विशाल प्राण्यांतील कर्करोग नियंत्रण

डॉ. रमेश महाजन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

निरनिराळ्या प्राण्यांतील कर्करोगाच्या अभ्यासाने जी नवीन प्रथिने, विशिष्ठ जनुके, मिनी प्रतिपिंडे, काही संयुक्त शर्करा त्यांच्या विशिष्ट कार्यासह उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कर्करोगाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरांनी संपवणे शक्‍य होणार आहे!

निरनिराळ्या प्राण्यांतील कर्करोगाच्या अभ्यासाने जी नवीन प्रथिने, विशिष्ठ जनुके, मिनी प्रतिपिंडे, काही संयुक्त शर्करा त्यांच्या विशिष्ट कार्यासह उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कर्करोगाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरांनी संपवणे शक्‍य होणार आहे!

डि सेंबर २०१६ ला अमेरिकेच्या काँग्रेसने एका खास कायद्याद्वारे (कॅन्सर मूनशॉट इनिशिएटिव्ह) कर्करोगाच्या विविधांगी संशोधनासाठी जवळजवळ दोन अब्ज डॉलर निधीची तरतूद केली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आईचा अंडाशयाच्या कर्करोगाने आणि तत्कालिन उपाध्यक्ष जो बिडेन यांच्या मुलाचा मेंदूच्या कर्करोगाने अकाली मृत्यू झाला होता. त्यामुळे कर्करोगाच्या संशोधनासाठी या दोघांनी पुढाकार घेतला होता. कर्करोगाच्या नवीन संशोधनात विविध प्राण्यांतील कर्करोग आणि त्याचा प्रतिकार यावर भर देण्यात आला आहे.  बहुपेशीय प्राणी व त्यांच्या ‘डीएनए’तील बिघाड आणि त्याचे कर्करोगांत रूपांतर याबद्दल ब्रिटिश शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड पेटो यांनी संख्याशास्त्राच्या आधारावर आपले मत १९७७मध्ये प्रसिद्ध केले. त्यांचे संशोधन डॉ. पेटो यांचा विरोधाभास (पॅरॉडॉक्‍स) म्हणून प्रसिद्ध आहे. मताच्या पुष्टीसाठी त्यांनी माणसाची आणि उंदराची तुलना केली. माणसात उंदराच्या तुलनेने एक हजार पट अधिक पेशी असतात. पण, माणूस हा उंदरापेक्षा तीसपट अधिक जगतो. अधिक पेशी म्हणजे अधिक पेशी विभाजन आणि त्याप्रमाणात अधिक चुका मानवात हव्यात. पण तसे घडत नाही. उलट मोठ्या प्राण्यांत कर्करोगाची शक्‍यता कमी होत जाते. डॉ. पेटो यांचे निरीक्षण ढोबळपणे घ्यावे लागते, कारण त्यांना अपवादही आहेत.

महाकाय प्राण्यांची दोन उदाहरणे देता येतील. एक म्हणजे हत्ती आणि दुसरा म्हणजे देवमासा. एक जमिनीवरील दादा, तर दुसरा पाण्यातील. हत्तीसारख्या प्राण्यात तर माणसापेक्षा शंभर पट अधिक पेशी असतात. हत्तीतील पेशीविभाजन यंत्रणा कार्यक्षम असल्याने त्यांच्यात मानवाच्या तुलनेने कर्करोगांचे प्रमाण चौपटीने कमी आहे. हत्तीच्या कर्करोग प्रतिरोधाचे गुपित त्यामध्ये असलेल्या ‘पी ५३’ या कर्करोगविरोधी प्रथिनात आहे. ज्या पेशी अनिर्बंधपणे वाढतात, त्यावर हे प्रथिन अंकुश ठेवते.  माणसाच्या प्रत्येक पेशीत या प्रथिनाची एक जोडी असते, तर हत्तीच्या प्रत्येक पेशीत या प्रथिनाच्या वीस जोड्या म्हणजे एकूण चाळीस प्रथिने पेशीवर देखरेख ठेवतात! ‘पी ५३’ प्रथिन कर्करोगग्रस्त पेशींची वाढ प्रथम रोखते. आणि नंतर तिचा नाश घडवून आणते. ‘पी ५३’ प्रथिनाचे महत्त्व पाहता मानवी पेशींमधील ‘डीएनए’त या प्रथिनाची जादा जनुके समाविष्ट करून किंवा या प्रथिनाशी हुबेहूब साम्य असलेली जैविक रसायने पेशीत सामावून कर्करोग कितपत रोखता येतो, यावर अमेरिकेतील उटाह विद्यापीठाच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये शिफमन आणि त्यांचे सहकारी संशोधन करीत आहेत. असेच एक रसायन ‘नेटलिन’ नावाने ओळखले जाते. त्याच्या प्राण्यांमध्ये चाचण्या चालू आहेत.

उंदरात कर्करोगाचे प्रमाण अधिक असते, हे जरी खरे असले तरी त्यापैकी एका प्रजातीत त्याचे प्रमाण खूप कमी आहे. अशा उंदरांना ‘नेकेड मोल रॅट’ म्हणतात. दिसायला ओंगळ आणि दातांचे सुळे (मोल) उघडे असणाऱ्या उंदराला केसच नसतात. त्यामुळे ते उंदरासारखे दिसत नाहीत. यांचे जीवनमान सामान्य उंदरांपेक्षा दसपट आहे. या उंदरांतील पेशींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पेशी आवरणात हायालूरोनन नावाची दीर्घ लांबीची संयुक्त शर्करा असते. त्यामुळे पेशी कधी एकगठ्ठा होत नाहीत आणि त्यापासून कर्करोगाची गाठ होऊ शकत नाही. मानवाच्या पेशीतही ही शर्करा असते, पण तिची लांबी कमी असते. आता दीर्घ लांबीची शर्करा मानवात उपयोगी पडेल का, हे पाहण्यासाठी इतर प्राण्यांत प्रथम त्याची पाहणी चालू आहे. हत्तीखेरीज पाण्यातील मोठा प्राणी म्हणजे देवमासा. यात धनुष्याकृती डोके असलेला ‘बो हेड व्हेल’ सहसा कर्करोगमुक्त असतो. या माशातील पेशींबद्दल रॉचेस्टर विद्यापीठातील व्हेरा गोर्बुनोव्हांचे संशोधन महत्त्वाचे आहे. देवमाशांच्या पेशी प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या वाढवता येतात. अशा पेशी कर्करोगी करण्याच्या काही पद्धती आहेत. पण, त्या कुठल्याचाही या पेशींवर परिणाम होत नाही आणि पेशी कर्करोगमुक्त राहतात! देवमाशाच्या डीएनएची रचना नक्की कशी असते, हे पाहण्यासाठी २०१५ मध्ये संशोधकांनी देवमाशाचा पूर्ण जनुकीय आराखडा तपासून बघितला. इतर माशांच्या तुलनेत काही लक्षणीय बदल (म्युटेशन्स) त्यात दिसून आले. या बदलामुळेच देवमासा कर्करोगापासून मुक्त राहू शकतो, असा निष्कर्ष काढला गेला. देवमाशाच्या नक्की कुठल्या जनुकांमुळे कर्करोगाला प्रतिरोध होतो, हे पाहण्यासाठी ती आलटून-पालटून उंदराच्या डीएनएत समाविष्ट करून त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, याबद्दल निरीक्षणे चालू आहेत.

उंटांतील अँटीबोडी
मोठ्या प्राण्यांतील कर्करोगाची तुलना करताना ‘वाळवंटातील जहाज’ अशा उंटाचा विचार होतो. अरब जगतात उंट आणि उंटिणीला महत्त्व आहे. विशेषतः उंटिणीचे दूध व मूत्राला विशेष महत्त्व दिले जाते. एकंदरीत उंटांत कर्करोगाचे अस्तित्व नाही. त्यासाठी उंटाच्या प्रतिपिंडाची (अँटीबॉडी) पाहणी करण्यात आली. माणसात एकाच आकाराची प्रतिपिंडे असतात, तर उंटात नेहमीच्या आकाराची आणि लहान आकाराची अशी त्यांची निम्मी-निम्मी संख्या असते. यापैकी लहान प्रतिपिंडे मानवी प्रतिपिंडांच्या दसपट लहान असतात. त्यामुळे त्यांना मिनी किंवा नॅनो प्रतिपिंडे म्हणतात. त्यांच्या लहान आकारामुळे ती उंटिणीच्या दुधात व मूत्रात आढळून येतात. प्रतिकारशक्तीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कर्करोग पेशींचा नाश करण्यासाठी यांचा उपयोग होऊ शकतो. उंटाखेरीज शार्क माशामध्येही ही मिनी प्रतिपिंडे आढळतात. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात तयार करून प्रयोगासाठी वापरणे आता शक्‍य झाले आहे. अशा प्रतिपिंडांना विविध कर्करोग रोधी औषधे जोडून त्यांची उपयुक्तता निरनिराळ्या प्राण्यांत अजमावली जात आहे. या प्रतिपिंडांचा बहिर्गोल पृष्ठभाग कर्करोगपेशीशी सहज संयोग करू शकतो. मिनी प्रतिपिंडांची उपयोगिता पाहता ती मानवी प्रथिनांपासून हुबेहूब तयार करून पाहणे हा पुढचा भाग आहे. त्यामुळे शरीरात अतिरिक्त परिणाम होणार नाहीत.

कर्करोगाला आळा घालण्यासाठी जसा तुलनेने कर्करोगमुक्त प्राण्यातील खुबींचा उपयोग होतो आहे, तसा ज्या प्राण्यांत कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. त्यातील कर्करोगाची वाढ कशी होत आहे, हे पाहूनही होत आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर शुद्ध वाणाच्या प्रजननातून निर्माण झालेली कुत्री, हे देता येईल. त्यांचा जवळच्या नात्यातील संकर कर्करोगाचे प्रमाण क्रमशः वाढवतो. मग ही कुत्री अनुवांशिकरीत्या कर्करोगाचे संक्रमण करतात. त्यांच्यातील मूत्राशयाचा कर्करोग सखोलपणे अभ्यासला गेला आहे. मानवातील मूत्राशयाच्या कर्करोगाचे त्याच्याशी साम्य आहे. अशी चार जनुके दोन्ही कर्करोगात समान आहेत. या साम्यामुळे कुत्र्यावरील विविध औषधोपचाराचे परिणाम पाहून आपल्या नेहमीच्या उपचारात त्याचा समावेश करणे सोपे झाले आहे.

Web Title: editorial dr ramesh mahajan write health cancer article