मनातला भारत

मनातला भारत

‘आंतरराष्ट्रीय सहयोग प्रतिष्ठान’ संस्थेने अनिवासी भारतीयांनाही बडोद्याजवळ कायावरोहण येथे एक शिबिर आयोजित केले होते. मूळ भारतीय वंशाचे, पण ३-४ पिढ्यांपासून परदेशात स्थायिक झालेले लोक परिवारासह शिबिराला यावेत, अशी योजना होती. त्यासाठी वर्षभरापासून योजना आकार घेत होती. सर्वत्र सूचना पोचल्या होत्या. प्रवासाचे आरक्षण झाले होते. महिलांसाठी, युवकांसाठी, प्रौढांसाठी, लहान मुलांसाठी स्वतंत्र कार्यक्रमाची योजना झाली होती. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांनी एक-दुसऱ्यासाठी जोडून राहावे, संस्कृतीचे जतन करावे, नव्या पिढीकडे श्रद्धा संक्रमित कराव्यात इत्यादी उद्देश या आयोजनामागे होते. येणाऱ्या लोकांनी शिबिराला जोडून भारत-दर्शन प्रवासाच्याही योजना ठरवलेल्या होत्या. हरिद्वारमध्ये गंगास्नान, कोलकत्यात विवेकानंदांचे घर, केरळमधील शबरीमला वगैरे ठिकाणी जाण्याचे ठरले होते. भारताविषयी श्रद्धा असलेले हे लोक भारतात येतील, तेव्हा त्यांची सोय उत्तम व्हावी, म्हणून संस्था बारकाईने योजना करत होती. त्यांची सोय उत्तम व्हावी म्हणून सर्वजण झटत होते. कायावरोहणचे एक पौराणिक महत्त्वपण आहे. विश्‍वामित्रांनी त्रिशंकू राजाला सदेह स्वर्गात पाठविण्यासाठी जे स्थान निवडले ते कायावरोहण.

शिबिराला सात दिवस बाकी असताना एकाच्या डोक्‍यात विचार चमकला, की हे बहुतांश लोक बडोदा स्टेशनवर उतरतील व तेथून टॅक्‍सी करून कायावरोहणाला येतील. सर्वप्रथम टक्कर होईल, ती रेल्वे फलाटावरील हमालांशी. यांच्याजवळ भरपूर सामान असल्यामुळे हमालांची गरज पडणारच. तिथे जर काही वाद झाले तर ‘प्रथमग्रासे मक्षिकापात’ अशी स्थिती होईल, असे व्हायला नको. काहीतरी उपाय काढला पाहिजे. काय करावे, हमालांशी बोलावे काय, ते ऐकतील काय... प्रयत्न करायला हवा. दत्ताभाऊ साळुंके यांनी रेल्वे स्टेशनवरील हमाल संघटनेच्या पुढारी लोकांशी बोलणे केले. त्यांच्याबरोबर सर्व हमालांची दुपारच्या वेळी ट्रेनला बराच अवकाश असताना एक बैठक बोलावली. सर्वांना शिबिराचा हेतू समजावून सांगितला.

‘भारताबद्दल ज्यांच्या मनात श्रद्धा आहे, त्यांच्या मनातील भारताची प्रतिमा तुम्हाला भेटल्यावर अधिक चांगली होईल, असे वागा’ , अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढारी म्हणाला, ‘‘हात्तिच्या! एवढेच ना! अहो, तुम्ही बोट दाखवा, त्या प्रवाशाचे सामान फुकटात बाहेर घेऊन जाऊ. त्यात काय मोठी गोष्ट!’’ दत्ताभाऊ म्हणाले, ‘‘नाही हो! असा आमचा उद्देश नाही. तुमचे पोट त्यावर चालते. आम्हाला माहीत आहे. पैसे वाजवी घ्यावेत, एवढीच अपेक्षा!’’
हमालांचा पुढारी म्हणाला, ‘‘झालं! तुमचं बोलणं झालं! आता माझं ऐका. परदेशातल्या भारतीयांसमोर भारताची प्रतिमा ‘फर्स्ट इम्प्रेशन’ आमच्यामुळे होणार. ही संधी कधी येणार? ते काही नाही. तुम्ही सांगा, सगळे तयार आहेत. एक पैसा घेणार नाही. सगळ्यांचे सामान व्यवस्थित उतरवू, हे ठरलं.’’

‘अतिथी देवो भव’’ हे संस्कृत शब्द त्यांना माहीत असतील काय? कदाचित नाही. पण ‘मनातला भारत’ अभिव्यक्त होणे हे काही त्यावर अवलंबून नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com