‘टॉक ऑफ द टाऊन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘टॉक ऑफ द टाऊन’

सध्या ट्विटरचे विश्व ‘सकाळ प्रकाशन’ आणि युवा उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांच्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या दोन वाक्यांनी व्यापले आहे की काय, असे वाटावे अशीच परिस्थिती आहे.

‘टॉक ऑफ द टाऊन’

सध्या ट्विटरचे विश्व ‘सकाळ प्रकाशन’ आणि युवा उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांच्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या दोन वाक्यांनी व्यापले आहे की काय, असे वाटावे अशीच परिस्थिती आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या मेट्रो शहरांपासून ते अगदी तालुका, खेडोपाड्यांत या पुस्तकाची चर्चा आहे. ट्विटर टाईमलाईनवर तुम्ही काही वेळ स्क्रोल करा, तुम्हाला या पुस्तकासंदर्भातील असंख्य ट्विट पाहायला मिळतील. हे पुस्तक खऱ्या अर्थाने ‘टॉक ऑफ द टाऊन’ ठरले आहे. या दिवाळीत भेट म्हणून देण्यासाठी हे पुस्तक सर्वाधिक वापरले गेले. अनेकांनी त्यासाठी ५०-५० पुस्तके खरेदी केली.

अलीकडे ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित होताना दिसतात. मात्र या सर्वांच्या गर्दीत प्रफुल्ल वानखेडे यांचे पुस्तक उठून दिसते. या पुस्तकाने एकाच वेळी ऑनलाईन, ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर लोकप्रियता कमावली. यासोबत विक्रीच्या बाबतीत अनेक विक्रम मोडून, नवे विक्रम रचले आहेत. सर्वाधिक काळ आणि सातत्याने वाचकांमध्ये चर्चेत राहाण्याचे कसबही या पुस्तकाने साधले आहे. ॲमेझॉनच्या पहिल्या दहा सर्वाधिक खपाच्या पुस्तकांमध्ये स्थान मिळवून त्या यादीतील हे एकमेव मराठी पुस्तक ठरले आहे. क्रॉसवर्ड, ऑक्सफर्ड ते मुंबईतील आयकॉनिक ‘किताबखाना’ यांसारख्या नामांकित बुक स्टोअरमध्ये इंग्रजी पुस्तकांसोबत प्रफुल्ल वानखेडे यांचे ‘गोष्ट पैशापाण्याची’ विक्री आणि लोकप्रियतेच्या बाबतीत स्पर्धा करताना दिसते आहे.

पुस्तकांच्या मार्केटिंगमध्ये अनेक वर्षे काम करणारा एक जाणकार म्हणाला, आजपर्यंत आम्ही अनेक चांगल्या पुस्तकांना बाजारात मोठा प्रतिसाद मिळताना बघितला आहे. मात्र तो प्रतिसाद एका विशिष्ट वयोगटातून, थरातून मिळत असे. मात्र हे पहिले पुस्तक आहे ज्याला सर्वच वयोगटांतून, महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठांकडून सारखीच मागणी आहे.

महाराष्ट्रात जेवढे पिन कोड आहेत तेवढ्या पिन कोडवर हे पुस्तक जाऊन धडकले आहे. यामध्ये प्रकाशक आणि लेखक यांनी प्रकाशनापूर्वी महत्त्वाच्या शहरांत वाचकांसोबत साधलेल्या संवादाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे इथे नमूद करणे आवश्यक आहे.

हे पुस्तक ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुस्तकाने ॲमेझॉनच्या सर्वाधिक खपाच्या पहिल्या दहा पुस्तकांमध्ये स्थान मिळवले. या यादीतील हे एकमेव मराठी पुस्तक होते. अल्पावधीत हे पुस्तक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचले, तर न्यू रिलीजमध्ये नंबर वन झाले. अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठीतील हे पुस्तक ‘सायकॉलॉजी ऑफ मनी’, जेम्स क्लियर यांचे ‘ॲटॉमिक हॅबीट’, ‘इकिगाई’ या कसलेल्या, सर्वाधिक खपाच्या इंग्रजी पुस्तकांसोबत स्पर्धा करत होते. ९ ऑक्टोबरला या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या दिवसानंतर तब्बल तीन आठवडे होऊन गेले तरीही या पुस्तकाने ॲमेझॉनच्या बेस्ट सेलर्सच्या १० पुस्तकांमध्ये स्थान टिकवून आहे.

मराठी पुस्तकाची एक आवृत्ती साधारण एक हजार प्रतींची असते. नामवंत लेखक अरविंद जगताप यांच्या मते काही लेखक १०० प्रतींची आवृत्ती काढून मिरवत असतात. मात्र ‘सकाळ प्रकाशन’ने ‘गोष्ट पैशापाण्याची’ची पहिली आवृत्ती तब्बल ३० हजार प्रतींची काढली. मराठी प्रकाशन व्यवसायातला हा एक मोठा विक्रम होता. एकाच महिन्यात ६० हजार पुस्तके बाजारात आणण्याचा नवा विक्रमही या पुस्तकाच्या नावे जमा झाला आहे.

विक्रमांची मालिका

  • ३० हजार प्रतींची एक आवृत्ती असणारे पहिले पुस्तक

  • पहिल्या चोवीस तासांत हजारा पेक्षा जास्त पुस्तकांचा खप

  • प्रकाशनापूर्वी १८ हजार पुस्तकांची मागणी नोंदवली

  • महिनाभरापासून सातत्याने ॲमेझॉनच्या बेस्ट सेलर्समध्ये स्थान

  • ३० दिवसांत ६० हजार प्रती बाजारात उपलब्ध होणारे पहिले पुस्तक

  • ऑनलाईन माध्यमांवर सर्वाधिक चर्चा

‘किताबखाना’मध्ये तुफानी प्रतिसाद

मुंबईचे आयकॉनिक बुक स्टोअर ‘किताबखाना’तही ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाला वाचकांकडून विक्रमी प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या ७०० पेक्षा जास्त प्रती ‘किताबखाना’ व्यवस्थापनाने मागवल्या असून एवढ्या मोठ्या संख्येने मागवलेले आणि खप होणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. त्यामुळे हे पुस्तक आमच्यासाठीही तेवढेच स्पेशल आहे, अशी प्रतिक्रिया ‘किताबखाना’ व्यवस्थापनाने दिली आहे

स्तंभलेखकाचा विक्रम

मुंबई आवृत्तीसाठी ‘सकाळ’ने ‘अवतरण’ पुरवणी सुरू करायचे ठरवले. त्यात नव्या आणि विविध क्षेत्रांतील तरुण लेखकांना संधी देण्याचे ठरले. या व्याख्येत प्रफुल्ल वानखेडे फिट बसले. ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे स्तंभ सुरू झाले. या स्तंभाला तुफान प्रतिसाद मिळाला. याच स्तंभाचे हे पुस्तक आता नवेनवे विक्रम करते आहे.

अवतरणातील गोष्टी

प्रफुल्ल वानखेडे यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या शब्दांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. ‘श्रीमंतीचा दिखाऊपणा!’ या प्रकरणात ते लिहितात, ‘आजमितीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहारज्ञान आणि साधेपणा. योग्य वेळी केलेली पैशांची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते. त्यामुळे क्षणिक सुख आणि भपका टाळा.’

मराठी माणसांमध्ये असलेला मार्केटिंगचा न्यूनंगड, त्यातून उद्योग-व्यवसायाची संस्कृती रुजविण्यात येणारे अडथळे आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांनी सुचविले आहेत. आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांमुळे आपण कसे घडत जातो, त्याचे महत्त्वही त्यांनी ‘माणुसकीची श्रीमंती’ या गोष्टीतून पटवून दिले आहे.

आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याची सूचनाही ते करतात. ‘९९ टक्के लोक हे बहुतेक वेळा, फक्त आणि फक्त आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने केल्यामुळेच संकटात येतात, मग तो गरीब असो की श्रीमंत!’

बचतीमधील महिलांचे स्थान याविषयी दिलेली माहिती प्रेरणादायी आहे. ‘आपल्याला हा समाज म्हणून आर्थिक साक्षर व्हायचे असेल तर प्रथम एक स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे. मग ती तिच्या घराला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देईल, अशा अर्थसाक्षर घरांमुळे पुढे गाव आणि शहरे अर्थसाक्षर होतील. आपोआपच आपला संपूर्ण समाज आर्थिक साक्षर आणि स्वतंत्र होईल.’

वानखेडे यांनी स्वत:ला आलेल्या अनुभवांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यांना भेटलेल्या माणसांकडून, वाचलेल्या पुस्तकांमधून त्यांनी स्वत: कोणती कौशल्ये आणि गुण आत्मसात केले आहेत, हे त्यांनी यामध्ये उलगडले आहे.

आपल्या देशाचे भविष्य सक्षम करायचे असेल, तर आपली तरुणाई आर्थिकदृष्ट्या साक्षर असणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे. आणि हे अर्थविषयक जाणीव-जागृतीचे काहीसे क्लिष्ट व नीरस काम प्रफुल्ल वानखेडे यांनी आपल्या आर्थिक साक्षरतेवरील सहज आकलन होईल, अशा साध्या, सोप्या शैलीतील लेखांतून उत्तमरीत्या केलेले दिसून येते. हे पुस्तक प्रत्येक वाचकांमध्ये अर्थविषयक जागरूकता निर्माण करत, आर्थिक नियोजनातून आनंदी जगण्याचा मार्ग दाखवेल, असा विश्वास आहे.

- डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ

‘गोष्ट पैशापाण्याची’चे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी आपल्या लेखमालेतून मराठी समाजाचे प्रबोधन करण्याचे एक उत्तम काम केले आहे. सोप्या भाषेत उदाहरणांसह ते समजून सांगितले आहे. यामुळे पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. अशा लेखमाला, प्रयत्न सातत्याने व्हायला हवेत. त्यातून आपली मानसिकता बदलेल आणि आर्थिक क्षेत्रातही मराठी साम्राज्य देशभर पसरेल. त्याचप्रमाणे देशातच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते पसरेल, असे वाटणे स्वाभाविक आहे.

- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह

जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यावर आर्थिक व्यवहारातील किमान गोष्टींचे ज्ञान असणे ही सर्वांची गरज बनली. यालाच म्हणजे, अर्थसाक्षरतेला गोष्टीरूप देऊन प्रफुल्ल वानखेडे प्रस्तुत पुस्तकातून वाचकांच्या समोर देत आहेत. जागतिक स्तरावरील आपले स्थान टिकवण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था मजबूत पाहिजे व त्यासाठी त्यात सर्वसामान्यांचीही गुंतवणूक आवश्यक आहे, हे लक्षात घेतले म्हणजे प्रफुल्ल यांच्या पुस्तकाचे महत्त्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

- डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

अतिशय ओघवत्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वाचायला सोपे आणि चित्तवेधक आहे. प्रफुल्ल यांनी अनुभवांच्या गोष्टींच्या आणि सल्ल्यांच्या माध्यमातून अनेक संकल्पना मांडल्यामुळे त्या वाचनीय झाल्या आहेत. त्यातून वाचकांना अनेक गोष्टी शिकायला मिळतील. गोष्ट सांगण्याच्या त्यांच्या रोचक शैलीमुळे त्यातला आशय हा वाचकांच्या कायम आठवणीत राहील, याची खात्री आहे. प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावे, असे हे पुस्तक आहे. कठीण प्रसंग येईल तेव्हा हे पुस्तक वाचा, तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळेल, नवी उमेद मिळेल.

- आनंद देशपांडे, अध्यक्ष, पर्सिस्टंट

टॅग्स :BookEditorial Article