ढिंग टांग : येई घना, येई घना!

पर्जेन्य व्हा पांडुरंगा, द्यावा इस्वाटा गा मना काळा रंग लेवोनिया, येई घना, येई घना!
Dhing Tang
Dhing Tangfile photo
Summary

पर्जेन्य व्हा पांडुरंगा, द्यावा इस्वाटा गा मना

काळा रंग लेवोनिया, येई घना, येई घना!

नि:शब्दाला फुटे टाहो, मौनालाही गहिवर

कोण गेले कुणासाठी, निरर्थक हा संहार

फुकाफुकी कुणी मेले, लाकडांचा चढे भाव

चित्रगुप्त टिपतोहे, एकेकाचे नावगाव

एक गेला, पुढे नेला, दुजा त्यास देई खांदा

त्याचवेळी निखळतो जगण्याचा एक सांधा

चिडीचूप आहे वस्ती, कुठे नाही सांजवात

कुण्या महिषाचे खूर भयानक वाजतात

कचाकचा दाढा खात चेटकीचा थयथयाट

रस्ते-चौक सुनसान, भयभीत नदीघाट

अगे, अगे गंगामाई, वाहात हे गेले काय?

तरंगती अवशेष, कुठे हात, कुठे पाय!

जीव होतो वरखाली, गदमदे चराचर

छातीतील पिंजऱ्यात अखेरची घरघर

गीध फिरे चक्राकार, नभां येई अवकळा

खाली भोग प्राक्तनाचे मरणाच्या तीव्र झळा

जणू सुणे दीनवाणे पडे राही जिन्याखाली

तशी आली जगण्याची ऊरस्फोड माझ्या भाळी

माळावर गोल गोल, उधळती चक्रवात

भडकून पळसाच्या माथी होई रक्तपात

दूर कोठे वृक्ष उभे हाडेकाडे दाखवित

बीमारीने कण्हणारी सृष्टी झाली दीडवीत

आजारले चराचर, सुस्काऱ्यांची वावटळे

वेदनेच्या बिछान्यात, शरीर हे पडे शिळे

वर तापलेले नभ, खाली भरडली भूमी

वणव्याच्या माहौलात, जीवनाची नुरे हमी

रोज जीविताचा गाडा, पुढे जातो खडखड

चाकोरीत निघे तांडा, त्याला सर्पणाची ओढ

तांडा निघे मंदगती, रोज पुढे जात आहे

शेवटला मुसाफिर आपुलाची अंत पाहे

तारेवर अमंगळ घूक गाते गूढ काही

तिच्या अंतरात आता जगण्याचा सूर नाही

रोज राती भिंतीवर खेळ चाले सावल्यांचा

कौटुंबिक, सामाजिक, शोकांतिक नाटकाचा

जणू वैशाखात जळे गाव सारे धडाधडा

वणव्याच्या सैराटात होरपळे गावगाडा

चरचरे चराचर उन्हाळ्याच्या तलखीत

सुखालागीं पायपीट, दु:ख येते पालखीत

पर्जेन्य व्हा पांडुरंगा, द्यावा इस्वाटा गा मना

काळा रंग लेवोनिया, येई घना, येई घना!

ढिंग-टांग आणि संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com