पहाटपावलं : शोध खजिन्याचा!

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure

एका आळसावलेल्या दुपारी चॅनेल सर्फिंग करता करता एका ‘गेम शो’पाशी थबकले. सहभागी संघांना दडवलेल्या खजिन्याचा शोध घ्यायचा होता. खजिना काय ठाऊक नाही, कुठे दडवलाय माहीत नाही, कसा शोधायचा याची पूर्वकल्पना नाही. जागोजाग दडवलेल्या खाणाखुणांचा माग काढत, त्यांचा अर्थ लावत खजिन्यापर्यंत पोचायचं. खेळात सहभागी दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी पाच खेळाडू. या खेळात शारीरिक कौशल्य, ताकद, चापल्याबरोबरच कसोटी होती संयम, धैर्य, बुद्धिचातुर्य, प्रसंगावधानता आणि संघभावनेची.

चांगली आघाडी घेणारा संघ आरामात खजिन्यापर्यंत पोचेल असं वाटत असतानाच क्‍लू गुंतागुंतीचे होत चालले तसतसा गोंधळू लागला. विचार आणि कृती यातली सुसूत्रता हरवत चालली. घाईघाईने निष्कर्षापर्यंत पोचून कृती केली जाऊ लागली. तोवर एकदिलानं काम करणाऱ्या संघात आता अयशस्वी प्रयत्नांचं खापर एकमेकांच्या माथ्यावर फोडण्याची अहमहमिका सुरू झाली. संघभावना लयाला गेली. एकमेकांच्या क्षमतेवरचा विश्वास ढळला. ‘स्व’मत इतरांवर लादण्याच्या, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात संघ दिशाहीन झाला नि उद्दिष्टापासून भरकटला.

दुसऱ्या संघाने सुरुवातीला विचारविनिमय करून पूर्वयोजना आखण्यात, एकमेकांचे गुण- दोष विचारात घेऊन जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात वेळ घालवल्यानं त्यांची गती धीमी होती. खेळातली गुंतागुंत वाढत गेली तशी ती अधिकच मंदावली. पण अडचणी वाढत गेल्या, तरी वाटचाल योजनेबरहुकूम होती. क्वचित मतभिन्नता असली तरी समन्वयानं तोडगा निघायचा.

त्यामुळं कटुता टळत होती. आशा-निराशेच्या लाटेवर आंदोळतानाही एकमेकांच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहत नव्हते. कोडं यशस्वीरीत्या उलगडल्यावर सारे एकत्रितरीत्या आनंद व्यक्त करायचे, तसे अयशस्वी ठरल्यावर आणखी एकोप्यानं एकमेकांना धीर द्यायचे. शक्ती-युक्तीचा समन्वय साधत संघभावनेनं खेळणाऱ्या या संघाला खजिना गवसला हे वेगळं सांगायला नको. ससा-कासवाच्या गोष्टीची आठवणही अपरिहार्य.

आयुष्याचा खेळही असाच नव्हे काय? वाटचाल कितीही खडतर असो, दृढनिश्‍चयानं ईप्सित ध्येय गाठता येतं. मात्र, या वाटचालीत स्वत:प्रमाणेच कुटुंबीय, मित्रमंडळी, सहकारी जे कोणी आपले सोबती आहेत, त्यांच्या क्षमतेवर अढळ विश्वास हवा. मतमतांतरं असली, वादविवाद झाले तरी एकनिष्ठतेबाबत शंका नसावी. एकमेकांना उत्तेजन देत, यश-अपयश संयमानं स्वीकारत, पचवत, धैर्यानं पुढच्या वाटचालीस सिद्ध झाल्यास गवसलेच ना खजिना आपल्यालाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com