मन का विश्‍वास कमजोर हो ना...

मन का विश्‍वास कमजोर हो ना...

फार  वर्षांपूर्वी ‘अंकुश’ नावाचा नाना पाटेकरांची भूमिका असलेला चित्रपट आला होता. त्यात ‘इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्‍वास कमजोर हो ना’ असे एक गीत होते. ‘सिनेमाच्या गीता’पेक्षा एक उत्कृष्ट प्रार्थना असे त्याचे स्वरूप होते. त्यानंतर अनेक ठिकाणी सार्वजनिक संस्थांमधून हे गीत ऐकले.  मला ही खरी प्रार्थना वाटते. त्यात ईश्‍वराकडे कोणतीही भौतिक गोष्ट मागितलेली नाही. संकटांपासून वाचविण्यासाठी धावा केलेला नाही. ‘तू असे दे, मग मी तशी तुझी पूजा करीन...’ असे आश्‍वासन दिलेले नाही. मनाला विश्‍वास तू सर्वसाक्षी असल्याचा... तुझ्यापासून काहीच लपविता येत नसल्याचा... तू सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी असल्याचा... तू रक्षणकर्ता, दयावान असल्याचा विश्‍वास कधी डळमळीत होऊ देऊ नकोस. त्यात शंकेचा किडा घुसू देऊ नकोस, संशयाची अळी वळवळू देऊ नकोस, बस एवढेच हवे.. आणखी काही नको! हृदयात भक्तियोग, बुद्धीमध्ये ज्ञानयोग आणि हातांमध्ये कर्मयोग दिलास... आता अधिक काही नको. 

खगोलाच्या दृष्टीने पाहिले तर आपल्याच दूधगंगा-आकाशगंगेत दोन अब्ज तारे आहेत. पृथ्वीवर सर्वांना वाटायचे ठरवले तर प्रत्येकाच्या वाट्याला सूर्यासारखे तीस तारे येतील... अशा करोडो आकाशगंगा अवकाशात आहेत; आणि त्याचा स्वामी ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक... त्याच्याकडे काही भौतिक गोष्टी मागणे म्हणजे इंद्राकडे चुना, तंबाखू मागण्यासारखे आहे... असो!  परदेशात घडलेली एक घटना. एक कुटुंब सहलीसाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले होते. डाक बंगल्यासमोर तलाव होता. घरातला शाळेत शिकणारा मुलगा तलाव पाहून हरखला व त्याने लगेच कपडे उतरवून त्यात उडी घेतली. मजेत तो पोहू लागला. अचानक त्याच्या आईचे लक्ष तलावाबाहेर लिहिलेल्या बोर्डकडे गेले. ‘‘तलावात मगरी आहेत-उतरू नये’’ असे त्यावर लिहिले होते. तिची नजर पोहणाऱ्या मुलाकडे गेली व अनाहुतपणे ती किंचाळली. झपाट्याने तरंगत मगर मुलाकडे येत होती. तिचा सुगावा लागून मुलगा किनाऱ्याकडे येत हात मारू लागला. त्याच्या आईने काठावरून त्याचे हात पकडले व मगरीने जबड्यात मुलाचे पाय पकडले. जीवन-मरणाची भयानक रस्सीखेच सुरू झाली. त्याच्या आईचे किंचाळणे ऐकून बाजूने रस्त्यावरून मोटारीतून चाललेल्या शिकाऱ्याने मगरीवर निशाण साधले.

तलावाचे पाणी लाल झाले. मुलाला ओढणारी आई धाडकन मागे कोसळली.  मुलगा आईच्या खेचण्यामुळे बाहेर ओढला गेला. जीव वाचला. दवाखान्यात मुलाची मुलाखत घ्यायला आलेल्या पत्रकाराने त्याच्या पायावर उमटलेल्या मगरीच्या दातांच्या व्रणाचा फोटो प्रसिद्ध केला. त्या फोटोच्याच बाजूला त्याच्या खांद्यावर उमटलेल्या आईच्या बोटांच्या व्रणाचाही फोटो छापला... किती ताकतीने तिने मुलाला बाहेर खेचून काढले, हे दर्शवणारा तो फोटो होता.  ‘जगातल्या कोणत्याही दुष्ट शक्तीपेक्षा माझ्या आईच्या हातात अधिक शक्ती आहे’ हा विश्‍वास कधी डळमळू नये...’ ही खरी प्रार्थना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com