पहाटपावलं : डिलीट इट!

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure

बालपणी, प्रत्येक रविवारी सकाळी दप्तराची साफसफाई करण्याचा दंडक आमच्याकडे होता. सगळी वह्या-पुस्तकं नि कंपास बॉक्‍स बाहेर काढून दप्तर झटकताना त्यातल्या अनेक वस्तू-शिसपेन्सिलीला टोक करताना पडलेला भुस्सा, कागदांचे बोळे, इतरांपासून लपवून खाताना राहून गेलेली चिंचा-बोरं, चिकट झालेल्या चुकार रेवड्या, लेमन गोळ्या नि काय काय... त्यातून बाहेर पडायच्या. सफाईनंतर वेळापत्रकाप्रमाणं दप्तर पुन्हा भरलं की आठवडाभर काळजी नसे. या मोहिमेत बऱ्याचदा हरवलेलं सुवासिक खोडरबर, स्टिकर, पोस्टाचं तिकीट, आवडत्या क्रिकेटरचा फोटो, लोहचुंबकाचा तुकडा यांचा शोध लागायचा आणि ती साफसफाई मोहीम सार्थकी लागायची.

महिन्यातून एकदा कपड्यांचं कपाट आवरतानाही काहीसा असाच अनुभव यायचा. लहान होत असलेले, विटले-विरलेले कपडे वजा करणं, जोड्यांनुसार कप्प्यांमध्ये त्यांची व्यवस्थित रचना करणं, अशा सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमुळं रोजची कामं सुकर व्हायची. कितीतरी वेळ वाचायचा.

बालपणापासूनची ही स्वच्छता-टापटिपीची शिस्त अद्याप टिकून आहे, हा माझा समज कसा गैर आहे. याची प्रचिती परवा माझ्या संगणकानं मला दिली. आवडलेल्या कविता, संदर्भासाठी उपयुक्त माहिती, निवांतपणे वाचूया म्हणून जमवलेले लेख, सवडीनं पूर्ण करूया म्हणून जपलेलं आपलंच काही लेखन, कुटुंबीय नि मित्रमैत्रिणींचे फोटो, व्हिडिओ, दुर्मीळ गाणी नि काय काय... सुरवातीच्या उत्साहाच्या काळात नावानिशी सेव्ह केलेल्या फाइल्स वगळता इतर शेकडो निनावी फाइल्स तर गेल्या कित्येक दिवसांत काय, महिन्यांतदेखील उघडून पाहिल्या नसतील. पण, आता संगणकाची साठवण क्षमता तुडुंबल्यानं आणि नवं काही स्वीकारण्यास त्यानं चक्क नकारच दिल्यानं नको असलेल्या गोष्टी डिलीट करणं आवश्‍यक होतं.

कधीतरी उपयोगी पडतील म्हणून साठवलेल्या या गोष्टी आपल्या संग्रही आहेत हेही विस्मरणात गेलेलं. मग ठरवलं, यापुढं घराबाबतचे स्वच्छतेचे नियम संगणकालाही लागू करायचे. अनावश्‍यक कचरा जमवायचा नाही. जमवलाच तर वेळच्या वेळी त्याची विल्हेवाट लावायची. शक्‍यतो रोजच्या रोज. किमानपक्षी आठवड्यातून एकदा. हाच नियम स्मार्ट फोनलाही लागू. हे ठरवत असताना वाटलं आपण संगणक नि फोनची काळजी करतोय, पण आपल्या मेंदूचं काय? साठवण क्षमता तुडुंब होऊन त्यानंही असहकार पुकारायच्या आत त्याचीही साफसफाई करायला हवी. त्यात केव्हापासून किती किती साठलेलं, दडपलेलं आहे. कदाचित तळाशी सडलं-कुजलंही असेल. देऊया तिलांजली त्यांना? आतून आवाज आला, ‘गो! डिलीट इट!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com