रिट्रोविषाणू ः जन्मजन्मांतरीचे सोबती

डॉ. रमेश महाजन
गुरुवार, 22 मार्च 2018

सूक्ष्मजंतू आणि विषाणू संदर्भात सध्या जे संशोधन होत आहे, त्यातून त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध निदर्शनास येत आहे. व्याधिमुक्त आरोग्यातही त्यांचे आपल्या शरीरावर वेगळे साम्राज्य पसरलेले असतेच.

सूक्ष्मजंतू आणि विषाणू संदर्भात सध्या जे संशोधन होत आहे, त्यातून त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध निदर्शनास येत आहे. व्याधिमुक्त आरोग्यातही त्यांचे आपल्या शरीरावर वेगळे साम्राज्य पसरलेले असतेच.

वि षाणूंमध्ये डेंगी, चिकुनगुनिया आणि अधूनमधून डोकावणारा स्वाइन फ्लू हे सर्वांना परिचित आहेत. मोसम बदलाबरोबर त्यांचे आगमन होते आणि दमटणा कमी झाला की त्यांचा जोर ओसरतो. हे सर्व उपद्रवी विषाणू शरीरात काही काळ राहून निघून जातात. उपचाराविना प्राणघातकही ठरतात. या विषाणूंचा निचरा होत असल्याने हे सर्व उपरे विषाणू (एक्‍झोव्हायरसेस) म्हणायला हवेत. पण काही विषाणू शरीरात मुक्काम करण्याच्या उद्देशाने येतात आणि आपल्या ‘डीएनए’त झिरपण्याआधी ते आपले ‘आरएनए’चे रुपडे ‘डीएनए’त रूपांतरित करतात. या उलट्या रूपांतरामुळे त्यांना ‘रिट्रोविषाणू’ म्हणून ओळखले जाते.

मानवाचा आणि ‘रिट्रोविषाणूं’चा संबंध हा लक्षावधी वर्षांचा आहे. त्यांच्या काळाची मोजणी दशलक्ष वर्षांत होते. जलचर प्राण्यांचे कणाधारी (व्हर्टिब्रेट्‌स) जीवसृष्टीत पदार्पण झाल्यापासून ते आपल्या सहवासात आहेत. हा काळ जवळ जवळ पन्नास दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे ! या प्रदीर्घ कालावधीत अनेक ‘रिट्रोजिवाणू’ मानवासह अनेक प्राण्यांच्या शरीरात शिरून कालांतराने नष्ट झाले. अजूनही हे चक्र अव्याहत चालू आहे. हे विषाणू निष्प्रभ झाले असले, तरी त्यांची काही जनुके आणि अवषेष आपल्या ‘डीएनए’त ठेवून गेले आहेत. मानवी जनुकांचा आठ टक्के भाग अशा अवशेषांनी व्यापलेला आहे. या अवशेषांची गणना करण्यात आली आहे. त्यांची संख्या जवळ जवळ एक लाखांपर्यंत आहे ! विषाणूंच्या ‘डीएनए’तील क्रमवैशिष्ट्यांमुळे हे शक्‍य झाले आहे. अर्थात प्राचीन ‘रिट्रोविषाणूं’नी तेव्हा काय संसर्ग केले हे मात्र अज्ञात आहे.
मानवात वस्ती करून राहणारा सध्याचा ‘रिट्रोविषाणू’ म्हणजे ‘एचआयव्ही’चा विषाणू. त्याचा संसर्ग बऱ्याचशा लोकसंख्येत आहे. या खेरीज ‘ल्युकेमिया’ (रक्ताचा कर्करोग)  रिट्रोविषाणूंचा सीमित संसर्ग आहे. ‘एचआयव्ही’ विषाणूचा संसर्ग रक्तसंक्रमणाद्वारे किंवा लैंगिक संबंधातून होतो. हे सर्वज्ञात आहे. स्त्रीबीजातून किंवा शुक्रजंतूतून जेव्हा हे संक्रमित होतात तेव्हा ते गर्भात आणि मग पुढच्या पिढीत जात राहतात. सुदैवाने या विषाणूंचा संसर्ग काबूत ठेवणारी औषधे आहेत. शिवाय एकूण लोकसंख्येत ज्यांच्यात एचएलए (ए) अँटिजेन आहे, त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण कमी आहे.

‘एलटीआर’चे जग
आपल्या ‘डीएनए’तील अनेक विषाणू अवशेषात जनुके नियंत्रित करण्याची क्षमता आहे. ‘डीएनए’ क्रमाची वारंवारिता (रिपिटेशन) असलेल्या या अवशेषांना ‘लाँग टर्मिनल रिपिटस’ किंवा संक्षिप्तपणे ‘एलटीआर’ म्हणून संबोधले जाते. विषाणूतज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे एकूण पाचशे तेहेतीस मानवी जनुकांचे नियंत्रण या ‘एलटीआर’मुळे होत असावे. आपली एकूण जनुके वीस हजारापर्यंत धरली, तर त्यातील एकचतुर्थांश विषाणूंचे असे अप्रत्यक्ष नियंत्रण आहे ! उदाहरणेच द्यायची झाली तर रक्तनिर्मितीला लागणारे प्रमुख प्रथिन बिटा ग्लोबिन, कर्बयुक्त पदार्थांच्या पचनासाठी लागणारे बिटा अमायलेज, पित्त निर्मितीला लागणारी काही एनझाइम्स, तसेच लेप्टिन, एंडोथेलिन ही प्रथिने इत्यांदीचे नियंत्रण विषाणूंचे अवशेष करतात. आपल्या शरीराने मोठ्या खुबीने विषाणूंच्या या ‘स्पेअर पार्टस्‌’ना कामी लावलेले आहे.
विषाणूंच्या अवशेषांखेरीज आपण त्यांची काही जनुकेही वापरात आणत आहोत. रिट्रोविषाणूंचे त्यांच्या डीएनए क्रमांतील सुरवातीनुसार काही वर्ग केलेले आहेत. त्यातील ‘ईआरव्ही डब्ल्यू’ हा मानवाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा. यातील विषाणूंची वेष्टण करणारी प्रथिने (एनव्हलप प्रोटिन्स) आणि संबंधित जनुके आपल्या जनुकांमध्ये स्थापित झालेली आहेत. सातव्या गुणसूत्रानुसार ती आढळतात. प्रथिनांना सिनसायटिन्स म्हणतात. या प्रथिनांचे ‘फायदेशीर’ आणि ‘हानिकारक’ असे दोन्ही परिणाम त्यांच्यावरील कमी - जास्त नियंत्रणाने आढळतात.

सिनसायटिन्सचा फायदा
सिनसायटिन्सनी आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम केले आहेत. सिनसायटिन्सचे परत दोन प्रकार आहेत. सिनसायटिन १ व सिनसायटिन २. खरे तर विषाणू ही प्रथिने माणसाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी वापरतात. पण काळाच्या ओघात त्या प्रथिनांचा फायदा गर्भाच्या वाढीसाठी होत आहे. ती इतकी आवश्‍यक आहेत की त्यांच्या विना गर्भाची वाढच खुंटते ! एका दृष्टीने मानव वंशांचे सातत्य त्यांच्या हवाली आहे.

सिनसायटिन्स प्रथिनांची खासियत म्हणजे, त्यांच्यामुळे दोन विभिन्न पेशींचा संयोग (फ्युजन) होऊ शकतो. या गुणामुळे गर्भाची नाळ (प्लासेंटा) तयार करण्यासाठी ती उपयोगी पडतात. सिनसायटिन १ हे प्रथिन गर्भाची पेशी (ट्रोफोब्लास्ट्‌स) गर्भाशयाला जोडते, तर दुसऱ्या बाजूला सिसायटिन २ प्रथिन आईच्या प्रतिकार यंत्रणेला रोखून धरते. या दोन प्रथिनांचा खेळ प्रसूतीपर्यंत चालतो. एकदा का प्रसूती झाली की दोन्हीही प्रथिनांची निर्मिती थांबते. निसर्गाची एक अद्‌भुत किमया यातून पाहायला मिळते !
ही प्रथिने खरेच एवढी महत्त्वाची आहेत का, हे पाहण्यासाठी फ्रेंच संशोधक थायरी हाइडमॅन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उंदरावर प्रयोग केले. सिनसायटिन्स प्रथिनांची जनुके मादी उंदरातून काढून त्याचा परिणाम पाहण्यात आला. पिलांची वाढ त्यामुळे मध्यावरच खुंटली. असा प्रयोग मानवातही करता येईल. पण नैतिकदृष्ट्या ते शक्‍य नाही.

सिनसायटिन्स ही केवळ स्त्रियांत महत्त्वाची नाहीत, तर पुरुषांमध्येही ती आवश्‍यक आहेत. पुरुषांच्या स्नायूपेशातील घट्टपणा या प्रथिनांमुळे येतो. तसा परिणाम स्त्रियात होत नाही. एकाच प्रथिनाच्या स्त्री - पुरुषातील नियंत्रण क्रिया अशा वेगळ्या असतात.

प्रथिनांवरील नियंत्रण
‘रिट्रोविषाणूं’च्या या प्रथिन निर्मितीवरील नियंत्रण गेले तर मात्र विविध व्याधींना नियंत्रण मिळते. महिलांमध्ये त्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, तर पुरुषात वृषणांचा कर्करोग होऊ शकतो. प्रथिनांच्या अतिरिक्त निर्मितीमुळे ‘ऑटोइम्युन’ व्याधी होऊ शकतात. मज्जासंस्थेत त्यांची पातळी वाढली तरी मल्चटिपल स्क्‍लेरॉसिस (ज्यात मज्जापेशींच्या आवरणाचा ऱ्हास होतो) व्याधी होते.

‘स्किझोफ्रेनिया’चेही ते कारण बनू शकतात. आता या प्रथिनांचा संबंध प्रत्यक्ष व्याधीच्या मुळाशी आहे का केवळ लक्षण म्हणून आहे, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे. डार्विनच्या जैविक उत्क्रांतिवादात आतापर्यंत प्राण्यांच्या बाह्य गुणवैशिष्ट्यांचाच केवळ विचारझाला. पण आता त्या गुणवैशिष्ट्यांच्या मागे अंतर्गत विषाणूंचाही सहभाग कसा होता हे प्रकाशात येत आहे. दुसरे म्हणजे जनुकशास्त्र आजवर केवळ मानवी जनुकांचा विचार करीत होते. पण विषाणूंची जनुके आणि त्यांचे अवशेष यांचे त्या जनुकांवरील नियंत्रण यामुळे दोन्हींचा समग्र विचार मानवी आरोग्यासाठी करणे सध्या प्राप्त झाले आहे.

Web Title: editorial dr ramesh mahajan write health article