शब्देविण संवाद

शब्देविण संवाद

पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या लाल रंगाच्या बसमध्ये चढलो. जागा मिळाली. बस भरली. प्रवास सुरू झाला. एका थांब्यावर काही मंडळी चढली.

त्यांच्यासाठी बसायला जागा नव्हती. कुणीतरी उतरेल, त्याच्या जागी आपल्याला बसायला मिळेल, अशा आशेने उभे असलेले लोक बसलेल्यांचा अंदाज घेऊ लागले. संकोचाचा पडदा सरकवून ‘तुम्ही कुठे उतरणार..’ असे विचारू लागले. कडेवर लहानगे मूल असलेल्या एका माऊलीने मला हाच प्रश्‍न विचारला. एक-दोघांना तिने कुठवर जाणार, हे विचारले व मुलाला एका हाताने सांभाळीत दुसऱ्या हाताने बसचा बार पकडून तोल सांभाळू लागली. मूल हसत-खिदळत होते. आपलं ओझ आई सांभाळतेय, मग कसली चिंता. ‘‘जन्माआधी नऊ महिने आणि जन्मानंतर अठरा महिने... सतत सांभाळणे... ओझे उचलणे... एवढे जरी मुलाने लक्षात ठेवले, तर...’’ असे विचार माझ्या मनात घोळू लागले. 

माझ्यातले स्त्रीदाक्षिण्य एका उंचीवर पोचले व ‘ताई’ तुम्ही बसा, असे म्हणून मी उभा राहिलो. तिने लगेच माझ्या जागी बसकण मारली. शहरी उपचाराचे ‘थॅंक यू’ वगैरे तिच्या गावीही नव्हते. 

पण माझे नशीब चांगले असेल म्हणा... माझ्या बाजूचा प्रवासी पंधरा-वीस मिनिटांत उठला व पुढील गावी उतरला. मी त्याच्या जागी बसलो. ‘बसणे’ हेसुद्धा सुखदायक असू शकते, हे बसमध्ये उभे राहणाऱ्यालाच कळते.

बाजूचा लहानगा भलताच हसमुख होता. त्याने माझ्याशी हाताच्या पंजाने टपाटपी सुरू केली. मी चुटक्‍या वाजवल्या.. प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज काढले.. टाळ्या वाजवल्या.. त्याबरोबर त्या माऊलीने, ‘‘जातोस का मामाकडे’’ असे म्हणून त्याला माझ्या मांडीवर ठेवले.. मी मामाची भूमिका करू लागलो व माऊलीने बसच्या सीटवर टेकून बसत डोळे मिटले आणि चक्क झोपी गेली.

थोडे-फार खेळून, उड्या मारून झाल्यावर छोट्याने ‘ऊं ऊं’ असे हलके हलके रडायला सुरवात केली. माझे चुटक्‍या.. टाळ्या वगैरे उपाय थकले. तो अधून-मधून जोराने ओरडून निषेध नोंदवू लागला. त्याच्या ओरडण्याने तरी त्याची आई उठायला हवी; पण ती गाढ झोपल्यासारखी... झोपेत तरंगत असल्यासारखी होती. हा का रडतोय, हे मला समजण्याचे काही कारण नव्हते. त्याला कुठे टोचतेय, बोचतेय का वगैरे तपास केला, तर तसे काहीच नव्हते. काय करू... काय करू.. असे मनात सुरू असतानाच ती माऊली उठली.. तिने डोळे किलकिले केले व म्हणाली, ‘अहो! ती खिडकी बंद करा जरा.. उन्हाची तिरीप येतेय मुकुंदावर’’ आणि पुन्हा गुडूप झाली. डोळे उघडे असून, जे माझ्या लक्षात आले नाही, ते डोळे मिटलेले असून, या माऊलीच्या कसे लक्षात आले असेल बरे!

निःस्वार्थ प्रेमाचा अदृश्‍य धागा आई व मुलाला बांधून असतो. त्यांच्यामध्ये शब्देविण संवाद सतत सुरू असतो. परदेशात गेलेला मुलगा तिकडे आजारी पडला तर इकडे आईच्या तोंडाची चव जाते. तिला सर्वदा मुलाची चिंता असते. 
याचाच ज्ञानोबा माऊली ‘शब्देविण संवाद’ म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com