करारी; पण कनवाळू नेता

सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री)
मंगळवार, 14 जुलै 2020

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शंकरराव चव्हाण विराजमान झाले, तेव्हा मी राजकारणात नवखा होतो. शंकररावांप्रमाणेच वसंतराव नाईक, मारोतराव कन्नमवार, बाळासाहेब सावंत अशा बुजुर्गांमुळे काँग्रेस पक्षाला लोकांच्या मनात मोठे स्थान होते. शंकरराव कडक आणि शिस्तप्रिय होते. त्यांचा स्वतःचा सगळ्या खात्यांचा अभ्यास होता.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची आज (१४ जुलै) जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व याविषयीच्या आठवणींना उजाळा.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शंकरराव चव्हाण विराजमान झाले, तेव्हा मी राजकारणात नवखा होतो. शंकररावांप्रमाणेच वसंतराव नाईक, मारोतराव कन्नमवार, बाळासाहेब सावंत अशा बुजुर्गांमुळे काँग्रेस पक्षाला लोकांच्या मनात मोठे स्थान होते. शंकरराव कडक आणि शिस्तप्रिय होते. त्यांचा स्वतःचा सगळ्या खात्यांचा अभ्यास होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वसंतरावांच्या मंत्रिमंडळात मला दोन खाती देण्यात आली होती. पण शंकररावांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे घेतली आणि मला सहा खात्यांचे मंत्रिपद देण्यात आले.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मी सब इन्स्पेक्‍टर म्हणून काम केले होते. त्यामुळे पोलिस खात्यातील परिस्थिती मला चांगली माहिती होती. सब इन्स्पेक्‍टर निवड सुरू झाली, तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक फाईल दिली आणि म्हणाले, ‘‘या निवडींमध्ये सर्व समाजांना प्रतिनिधित्व मिळते का ते पाहा.’’ मी फाईल बारकाईने वाचली. ‘शेड्युल कास्ट’मध्ये मेहतर, मातंग समाजाला स्थान मिळायला हवे, असा मुद्दा मी मांडला. तो स्वीकारण्यात आला. आपल्या मंत्रिमंडळातील सदस्याचे बलस्थान ओळखून त्याच्याकडून नेमकेपणाने काम करून घेण्याची हातोटी शंकररावांकडे होती. सगळ्यात 
महत्त्वाचे म्हणजे, सगळ्या खात्यांचा आणि समस्यांचा त्यांनी अभ्यास केलेला असे. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेत उथळ बोलण्याला स्थान नव्हते.

शंकररावांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ‘कडक हेडमास्तर’ अशी त्यांची प्रतिमा होती हे खरे, पण ते अभ्यासू होते. गरिबांचे कनवाळू होते. कामगार आणि कष्टकऱ्यांच्या बाजूचे नेते म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. दलितांना ते आपलेसे वाटत.

मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्याला आपल्या खात्याची पूर्ण माहिती असली पाहिजे, स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत, असे त्यांना वाटे. त्यामुळे ‘कॅबिनेट’मध्ये मंत्र्यांनी स्वतः मुद्दे मांडले पाहिजेत, त्याचे विश्‍लेषण केले पाहिजे, त्यावर निर्णय घेण्यासाठी पर्याय दिले पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. कित्येक मंत्री आपल्या सचिवांवर ही जबाबदारी सोपवत असत. प्रसंगी अशा ‘होयबा’ मंत्र्यांची कानउघाडणी करण्यास ते मागेपुढे पाहत नसत. ते बोलायला लागत, तेव्हा त्यांचा सर्वंकष अभ्यास आणि त्यांच्याकडे असलेली माहिती यामुळे आम्ही थक्क होत असू. निर्णय घेताना ‘फॅक्‍ट्‌स’बरोबर बऱ्याचदा ‘कॉमनसेन्स’चाही वापर करावा लागतो, हे त्यांनी दाखवून दिले. नंतरच्या काळात मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शंकररावांच्या मंत्रिमंडळ बैठकांची आठवण निरनिराळ्या संदर्भात येत असे. इतका त्यांचा प्रभाव होता.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विकासाचा वीस कलमी कार्यक्रम दिला होता. शंकरराव चव्हाणांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली. त्यांच्या करारीपणामुळे या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या. काँग्रेस पक्षात त्यांचे विरोधक कमी नव्हते. पण त्यांच्यावर मात करून ते ‘गरिबांचे कल्याण’ हे धोरण ठेवून कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राज्य चालवतो आहोत आणि त्यांचीच रयतेबद्दलची नीती आपण अवलंबत आहोत, ही त्यांची भूमिका होती. त्यांची कार्यपद्धती पाहिली, तर त्यात तथ्य असल्याचे जाणवते.

१९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्री झाले. तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते. काँग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नरसिंह रावांनी माझी निवड केली. शंकरराव गृहमंत्री म्हणून कौशल्याने जबाबदारी पार पाडत होते. त्याचवेळी अयोध्येतील बाबरी मशिदीचा विषय गाजला. केंद्र सरकारच्या भूमिकेवरून बरीच उलटसुलट चर्चा झाली. मी सरचिटणीस असल्याने सगळ्या गोष्टींचा जवळून साक्षीदार होतो. शंकरावांनी तत्कालिन उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध कणखर आणि सडेतोड भूमिका घेतली.

कोणत्याही कठीण प्रसंगाला न डगमगता तोंड देण्याची त्यांची वृत्ती होती. केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली, यात शंका नाही. चेहऱ्यावरून रागीट वाटणारे, पण दयाळू, रसिक असे शंकररावांचे व्यक्तिमत्त्व होते. नाट्यसंगीत त्यांना आवडत असे. भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय, कीर्तनकार या त्यांच्या मर्मबंधातील ठेवी होत्या. शंकररावांनी कधीही लाचारी पत्करली नाही. जे पद मिळाले ते स्वाभिमानाने टिकवण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यासारख्या मागास भागातून आलेला हा नेता केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करून गेला. शंकररावांच्या अनेकविध गुणांची, करारीपणाची आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या लोककल्याणाच्या निर्णयांची आठवण माझ्या मनात अनंतकाळ राहील.
(‘आधुनिक भगीरथ’ या आगामी ग्रंथातील लेखाचा अंश.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article sushilkumar shinde on shankarrao chavan