राष्ट्रवादाचा अंगार, लोकशाहीची धुगधुगी

डॉ. अशोक मोडक
शनिवार, 24 मार्च 2018

सार्वभौम रशियाची निर्मिती झाल्यानंतरच्या २७ वर्षांत रशियात कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे, राहणीमान उंचावले आहे. इतर अनेक प्रश्‍न असले तरी या बाबींचा प्रभाव निवडणुकीत जाणवला. रशियाच्या ताज्या दौऱ्यातील निरीक्षणे.

सार्वभौम रशियाची निर्मिती झाल्यानंतरच्या २७ वर्षांत रशियात कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे, राहणीमान उंचावले आहे. इतर अनेक प्रश्‍न असले तरी या बाबींचा प्रभाव निवडणुकीत जाणवला. रशियाच्या ताज्या दौऱ्यातील निरीक्षणे.

र शियात नुकतीच अध्यक्षपदाची निवडणूक झाली व व्लादिमीर पुतीन पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकीसाठी एक निरीक्षक म्हणून मला रशियन संसदेकडून निमंत्रण आले होते. तिथे पाच दिवस राहून तेथील निवडणूक प्रक्रिया पाहायला मिळाली. मुळात कोणत्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक झाली? निवडणूक कितपत विश्‍वसनीय म्हणता येईल? पुतीन यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे? या तिन्ही प्रश्‍नांची उत्तरे याच क्रमाने अभ्यासली पाहिजेत.
चार वर्षांपूर्वी १८ मार्चला युक्रेनचा क्रीमिया प्रदेश स्वतःच्या देशाशी संलग्न करून घेण्यात रशियाला यश मिळाले. अर्थात क्रीमियात या प्रश्‍नावर सार्वमताचा घाट घालण्यात आला, तेव्हा तेथील लोकांनी रशियाच्या बाजूने कौल दिला. निवडणुकीची तारीख ठरविताना चार वर्षांपूर्वीची ही घटना विचारात घेण्यात आली. स्वतः पुतीन काळ्या समुद्रावरच्या क्रीमियन बंदरात - सिवास्तोपोलला १४ मार्चला गेले. त्याच दिवशी सिंफोरोपोल या शहरातही नखिमोव्ह चौकात गेले. १८५२ मध्ये रशियाला क्रीमियासाठी जे युद्ध करावे लागले होते, त्यात नखिमोव्ह हे रशियन आरमाराचे प्रमुख होते. पुतीन यांनी १४ मार्चच्या भाषणात ही स्मृती जागविली. ‘रशियन व क्रीमियन एकत्र आले तर आपल्या विरोधात कुणाचीही डाळ शिजणार नाही,’ हा पुतीन यांच्या भाषणाचा गाभा होता. १९५४ मध्ये निकिता ख्रुश्‍चेव यांच्याकडे रशियाचे नेतृत्व होते. त्यांनी स्वतःच्या अधिकारात क्रीमिया प्रदेश युक्रेनशी संलग्न केला. पुढे १९९१ मध्ये सोव्हिएत महासंघ कोसळला. रशिया व युक्रेन स्वतंत्र झाले. तेव्हापासून क्रीमिया पुन्हा रशियाशी जोडला जावा हा रशियन नागरिकांचा आग्रह होता. २०१४ मध्ये म्हणजे ख्रुश्‍चेवप्रणीत ‘भूदाना’ला साठ वर्षे उलटून गेल्यावर पुतीन यांना क्रीमियाच्या भूमीवर रशियाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळाले. त्यांनी या वर्षी क्रीमियात जाऊन मतदारांच्या या सुखद स्मृती जागविल्या आणि मतदारांनी कृतज्ञतेपोटी पुतीन यांच्या पारड्यात ७६ टक्के मते टाकली. पुतीन यांनी रशियन अंगार जागवून मते मिळवली असेही म्हणता येईल.

योगायोग असा की, गेल्या चार मार्चला इंग्लंडमध्ये एका हॉटेलात रशियाचे माजी गुप्तहेर सेर्गेई स्क्रिपाल व त्यांची मुलगी युलिया यांना विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी या विषबाधेचे खापर पुतीन सरकारवर फोडले. ‘स्क्रिपाल हे रशियाचे गुप्तहेर होते व रशियानेच विशिष्ट रसायने वापरून त्यांच्यावर व त्यांच्या कन्येवर विषप्रयोग केला,’ असा आरोप तर थेरेसा मे यांनी केलाच; पण रशियाच्या २३ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याचा आदेशही दिला. ब्रिटनच्या या धोरणाला अमेरिका, जर्मनी, फ्रान्स वगैरे देशांनी पाठिंबा दिला. गंमत म्हणजे पुतीन यांनी अशा रशियाविरोधी आक्षेपांचे भांडवल केले व ‘आपली कोंडी करणाऱ्या शत्रूंना धडा शिकवा,’ असे आवाहन मतदारांना केले.
ते प्रभावी ठरले. ७६ टक्के मते त्यांना मिळाली. सहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत त्यांना ६३ टक्के मते मिळाली होती. या वेळी त्यांच्याविरोधात सात उमेदवार होते. ग्रुदिनिन्‌ हे होते कम्युनिस्ट उमेदवार; त्यांना पावणेबारा टक्के, तर झिरिनोव्‌स्की या उमेदवाराला साडेपाच टक्के मते मिळाली. पुतीन यांनी राष्ट्रवादाचा अंगार फुलवून असे यश मिळविले हे वास्तव आहे, पण सार्वभौम रशियाची निर्मिती झाल्यानंतरच्या २७ वर्षांत रशियामध्ये कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे, राहणीमान काही प्रमाणात उंचावले आहे, जागतिक राजकारणात देशाचा प्रभाव वाढला आहे. मतदारांनी या कारणांमुळेही पुतीन यांच्या पारड्यात मते टाकली आहेत. नागरिकांच्या बोलण्यातूनही हे मुद्दे येत होते.  यापूर्वी १९६९ ते १९७१ अशी दोन वर्षे मी मॉस्कोत होतो; तेव्हा निवडणुकीत एकच पक्ष व एकच उमेदवार रिंगणात असे. जवळपास पन्नास वर्षे उलटल्यावर पुतीन यांच्या विरोधात सात पक्षांचे सात उमेदवार उभे राहिले. त्यापैकी बाबुरिन या उमेदवाराशी आम्हाला चर्चा करता आली. ते बोलत होते, अध्यक्षपदाचे एक उमेदवार या नात्याने. अशावेळी कोणताही उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवाराचे वाभाडे काढेल, त्याच्या धोरणातील गफलतींवर तुटून पडेल, असेच कुणीही म्हणेल. परंतु प्रत्यक्षात त्यांची सारी टीका होती, ती पूर्वाश्रमीचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्यावर. येल्त्सिन यांच्या धोरणांमुळे अर्थकारणाचे कसे नुकसान झाले, हे ते सांगत होते. पाश्‍चात्त्य देशांच्या ते कसे आहारी गेले होते, याचाही पाढा त्यांनी वाचला. पण पुतीन यांच्याविषयी मात्र अवाक्षरही काढले नाही. त्यांचे या बाबतीतील मौन रशियातील सध्याच्या स्थितीविषयी पुरेसे भाष्य करते. अर्थात  पुतीन यांच्याविरोधात उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या क्‍सेनिया सब्‌चाक या महिलेने मात्र दूरचित्रवाणीवर भाषण देताना पुतीन यांच्यावर टीकेची झोड उठविली होती व रशियन मतदारांनी ही टीका ऐकली होती, याचीही नोंद घ्यायला हवी.

  १९९१ मध्ये मी तीन महिने रशियात राहिलो व एक ‘बुडते जहाज’ पाहून भारतात परतलो. गेल्या २७ वर्षांत उद्‌ध्वस्त धर्मशाळेचे एका स्थिर राष्ट्रात रूपांतर करण्यात पुतीन यांना यश आले आहे. सोव्हिएत काळाशी तुलना करता रशियामध्ये लोकशाही मूळ धरत आह, असे म्हणावे लागते. ब्रिटनने ‘रशियाकडून विषप्रयोग झाला’ असा आरोप केला; पण पुरावा एकही दिला नाही. म्हणून ‘लंडन टाइम्स’च्या १६ मार्चच्या अंकात एड्‌वर्ड ल्युकास या स्तंभलेखकाने लेख लिहून ‘ब्रिटिश सरकारने पुतीन यांची मतांची थैली मजबूत केली,’ असे भाष्य केले हे नमूद करण्याची गरज आहे. यापूर्वी १९७१ मध्ये ब्रिटनकडून नव्वद रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली होती, आता २३ रशियन दूतांना ‘चले जाओ’ची नोटीस बजावण्यात आली आहे, तर रशियानेही तितक्‍याच ब्रिटिश दूतांना रशियातून निघून जाण्याचे आदेश दिले आहेत. रशियन मतदारांना या परिस्थितीत पुतीन यांची पाठराखण करणे इष्ट वाटले असणार.

पुतीन यांच्यासमोरची या पुढची आव्हाने जटिल आहेत. दहशतवाद पूर्णपणे आटोक्‍यात आलेला नाही.आर्थिक विकासाचा दर वर्तमानातही तीन टक्केच आहे. युरोप-अमेरिकेने लादलेले निर्बंध, खनिज तेलाच्या घसरलेल्या किमती, विषमता, निर्भेळ लोकशाही रुजविण्यातील अपयश असे अनेक प्रश्‍न आहेत.  रशियाने सध्या चीनशी सूत जुळविले आहे; पण चीनकडून एकाही शेजारी राष्ट्राला सुखस्वास्थ्य मिळालेले नाही, तेव्हा रशियालाही असाच अनुभव येण्याचा संभव आहे. सीरियामधे पाय रुजवून रशियाने भूमध्यसागराच्या किनाऱ्यावर स्वतःचे प्रभुत्व निर्माण केले असले, तरी तिथेही शंभर टक्के शाश्‍वती नाही. इराणशी म्हणजे शिया देशाशी रशियाची दोस्ती आहे; पण सौदी अरेबियासारख्या सुन्नी देशाबरोबर भरवशाची मैत्री जुळविण्याचीही गरज आहे. पुतीन २०२४ मध्ये रशियाचे अध्यक्ष म्हणून २५ वर्षांची कारकीर्द पूर्ण करतील. म्हणजे स्टॅलिननंतर इतका प्रदीर्घ काळ प्रमुखपदी राहिलेला नेता ही ओळख पक्की करण्यात पुतीन सफल होतील; पण स्टॅलिनसारखा क्रूर नेता ही ओळख त्यांना परवडणारी नाही.

Web Title: editorial dr ashok modak write article russia