इतिहासाला पडलेले एक क्रांतिस्वप्न

डॉ. जे. एफ. पाटील
शनिवार, 5 मे 2018

कार्ल मार्क्‍स हे तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, कायदा, गणित अशा विविध शाखांचा उच्चतम पातळीवर अभ्यास असणारे ‘सर्वांग परिपूर्ण सामाजिक शास्त्रज्ञ’ होते. त्यांचे विचार आजही संदर्भसंपन्न आहेत. या महान विचारवंताच्या जन्मद्विशताब्दी सांगतेनिमित्त विशेष लेख.

कार्ल मार्क्‍स हे तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, कायदा, गणित अशा विविध शाखांचा उच्चतम पातळीवर अभ्यास असणारे ‘सर्वांग परिपूर्ण सामाजिक शास्त्रज्ञ’ होते. त्यांचे विचार आजही संदर्भसंपन्न आहेत. या महान विचारवंताच्या जन्मद्विशताब्दी सांगतेनिमित्त विशेष लेख.

का र्ल मार्क्‍स यांच्या विचारांमुळे संपूर्ण जगाची विभागणी दोन परस्परविरोधी विचार व राष्ट्रगटांत झाली. दोन्ही महायुद्धांच्या मुळाशी हा वैचारिक संघर्षच मूलभूत घटक होता. अशा या दुभंगक कार्ल मार्क्‍स यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी झाला. बॉन व बर्लिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या मार्क्‍स यांनी वयाच्या २३ व्या वर्षी जेना विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळविली. जन्मभर लेखन, वाचन व संशोधन करणाऱ्या मार्क्‍स यांना अपेक्षित शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळाली नाही, हा दैवदुर्विलास. आयुष्यभर गरिबीचे जीवन ही त्यांची भौतिक वास्तविकता. संपादक म्हणून कोलोन येथील ‘ऱ्हायनिश झायटुंग’ या पत्रिकेचे काम करताना त्यांनी संघर्षवादी साम्यवादाची मांडणी केली; परंतु रशियन सरकारच्या दबावामुळे जर्मन सत्ताधाऱ्यांनी हे पत्रक बंद केले. काही काळ मार्क्‍स फ्रान्समध्येही होते; पण त्यांच्या जहाल विचारांमुळे त्यांना तेथून हद्दपार करण्यात आले. १८४९ मध्ये  मार्क्‍स लंडनला पुढच्या ३४ वर्षांसाठी स्थायिक झाले. त्या वास्तव्यात मार्क्‍स अधिक काळ ब्रिटिश म्युझियमच्या ग्रंथालयात वाचन, चिंतन, लेखन या वैचारिक निर्मितीच्या प्रक्रियेत मग्न होते. त्यांच्या गरिबीच्या काळात भांडवलदार फ्रेड्रिक एंजल्सची आर्थिक मदत हा मैत्रीचा वेगळा आदर्श होता.

मार्क्‍स यांच्या लेखनाची सुरवात १८४४ च्या ‘इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्‌स’पासून झाली. त्याच वर्षी त्यांनी ‘टोबर्डस ः दि क्रिटिक ऑफ दि हेगेलियन फिलॉसॉफी ऑफ राइट’ हा ग्रंथ लिहिला. त्यात ‘धर्म ही अफूची गोळी आहे,’ असे त्यांनी मांडले; पण कामगारउठावाची नवी रचनाही त्यातच स्पष्ट केली. १८४७ मध्ये ‘फिलॉसाफी ऑफ पॉव्हर्टी’ या ग्रंथावर परखड टीका करताना त्यांनी ‘दि पॉव्हर्टी ऑफ फिलॉसाफी’ हा ग्रंथ लिहिला. त्यात प्रथम वर्गसंघर्षाचा इतिहास म्हणजे मानवी इतिहास हे त्यांनी मांडले. दारिद्य्राची कारणमीमांसा व दारिद्य्रनिर्मूलनाची भूमिकाही त्याच ग्रंथात त्यांनी मांडली.

१८४८ मध्ये कम्युनिस्ट लीगच्या आग्रहाखातर त्यांनी एंजल्सबरोबर ‘दि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’- साम्यवादाचा जाहीरनामा हे छोटेसे; पण अत्यंत आक्रमक, स्फोटक, जळजळीत असे पुस्तक प्रकाशित केले. साम्यवादाची ही ‘ज्ञानेश्‍वरी’ मानावी लागेल. त्यानंतरच्या १८ वर्षांत मार्क्‍स यांनी प्रचंड संशोधन व व्यासंग करून जवळजवळ २५०० पृष्ठांचा ‘दि कॅपिटल’ हा महान ग्रंथ लिहिला. एका अर्थाने धर्म नाकारणाऱ्या मार्क्‍स यांच्या अनुयायांसाठी हा साम्यवादाचा धर्मग्रंथच मानावा लागेल. मार्क्‍स यांच्या हयातीत ‘दि कॅपिटल’चा पहिला खंडच प्रकाशित होऊ शकला. १८८५ मध्ये एन्जल्सने ‘दि कॅपिटल’ या ग्रंथाचा दुसरा; तर १८९४ मध्ये तिसरा खंड प्रकाशित केला. ‘दि कॅपिटल’ या ग्रंथात मार्क्‍स यांनी मुख्यत: श्रममूल्य सिद्धांत, श्रमिकांचे शोषण, सामाजिक मूल्य, भांडवलशाही व तिच्या निर्मितीमधील ‘अतिरिक्त मूल्या’च्या सिद्धांताची भूमिका हे महत्त्वाचे सिद्धान्त मांडले. मार्क्‍स हे इतिहासवादी तथा भौतिकवादी होते. त्यांचे विचार मोठ्या प्रमाणात जर्मन तत्त्वज्ञ हेगेल यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित होते. शास्त्रीय समाजवादाची संपूर्ण संकल्पनाच मार्क्‍स यांनी विशद केली. अर्थात हेगेल यांचा कारणमीमांसा क्रम कल्पना व भौतिक परिस्थिती असा होता. तो मार्क्‍स यांनी पूर्णत: उलटा केला. भौतिक परिस्थिती प्रथम व कल्पना नंतर अशी भूमिका स्वीकारून मार्क्‍स यांनी हेगेल यांना डोक्‍यावर उभे केले, असे विधान केले जाते.

‘ए कॉन्ट्रिब्यूशन टू द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या लेखनात मार्क्‍स यांनी उत्पादनसंबंध व त्यातून निर्माण होणारी सामाजिक व्यवस्था याचे महत्त्व स्पष्ट करून, भांडवलशाही हा सामाजिक उत्क्रांतीचा एक टप्पा आहे, अशी भूमिका मांडली. मार्क्‍स यांच्या अर्थशास्त्राचा पाया त्यांनी मांडलेल्या श्रममूल्य सिद्धान्तात आहे. वस्तुत: ॲडम स्मिथ, रिकार्डो यांच्या मूल्यसिद्धान्तावर आधारितच ही भूमिका आहे. सर्व संपत्तीचा जन्म पूर्णत: श्रमाच्या उत्पन्नातूनच होतो, ही मूळ भूमिका. श्रमाशिवाय दुसऱ्या कोणत्याही घटकामुळे उत्पन्न निर्माण होत नाही. भांडवल हा उत्पादनाचा दुसरा घटक मुळातच ‘संग्रहित श्रम’ किंवा ‘घट्ट केलेले (Congealed) श्रम’ असतात. ते कसे निर्माण होतात याचे स्पष्टीकरण करण्यासाठी मार्क्‍स अतिरिक्त मूल्याची संकल्पना वापरतात. तांत्रिक विश्‍लेषणाच्या क्‍लिष्टतेत न जाता, ही संकल्पना पुढीलप्रमाणे मांडता येईल. वस्तूचे (सेवेचे) विनिमय मूल्य मोजण्याचे साधन म्हणजे संबंधित वस्तू उत्पादित करण्यासाठी ‘सामाजिकदृष्ट्या आवश्‍यक श्रमवेळ.’ प्रचलित उत्पादनतंत्र व पद्धती लक्षात घेता, साधारण वेगाने साधारण कामगाराला संबंधित वस्तू निर्माण करण्यासाठी लागलेले कामाचे तास, असा मूळ अर्थ मार्क्‍स यांनी मांडला. सोप्या पद्धतीने असे म्हणता येईल, की श्रमाला दिले जाणारे वेतन त्याने केलेल्या श्रमवेळेच्या उत्पादनाच्या मूल्यापेक्षा कमी असते. यातूनच अतिरिक्त मूल्य व परिणामी भांडवल संचय होतो. मार्क्‍स यांचा वेतन सिद्धान्त निर्वाह सिद्धांताशी वरील मर्यादेत जुळतो. भांडवलसंचय, अधिक गुंतवणूक, अधिक उत्पादन ही आर्थिक विकासाची, संपत्तीनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया मूलत: विनिमयमूल्य उपयोगितामूल्यापेक्षा अधिक करण्याचा चमत्कार भांडवलशाही करते. यातूनच भांडवलदार व श्रमिक असे समाजाचे दोन वर्ग निर्माण होतात. त्यांच्यात संघर्ष होतो. हे नैसर्गिक आहे. या संघर्षाचा प्रवास वर्गविरहित समाजरचना व अखेरीस ‘राज्यरहित’ समाजव्यवस्था असा असतो. या नैसर्गिक प्रवाहाला प्रतिबंधित करणारी भांडवलशाही हितसंबंधांची समाजरचना मोडण्यासाठी वाढत्या प्रमाणात संघटित व सजग झालेला श्रमिक वर्ग क्रांतीचा मार्ग हाताळणे अपरिहार्य आहे, असे मार्क्‍स यांचे भाकीत होते. अशी क्रांती प्रथम इंग्लंड/युरोपमध्ये होईल हा त्यांचा अंदाज मात्र चुकला व रशियामध्ये- तुलनेने मागास राष्ट्रात साम्यवादी क्रांती झाली. भांडवलशाही क्रमश: आत्मनाशाकडे कशी जाते, याचे विश्‍लेषण करण्यासाठी मार्क्‍स नफ्याचे वाढते केंद्रीकरण, त्याबरोबर नफ्याचा घटता दर व अखेरीस आर्थिक अरिष्ट हा घटनाक्रम सविस्तरपणे मांडतात. मार्क्‍स यांचा एकूण मूल्यसिद्धान्त हा अभिजातवादी मूल्य सिद्धान्तावर आधारित असल्यामुळे मार्क्‍सवाद म्हणजे अभिजातवादी बुंध्यावर केलेले एक कलम आहे, असे मतही व्यक्त केले जाते.

आज मागे वळून पाहताना असे म्हणावे लागते, की मार्क्‍स यांनी श्रम या उत्पादक घटकाला देवत्वाच्या मखरात बसविले. जगाची सर्व संपत्ती श्रमाचे फलित आहे. त्याचे नियंत्रणही श्रमाकडेच असले पाहिजे. हे साधे; पण क्रांतिकारक सूत्र आहे. मार्क्‍स हे एक अवलिया अर्थशास्त्रज्ञ होते. तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, कायदा, गणित अशा विविध शाखांचा उच्चतम पातळीवर अभ्यास असणारे ते ‘सर्वांग परिपूर्ण सामाजिक शास्त्रज्ञ’ होते. मार्क्‍स यांच्या मते, भांडवलशाही-सामाजिक संबंधांतून भांडवलाला जुलूम करण्याची सामाजिक शक्ती प्राप्त होते; परंतु जुलुमाला अखेरीस जबर, प्रखर विरोध करणारा संघर्ष निर्माण होतोच.मार्क्‍स यांच्या लेखनामुळे जगाचे विचार, वृत्ती व कृती या पातळीवर स्पष्ट विघटन झाले. आर्थिक धोरणाचे व समाजरचनेचे दोन प्रकार विकसित होत गेले. भांडवलशाही समाज अंगभूत विस्फोटाने संपृक्त असतो. भांडवलाने श्रमिकांना लुटले. या लुटणाऱ्यांना लुटण्यासाठी जगाच्या सर्व श्रमिकांना संघटित होण्याचे आवाहन मार्क्‍स ज्या शैलीत व विश्‍लेषणाच्या आधारे ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’मध्ये करतात, ते वाचताना अंगावर शहारे येतात. मार्क्‍स यशस्वी की अयशस्वी, असा प्रश्‍न उपस्थित करणे निरर्थक आहे. मार्क्‍स यांचे विचार आजही संदर्भसंपन्न आहेत. अनियंत्रित भांडवलशाही हिंसात्मक संघर्ष निर्माण करू शकते व ते टाळण्यासाठीच श्रमिकांच्या सुरक्षेचे अनेक मार्ग व एकूणच कल्याणकारी राज्याची कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आली. कल्याणाचे अर्थशास्त्र, राज्य धोरणाचे निकष व समन्यायी समाजरचना या आता रुळलेल्या व्यवस्था एका अर्थाने मार्क्‍सवादाचे यशच अधोरेखित करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dr j f patil write karl marx article