सायटेक : संकटांना तोंड देणार, की..?

सुरेंद्र पाटसकर
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

एखाद्या प्राण्याला अचानक संकटाचा सामना करावा लागतो किंवा एखादा शिकारी त्याच्यावर हल्ला करतो, त्या वेळी त्याच्या हृदयाची गती वाढते, श्‍वासोच्छ्वासाची गती वाढते आणि शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते.

एखाद्या प्राण्याला अचानक संकटाचा सामना करावा लागतो किंवा एखादा शिकारी त्याच्यावर हल्ला करतो, त्या वेळी त्याच्या हृदयाची गती वाढते, श्‍वासोच्छ्वासाची गती वाढते आणि शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते.

त्यातून पळून जायचे की संकटाचा सामना करायचा, याची तयारी तो प्राणी करत असतो. पळून जायचे का लढायचे? यापैकी जी काही प्रतिक्रिया असेल ते ठरविण्याचे काम अँड्रेनलाइन या संप्रेरकामुळे होते, असे मानले जात होते. परंतु कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी याला छेद दिला आहे. प्राण्यांना जी काही शारीरिक प्रतिक्रिया द्यायची आहे, ती त्यांच्या शरीराच्या सांगाड्यावर अवलंबून असते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. 

एखादी धोक्‍याची जाणीव झाली, की प्राण्यांचे मेंदू लगचेच त्याची सूचना संपूर्ण शरीरात पोचवितात. त्यानंतर हाडांशी संबंधित असलेले संप्रेरक ओस्टिओकॅल्सिन हे स्रवले जाते. किंबहुना, सर्व रक्तवाहिन्यांमधून हे संप्रेरक शरीरभर पाठविण्याच्या सूचनाच मेंदूकडून दिल्या जातात. उंदरावर केलेल्या अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे. 

तणावाच्या वेळी शरीराच्या प्रतिक्रियांचा अभ्यास
पाठीचा कणा असलेल्या सर्व प्राण्यांमध्ये ओस्टिओकॅल्सिन या संप्रेरकाच्या अस्तित्वाशिवाय एखाद्या संकटाच्या वेळी तातडीने प्रतिक्रिया देणे शक्‍य होणार नाही. तणावाच्यावेळी शरीर कशापद्धतीने प्रतिक्रिया देते याबाबतचे आतापर्यंतचे समज नव्या अभ्यासातून दूर झाले आहेत, असा दावा कोलंबिया विद्यापीठांतर्गत असलेल्या वेगेलोस कॉलेज ऑफ फिजिशिअन्स अँड सर्जनमधील जेनेटिक्‍स अँड डेव्हलपमेंट या विभागाचे प्रमुख गेरार्ड कारसेन्टी यांनी केला आहे.  हाडे म्हणजे केवळ कॅल्शिअमयुक्त नळ्या असे बरेच वर्षे समजले जात होते. परंतु हाडांच्या सापळ्याचा शरीराच्या इतर अवयवांवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास साधारणतः दहा वर्षांपूर्वी सुरू झाला आणि त्यातून परिणाम होत असल्याचेही सिद्ध झाले. हाडांच्या सापळ्यातून ओस्टिओकॅलसिन हे संप्रेरक स्रवत असल्याचेही अभ्यासातून दिसून आले. ओस्टिओकॅलसिन हे संप्रेरक रक्ताच्या बरोबरीने शरीरात पसरते, त्यामुळे स्वादुपिंड, मेंदू, स्नायू आणि इतर अवयवांवर परिणाम होतो, असे दिसून आल्याचे गेरार्ड यांनी सांगितले.

ओस्टिओकॅलसिनमुळे चयापचय क्रिया सुधारते. तसेच ग्लुकोज सामावून घेण्याची पेशींची क्षमता आणि स्मरणशक्तीही सुधारते आणि प्राण्यांना अधिक वेगाने पळण्यासाठी मदत करते. आघातापासून शरीराचे रक्षण करण्याचे काम हाडे करतात. हे रक्षण चांगल्या पद्धतीने व्हायचे असेल, तर त्यांची क्षमता महत्त्वाची आहे, तसेच त्यांचा प्रतिसादही. संकटापासून रक्षण करणाऱ्या यंत्रणेमध्ये हाडांचा समावेश नसेल, प्रतिक्रियेचा कालावधीही वाढेल. त्यातूनच ओस्टिओकॅलसिनचा हाडांशी असलेला संबंध स्पष्ट होते, असे गेरार्ड यांनी सांगितले.

संशोधकांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगांच्या वेळी ओस्टिओकॅलसिनचे महत्त्व स्पष्ट झाले. उंदरांसमोर कृत्रिम संकट निर्माण केले गेले. त्या वेळी दोन ते तीन मिनिटांत रक्तातील ओस्टिओकॅलसिनचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. हे प्रमाण वाढल्यानंतर उंदरांच्या हृदयाची गती, शरीराचे तापामान आणि शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. काही उंदरांमध्ये जनुकीय बदल करून ओस्टिओकॅलसिन स्रवणार नाही, अशी व्यवस्था केल्यानंतर त्यांनी संकट समोर असतानाही तातडीने प्रतिक्रिया दिली नाही, असे दिसून आल्याचे गेरार्ड यांनी सांगितले.

ओस्टिओकॅलसिनचा मानवी शरीरावरही परिणाम
ओस्टिओकॅलसिनचा मानवी शरीरावरही परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाल्याचे गेरार्ड यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी बोलताना किंवा उलटतपासमीवेळी किंवा एखाद्या कारणाने मनांत भीती उत्पन्न झाल्यास माणसाच्या शरीरातील ओस्टिओकॅलसिनचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले.
अवयवांच्या एकमेकांवर होत असलेल्या परिणामांबाबत गेल्या १५ वर्षांत बरेच संशोधन झाले आहे. हाडांच्या सांगाड्याचा संप्रेरकांशी असलेला संबंध हे त्याचे एक उदाहरण झाले. आता आणखी असे संबंध अभ्यासातून स्पष्ट होतील आणि शारीर अभ्यासाचे नवे दालन खुले होईल, असे गेरार्ड यांना वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Surendra Pataskar