पहाटपावलं : आठवते मज अजूनही...

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure
Updated on

‘व्वा, व्वा, अशी कशी विसरेन? माझ्या नीटच लक्षात आहे, वाढदिवशी तुला सदिच्छा देणारा पहिला फोन माझा असेल. बघशील तू...’ माझ्या या फुशारक्‍यांवर काहीही प्रतिक्रिया न देता मित्र फोनबंद करतो. ‘मी येऊ बघायला की तू येतेयंस?’ रात्री नऊ वाजता त्याचा फोन. क्षणात ट्यूब पेटते.

मग नेहमीचंच खरं तर सकाळी सहा वाजता होतं लक्षात, पण तुझी झोपमोड नको म्हणून... वगैरे. मित्र समजुतीचं हसून शुभेच्छा स्वीकारतो.चहात साखर टाकायला विसरलेली असते नि माझा बहाणा, ‘शक्‍यतो साखर टाळा असं सांगतात ना डॉक्‍टर म्हणून...’ वरून साखर घेताना मैत्रिणीच्या चेहऱ्यावर समजुतीचं हास्य विलसतं. ऑफिसातली कुणी सखी विचारते, ‘कारवाँ गुजर गया...’ गाण्याच्या सुरवातीच्या ओळी कायआहेत गं?’

घोळताहेत ओळी, पण नेमकेपणानं आठवत नाहीत, अशी काहीतरी माझी स्थिती होते. ‘गुगल सर्च’चा पर्याय टाळते नि मेंदूला कामाला लावते. या गाण्याशी निगडित असंख्य आठवणींची मनात गर्दी होते. त्या ओघात, पहिल्यांदा ‘रेडिओ सिलोन’वर हे गीत ऐकलं तेव्हाची दिग्मूढ अवस्था आठवते. वहीत उतरवलेलं भारावलेपण आठवतं नि अचानक मनाच्या तळाशी तरळणाऱ्या त्या ओळी उसळी मारून वर येतात, ‘स्वप्न झडे फूल से, मीत चुभे शूल से...’  सखीकडे धावते नि उत्साहाने तिला गाण्याची सुरवात सांगते. ‘अगं, मी गुगलवरून मगाशीच...’ सांगताना सखीच्या चेहऱ्यावर तेच सुपरिचित समजुतीचं हसू असतं. संध्याकाळी रमतगमत फिरताना कुठूनतरी भाकरी खरपूस भाजल्याचा वास येतो नि लहानपणी शेतावरल्या मुक्कामी आस्वादलेली भाकरी, पेंडपाला, कारळाची चटणी नि दही ही गावरान मेजवानी आठवते. रात्रीच्या जेवणासाठी तोच मेनू ठरतो. चुलीवरल्या नसल्या तरी अस्सल सोलापुरी दगडी ज्वारीच्या टम्म फुगलेल्या शुभ्र भाकरीसह पेंडपाला तयार. मग चटणी करण्याकरता कारळाचा शोध.

गावाकडले कारळ नुकतेच मैत्रिणीने दिलेले. वरचे-खालचे, पुढचे-मागचे सगळे डबे पाहून होतात. पण... मी रुखरुखत पानात शेंगदाण्याची चटणी लावते, तेव्हा मुलांच्या नजरेत समजुतीचं हास्य उमलतंच. या समजुतीच्या हास्याची अलीकडं जास्तच उधळण व्हायला लागली, म्हणून निरनिराळ्या वस्तू काही क्षण पाहून नंतर त्या आठवून लिहून काढण्याचा स्मरणशक्तीचा खेळ मी आता पुन्हा खेळायला लागलेय. लहानपणी स्मरणयादी मोठी असायची, आता विस्मरणयादी असते. पण स्मरणयादीतल्या थोड्याशा नोंदीही मला सुखावतात आणि मी समजुतीचं हसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com