Raksha Bandhan 2022 : आरोग्याचा रेशीमधागा

भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या सणांच्या, उत्सवांच्या निमित्ताने निसर्गातील विविध तत्त्वांची पूजा-अर्चा पर्यायाने संवर्धन केले जाते.
indian festival
indian festivalsakal
Summary

भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या सणांच्या, उत्सवांच्या निमित्ताने निसर्गातील विविध तत्त्वांची पूजा-अर्चा पर्यायाने संवर्धन केले जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या सणांच्या, उत्सवांच्या निमित्ताने निसर्गातील विविध तत्त्वांची पूजा-अर्चा पर्यायाने संवर्धन केले जाते. नारळीपौर्णिमा हा आजचा दिवस जलतत्त्वाच्या संतुलनाला समर्पित दिवस. या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर राहणारे लोक समुद्राला नारळ अर्पण करून पावसाळ्यामुळे रौद्ररूप धारण केलेल्या समुद्राला शांत होण्यासाठी प्रार्थना करतात. तर इतरत्र जलतत्त्वाचे प्रतीक म्हणून विहीर, तळे किंवा जलाशयाची पूजा करण्याची पद्धत असते. जलतत्त्व हे स्नेहाचेही प्रतीक असते. व्यवहारात आपण मायेचा ओलावा, प्रेमाचा सागर वगैरे शब्दप्रयोग करतो, ते यामुळेच. जलतत्त्वाला समर्पित अशा या दिवशीच भाऊ-बहिणीतील स्नेह वाढावा यासाठी राखी बांधण्याची प्रथा असण्यामागे भारतीय ऋषिमुनींची कल्पकता दिसून येते.

रक्षाबंधन हा सण नाही, तर तो भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. राखी हा फक्त बहिणीने भावाच्या हातावर बांधण्याचा आकर्षक, सुंदर धागा नाही, तर तो संपूर्ण कुटुंबसंस्थेला एकत्र बांधणारा आरोग्यधागा आहे. पूर्वीच्या काळी हा धागा कुटुंबातील सर्वांच्याच हातावर बांधला जात असे. परंतु त्यातल्या त्यात बहीण लग्न होऊन दुसऱ्या घरात जाणार असते, तिचा संपूर्ण जीवनव्यापार दुसऱ्या कुटुंबाशी जोडला जाणार असतो, अशा वेळी भविष्यकाळात तिचा मूळ कुटुंबाशी असलेला संबंध कमकुवत होऊ नये या दृष्टीने बहिणीने भावाला दरवर्षी राखी बांधण्याचे विशेष महत्त्व. कुटुंबाचे गुणसूत्र, ज्यावर संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य अवलंबून असते, त्या सूत्रावर संस्कार करून कुठल्याही प्रकारचे वंशपरंपरागत दोष भावी पिढीत येऊ नयेत, वंशवृद्धी व्हावी, समृद्धी व्हावी, संस्कारांचा वारसा पुढे जावा याचे प्रतिनिधित्व करणारी ती राखी.

पिढ्यांमधील अंतर वाढत जाणारे असते, इतर लांबलांबची नाती लक्षात ठेवली नाहीत तरी बहीण-भावाचे नाते लक्षात ठेवावेच लागते. सगोत्र संबंध येणार नाहीत यासाठी दक्षता घेण्याचा तो एक मार्ग असतो. सगोत्र विवाहातून जन्माला आलेल्या बालकांमध्ये, चुकीच्या जनुकीय एकत्रीकरणामुळे शारीरिक, मानसिक दोष उत्पन्न होतात हे सध्या आधुनिक विज्ञानातही सिद्ध झालेले आहे. मात्र आपण भारतीयांनी हजारो वर्षांपूर्वी हे ओळखून राखी बांधण्याचा संस्कार म्हणजे निसर्गचक्र संतुलित राहण्याचे एक आश्वासनच संपूर्ण मानवजातीला दिलेले आहे.

नात्यांचा अनोखा बंध

असे म्हणतात की मेवाडच्या राजपूत घराण्यातील स्त्रियांनी आक्रमणापासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने आक्रमकाला राखी बांधून ‘भाऊ’ हा दर्जा दिला. तेव्हा नवीन नातेसंबंध जोडण्याचे, व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाच्या कल्याण व आरोग्यकक्षेत समाविष्ट करून घेण्याचे सामर्थ्य एका राखीत असते. भावाने बहिणीचे रक्षण करावे या भावनेने राखी बांधली जाते. अर्थात रक्षण करायचे की नाही हे व्यक्तीच्या मनावर व त्याच्या मेंदूवर अवलंबून असते. मनगट व दंड ही ताकदीची स्थाने समजली जातात. मनगटातील जोर आणि दंडातील बळकटी ही रक्षणकर्त्याकडे असावेच लागतात. म्हणूनच आपल्या रक्षणाची आठवण करून देण्यासाठी बहीण भावाच्या मनगटावर आपल्या स्नेहाचा रेशीमधागा बांधत असावी. तिची भावावरची माया व प्रेम हेच भावाला उमेद देणारे असतात. मानसिक व आत्मिक पातळीवर एकमेकांवर प्रेम असले तरच त्याचा परिणाम शारीरिक पातळीवर दिसू शकतो.

लग्न हे कधीही केवळ पती-पत्नीपुरते मर्यादित राहत नाही. लग्नानंतर सासू, सासरे, दीर, नणंदा, जावा अशी अनेक नाती आपसूक तयार होतात, या सर्व नातेसंबंधातील महत्त्वाचे व काळजीपूर्वक जपायच्या नात्याचे प्रतीक म्हणून बहिणीने भावाला राखी बांधायचा विधी भारतीय परंपरेने सांभाळला.

मानसिक आरोग्य

कुटुंबातील नातेसंबंध हे रक्तात आलेली जनुके, त्यांची नैसर्गिक समानता व प्रेमाच्या अनुभवातून आलेले असतात. सर्वांचे जीवनधागे एका केंद्रबिंदूशी बांधलेले असल्यामुळे ही एकमेकातील ओढ तयार झालेली असते. वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, मावशी वगैरे नात्यांची एकमेकांशी विशिष्ट अंतरे असतात व त्यामुळे दोन नात्यातील माणसांचे एकमेकांशी होणारे आचार-विचार ठरलेले असतात. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येण्यानेसुद्धा मानसिक ताण तयार होत नाहीत व सर्वांचेच आरोग्य चांगले राहते.

शेवटी शारीरिक आरोग्यावर मनाचाच प्रभाव असतो. म्हणून दोन व्यक्तीत जनुकीय संबंध नसला तरी ते मनापासून खरोखरीच एकमेकांशी जोडले गेले असतील तरी त्यांच्यात एक मायेचे नाते व कौटुंबिक आपुलकी तयार होते आणि म्हणूनच हे नाते केवळ भावा-बहिणीपर्यंत मर्यादित न राहता प्रथम म्हटल्याप्रमाणे हा धागा सर्व कुटुंबीयांना बंधन म्हणून बांधलेला असतो. आपले कुटुंब या नात्याने सर्वांसमवेत प्रेमाने राहण्यासाठी, स्वतःच्या बरोबरीने समाजाचा विकास करण्यासाठी व शेवटी वैश्र्विक कुटुंबामध्ये समाविष्ट होण्यासाठी लागणारे भावनिक व मानसिक आरोग्य सांभाळणे यात अभिप्रेत असते. देव आपले संरक्षण करतात असे समजून आपण देवालासुद्धा राखी बांधतो.

याच भावनेतून आपले गुरू किंवा इष्टचिंतक हे आपली सर्वतोपरी काळजी घेणारे असल्याने हा धागा त्यांच्याही हातावर बांधून रक्षाबंधन साजरे केले जाऊ शकते. त्या अर्थाने या धाग्यात मांगल्य आणावे लागते, त्याला अभिमंत्रित करावे लागते. अभिमंत्रित म्हणजे एखादा क्लिष्ट मंत्र म्हणायचा असे नव्हे तर आपल्या इच्छेने, सुविचाराने, चांगल्या कल्पनेने त्याला अभिमंत्रित करून ते तत्त्व मनापर्यंत व आत्म्यापर्यंत पोचवण्याचे काम राखीचा धागा करत असतो. रेशमी नात्याची प्रतीक असणारी राखी रेशमी धाग्याचीच बनविलेली असावी. रासायनिक रंग, प्लॅस्टिकचे मणी, भेसळयुक्त चांदी यांच्यापासून बनविलेल्या राख्या विकत घेणे टाळणेच इष्ट. निदान लहान मुलांना तरी नुसता रेशमाचा धागा किंवा लहानसा गोंडा असलेली राखी बांधावी. राखीत नावीन्य आणि आधुनिकता आणली गेली तरी त्यामुळे प्रदूषणात भर पडणार नाही याचा विचारही आपणच करायला हवा.

नाडी पाहताना जसे वैद्य मनगटावर बोटे ठेवतात, परंतु अभ्यास करतात मेंदूपासून ते पावलांपर्यतच्या सर्व शरीराचा, तसेच मनगटावर बांधलेल्या धाग्यातली शक्ती, इच्छा व संकल्प सर्व शरीरभर पसरून, मेंदूपर्यंत जाऊन त्या माणसाच्या अंतरंगात संदेशरूपाने उतरवला जातो. ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे उदित झालेला आहे म्हणजे त्याचे तेज पूर्ण पसरलेले आहे, शरीरातील रसधातू ज्या दिवशी पूर्ण विकसित झालेला आहे, पर्यायाने मेंदू जास्तीत जास्ती कार्यक्षम आहे व सर्व तऱ्हेच्या सहकार्यासाठी उपलब्ध आहे अशा दिवशी रक्षाबंधनाची योजना करण्यामागे भारतीय ऋषिमुनींचे द्रष्टेपण समजून येते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com