पहाटपावलं : ‘सफर’

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure

नुकताच दिवाळीच्या निमित्तानं प्रवास घडला. अक्षरश: घडला. पूर्वी तीर्थयात्रा घडायची तद्वत. हिंदीतली ‘सफर’ इंग्रजीतल्या ‘सफर’ची अनुभूती देणारी ठरली. हाती-पायी धड पोचू की नाही, याचीच शाश्वती नसल्यानं, मुक्कामाला केव्हा पोचू हा प्रश्न मनात उद्‌भवतच नव्हता. रस्त्यांची चाळण झालेली. रस्त्यावरच्या खड्ड्यांवर फुटकळ विनोद करून स्वत:च्या हतबलतेवर हसत प्रवास चाललेला. कासवगतीनं. या खडतर प्रवासात अनुभवलेली अत्यंत सुखावह गोष्ट म्हणजे रहदारीची शिस्त. बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली होती. पण कर्कश हॉर्न्स नाहीत की रांग मोडून पुढे घुसण्याचा आणि कोंडीत आणखी भर घालण्याचा अगोचरपणा नाही. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे त्यांच्या खोलीचा अंदाज येत नव्हता तेव्हा गावकरी स्वयंस्फूर्तीनं मार्गदर्शन करत होते. एरव्ही रस्ता आपल्याच मालकीचा असल्याच्या आवेशात रहदारीच्या नियमांची पर्वा न करता बेफाम सुटणारे वाहनचालक कुठे गायब झाले होते कुणास ठाऊक?

अक्षरश: ताशी वीस किलोमीटरच्या संयमी गतीनं प्रवास करतानाही कोणत्याच वाहनचालकाला घाई नव्हती. वेगाचं आकर्षण घरी सोडूनच जणू प्रत्येक जण प्रवासाला निघाला होता. मैलोन्‌ मैल त्याच संथ गतीनं गाडी हाकारतानाही कुणी वैतागून आततायीपणा करत नव्हतं. छोट्या गावांमधले रस्ते तर नावालाच शिल्लक राहिलेले त्यामुळं गती आणखी मंदावायची. तरीही वाहन चालवण्याच्या कौशल्याचं नाहक प्रदर्शन कुणी करत नव्हतं. इथे कौशल्यापेक्षाही कसोटी होती संयमाची, धैर्याची. ना पोलिसांची, ना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर. तरीही रहदारीच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन. कारण ‘अति घाई संकटात नेई’ हे प्रत्येक जण मनोमन जाणून होता. गाडी चालवताना सुस्तावायला संधीच मिळत नव्हती. 

नजर पोचेल तिथवर खड्डेच खड्डे पाहण्याची नजरेला इतकी सवय झालेली होती की प्रदीर्घ काळानंतर सुस्थितीतला रस्ता समोर आला, तर विश्वासच बसेना. तो गुळगुळीत रस्ता पाहून इतका वेळ शिस्तपालन करणाऱ्या वाहनचालकांच्या जणू अंगात काहीतरी संचारलं. वाऱ्याच्या वेगाने वाहनं पळवायला सुरवात झाली. कर्कश हॉर्न्स, ओव्हरटेकिंगची घाई, रहदारीच्या नियमांचं उल्लंघन सर्रास सुरू झालं. खराब रस्त्यांवर न दिसलेले अपघात इथे जागोजाग दिसू लागले. खडतर प्रवासात गिरवलेले स्वयंशिस्तीचे धडे इतक्‍या चटकन विस्मरणात जावेत? चारित्र्य घडवायला संकटं, अडचणी असायलाच हव्यात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com