पहाटपावलं : निरोप

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure

आपली ही शेवटची भेट! निरोपाची वेळ! तसे निरोप घेण्याचे प्रसंग आयुष्यात अनेकदा येतात. विद्यार्थिदशेत आपल्या आवडत्या शाळा-कॉलेजला ‘टाटा, बाय-बाय’ करत, जिवलग मित्र-मैत्रिणींची साथ सोडून सोनेरी भविष्याच्या आशेने निवडलेली वाट आपण चालायला लागतो. नंतर व्यवसाय, नोकरी, बढती, लग्न अशा अनेक कारणांनी परिवार, आप्तेष्टांपासून ताटातूट अनुभवाला येते. मात्र, या वाटचालीत जुनं काही सुटतं, तसं नवं काही गवसतंही.

नव्या ठिकाणीही निर्व्याज प्रेम करणारे मित्र, उत्तम सहकारी, स्नेहशील शेजारी मिळतात. त्यांच्याशी मनाची तार जुळते. ते नवं ठिकाण, तिथले रस्ते, गल्ल्या, चौक, कट्टे, मार्केट, इमारती परिचयानं आपल्या वाटायला लागतात. घर-कार्यालयाच्या वास्तूंशी तर जिव्हाळ्याचं नातं जडतंच; पण त्यातल्या अनेक लहान-मोठ्या वस्तूंवरही नको इतका लोभ जडतो. घरातली खास आपली अशी विसाव्याची जागा असते. कार्यालयातला ताणतणाव जिरवणारा एखादा कोपरा आपण शोधलेला असतो.

दोस्तमंडळींबरोबर विरंगुळ्याची ठिकाणं धुंडाळलेली असतात. एखादी जागा अशी असते, जिथे जोडीदाराबरोबर निवांत क्षण अनुभवता येतात, तर काही जागा मुलांबरोबर धुडगूस घालण्याकरताच हेरून ठेवलेल्या असतात. हळवे निरोप देता-घेताना तिथे जोडली-मोडलेली नाती, घालवलेले हसरे- दुखरे क्षण, साजरे केलेले सण-उत्सव, घडले-बिघडलेले कार्यक्रम यांच्या आठवणींचं एक भलंमोठं गाठोडं आपल्यासोबत असतं. हाकारणाऱ्या भविष्याला सामोरं जाताना भूतकाळ धूसर झाला, तरी या आठवणींची शिदोरी आयुष्यभर रसद पुरवत असते. अस्ताला जाणारा सूर्य उद्याच्या आगमनाची ग्वाही देतो. पानगळीनंतर नवी पालवी फुटणार असते. गळून पडलेल्या फुलातूनच फळ आकाराला येतं. हा निसर्गाचा नियम आहे. आपण या निसर्गाचे एक घटक. मग या निसर्गनियमाला आपण तरी अपवाद कसे असणार?

निरोप देतानाच आपणही नव्याच्या स्वागतास सिद्ध होतो. किंबहुना सरणाऱ्या क्षणाच्या निरोपातच नव्याच्या स्वागताचं बीज रुजलेलं असतं. ‘पहाटपावलं’च्या निमित्तानं विचक्षण वाचकांशी वर्षभर संवाद साधता आला. दिलखुलास अभिप्राय मिळाले. भल्याबुऱ्याची चिकित्सा झाली. अनेकांनी कौतुकानं सोशल मीडियावर आवडलेला मजकूर पोस्ट केला. त्यावर चर्चा घडवली. या निमित्तानं नवे स्नेही मिळाले, तसे जुने नव्याने जोडले गेले. सदरासाठी आशय-विषयाच्या निवडीचं स्वातंत्र्य होतं, मात्र शब्दांचं बंधन होतं. परिणामी, लेखनात नेमकेपणा आला. सजगता वाढली. नियमितता आली. शब्दभांडार समृद्ध झाला. एकंदरीत ‘पहाटपावलं’ची शिदोरी पुढच्या मार्गक्रमणास नि:संशय बळ देईल. मन:पूर्वक धन्यवाद! नाताळ आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com