिला. बाप्पा पुढे झाले. त्यांनी त्या मुलाचा हात उचलून त्याच्या डोक्‍यावर ठेवला आणि सावली दाखवली. सावली पकडल्याच्या आनंदात मुलगा खूष होऊन नाचू लागला. लहानपणी गणेशोत्सवातच ऐकलेली ही गोष्ट आज अचानक आठवली आणि अंतर्मुख करून गेली. आपलीही अवस्था त्या अजाण बालकासारखीच झालीय.

हव्यासाच्या सावल्या सभोवार वाकुल्या दाखवत असतात आणि आपण मूढासारखे धावत राहतो त्यांना पकडायला. उरीपोटी धावून एकीला पकडावी, तर दुसरी वेडावत उभी ठाकलेली. किती पकडायच्या? किती धावायचं? कुठवर? मुळात धावण्याची गरज आहे काय? गोष्टीतल्या बाप्पांनी सुचवल्याप्रमाणं, स्वत:ला पकडलं तर या खुणावणाऱ्या सावल्या राहतील आपल्या कह्यात? हे म्हणजे त्या कस्तुरीमृगासारखंच झालं. ज्या कस्तुरीचा आयुष्यभर बाहेर शोध घेत राहतो, मिळत नाही म्हणून अकांडतांडव करत राहतो ती मिळणार कशी? ती तर आपल्याच आत आहे. धावाधाव न करता स्थिर बुद्धीनं स्वत:ला पकडलं तर स्वसामर्थ्याचा उलगडा होईल. क्षमतांचा पडताळा येईल. स्वत:ला घडवता येईल. चंचल वृत्तीनं आपण धावतोय म्हणून तर आपली सावलीही धावतेय. पण निर्धारानं आपण स्थिरावलो, तर तीही स्थिरावणार आहे. आपल्या पकडीत राहणार आहे. मग डोकावूया ना अंतरंगात! स्वत:वर विसंबायला शिकूया. स्वत:ला आजमावून पाहूया. वाटतं तितकं सोपं नाहीये हे. पण अशक्‍यही नाहीये. आपल्या अंतरातच दडलेली, पण शोधायला कठीणतम अशी कस्तुरी मिळेलही प्रयत्नांती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com