वर्ग आणि वर्गीकरण

वर्ग आणि वर्गीकरण

कल्पना करून पाहा, नुकतेच जन्माला आलेले बाळ डोळे उघडून पहिल्यांदा आपल्या भवतालाकडे बघत असेल, तेव्हा किती भांबावून जात असेल! सगळेच अनोळखी, परके! बघावे ते वेगळे, नवीन! कितीही पाहिले तरी न संपणारे, भांबावून, गोंधळून टाकणारे आणि तरीही प्रचंड कुतूहल निर्माण करणारे! सर्व शक्ती एकवटून ते बाळ आपले कुतूहल शमवत राहते; आणि हे जग जाणून घेण्याची तहान अधाशासारखी भागवत राहते. इतिहासपूर्व काळातील माणूस हा तान्ह्या बाळासारखा होता. विस्फारल्या डोळ्यांनी हे अफाट जग न्याहाळत ते समजून घ्यायला धडपडत होता. या धडपडीत एका टप्प्यावर कधीतरी त्याच्या हे लक्षात आले असेल, की या जगात शब्दशः अगणित वस्तू असल्या तरी त्यातील प्रत्येक वस्तू इतर सर्व वस्तूंपेक्षा पूर्णपणे वेगळी नसते. निरनिराळ्या वस्तूंमध्ये फरक तर असतातच; पण साम्येही असतात. या साम्यांच्या आधारावरच माणसाने वस्तूंचे वर्गीकरण करायला सुरवात केली. ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरचा हा वरकरणी सहज-साधा वाटणारा, पण अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. आपला जीव आणि "मनुष्य' ही आपली जीव-जात टिकवून ठेवण्याच्या नैसर्गिक प्रेरणेच्या बळावर आपल्यासमोर जे आहे, ते आपल्यासाठी साह्यकारक आहे, की हानीकारक हे वर्गीकरण तो करायला लागला. अनुभवाला येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंमधील सारखेपणा आणि वेगळेपणा ओळखून, त्यांचे निरनिराळ्या प्रकारांत विभाजन करणे हे बुद्धीचे मूलभूत कार्य आहे. माणसाच्या मेंदूचा विकास होत गेला, तसतशी बुद्धीची वर्गीकरण करण्याची क्षमता विस्तारत, विकसत गेली. जीवन-संघर्षात तगून राहणे एवढ्यापुरती मर्यादित न राहता निखळ ज्ञानासाठी उपयोगात आणली जाऊ लागली आणि हळूहळू, पण निश्‍चितपणे असंख्य प्रकारच्या, अनंत वस्तूंनी भरलेले जग त्याच्या बुद्धीच्या कवेत येऊ लागले. विचारांच्या अधिक अमूर्त पातळीवर माणसाच्या हे लक्षात आले, की या अनेक प्रकारांच्या मुळाशी काही मूलभूत तत्त्वे आहेत. ही तत्त्वे विशिष्ट प्रमाणात एकत्र येण्यातून विश्‍वातले अपार वैविध्य जन्म घेते. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपल्याला उपलब्ध केलेली कुठलीही उपकरणे कुठल्याही पद्धती यांची मदत नसताना मानवी बुद्धीने घेतलेली ही विचारांची झेप निव्वळ थक्क करणारी आहे. "सर्व विज्ञानाची जननी' समजल्या जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचा हा मुलारंभ-आरंभ आहे. ज्ञान म्हणजे विज्ञान असे काहीसे समीकरण स्थापित झालेले असण्याच्या या सध्याच्या काळात, विज्ञानाची मुळे ज्यात रुजली आहेत, त्या तत्त्वज्ञानाच्या भूमीचे स्मरण करून देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com