सत्तालालसेवर सुधारणांचे आवरण

nikhil shrawge
nikhil shrawge

सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे.

सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या यादीमध्ये पत्रकार जमाल खशोगी हे एक अग्रणी नाव. नेमके निरीक्षण आणि अचूक भाकीत करण्यात हातखंडा, तथ्यपूर्ण आणि तपशीलवार लेखन अशी खशोगी यांची ओळख. सौदी राजघराण्याच्या प्रभावळीत उठबस असल्याने त्यांनी महत्त्वाची पदेही सांभाळली. पण त्याचबरोबर कठोर लिखाण केल्यामुळे त्यांनी अनेकदा सौदी राजघराण्याची नाराजीदेखील ओढवून घेतली. २०१६ नंतर सौदी अरेबियात राजे सलमान यांचे पुत्र मोहम्मद बिन सलमान यांचे प्रस्थ वाढत गेले आणि खशोगींच्या लिखाणाला धार चढली. बिन सलमान यांची राजवट आवश्‍यक तितके स्वातंत्र्य देऊ शकत नसल्याने त्यांनी अमेरिकेचा आसरा घेतला. गेल्या आठवड्यात ते तुर्कस्तानातील सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात काही कामानिमित्त गेले आणि तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. वरकरणी सोप्या दिसणाऱ्या या घटनेला अनेक अंतर्गत पदर आहेत. बिन सलमान यांची एकाधिकारशाहीकडे सुरू असणारी वाटचाल हा त्यातला महत्त्वाचा कंगोरा.

सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्रिपद २०१५मध्ये हाती घेतल्यापासून बिन सलमान यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढीला लागली आहे. पश्‍चिम आशियावरील नेतृत्वाच्या स्वप्नाने पछाडलेले बिन सलमान आपले सामर्थ्य हव्या त्या मार्गाने प्रस्थापित करू पाहत आहेत. गेल्या तीन वर्षांतील घटनाक्रम त्यांची राजकीय भूक दाखवून देत आहे. २०१४ च्या तुलनेत खनिज तेलाचे कमी झालेले भाव डोक्‍यात ठेऊन त्यांनी २०३०पर्यंत सौदी अर्थव्यवस्थेची तेलावरील मदार कमी करण्याचे धोरण आखले आहे. परकी गुंतवणूक आणि जागतिक विश्वासार्हतेच्या वाढीसाठी परंपरानिष्ठ समाजाला नवा आणि आधुनिक विचार देण्याचा आव ते आणत आहेत. पण हे करत असतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना थेट संपवण्याचा एककलमी कार्यक्रम बिन सलमान यांनी हाती घेतला आहे. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. तुर्कस्तानातील वाणिज्य दूतावासात खशोगींना पाचारण करून त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार मारल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण घटनेचा तपशील हळूहळू पुढे येत आहे. तो पाहता आपल्या मार्गात येणाऱ्याला बाजूला करताना बिन सलमान यांची मजल कुठपर्यंत जाऊ शकते हे यावरून स्पष्टपणे दिसते. जमाल खशोगींचा काटा काढून त्यांनी एकच खळबळ माजवून दिली आहे. तूर्तास, खशोगींचा काहीच पत्ता लागलेला नाही. १९७८मध्ये लेबनॉनमधील धर्मगुरू मुसा अल-सदर यांना लिबियाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांनी लिबियात भेटीचे निमंत्रण दिले. या भेटीनंतर अल-सदर यांना आजतागायत कोणीही पाहिलेले नाही. बिन सलमान यांनीही हेच केले असल्याचे दिसते. या सगळ्यांबाबत सौदी अरेबियाने कानावर हात ठेवले आहेत. मात्र, दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुटी देणे, अंतर्गत कॅमेरे बंद असणे यामुळे संशयाची सुई रियाधकडे वळली आहे. संपूर्ण घटनाक्रम बघता हा प्रकार बिन सलमान यांना जड जाईल असे वाटते.

राजपुत्र मोहम्मद बिन नाएफ यांना बाजूला सारत ताब्यात घेतलेले युवराजपद, काहीतरी अचाट करून दाखवण्यासाठी घातलेला येमेन युद्धाचा डाव आणि त्यात आलेले अपयश, भ्रष्टाचार विरोधाचा झेंडा दाखवत बडे सौदी राजपुत्र व माजी मंत्र्यांना अटक करीत त्यांच्या संपत्तीवर आणलेली टाच, कतारला कोंडीत गाठण्यासाठी अरब देशांची बांधलेली मोट हे प्रकार करतानाच देशांतर्गत विरोधकांना व टीकाकारांना गजाआड अथवा ‘गायब’ करण्याची कला बिन सलमान यांनी अवगत केली आहे. राजे सलमान यांच्या आडून अप्रत्यक्षपणे सौदी अरेबियाचा गाडा हाकणारे बिन सलमान आपला प्रवास कोणत्या दिशेने जाणार आहे याची प्रचिती गेली तीन वर्षे देत आहेत. त्यांच्या या प्रवासात बहारीन, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त या धर्मभावांनी धर्ममान्यता दिली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने थेट वॉशिंग्टनमधून राजमान्यता मिळाली. सौदीसारख्या देशात त्यामुळे निर्दयपणे सत्ता राबवण्यासाठी लागणारा सर्व दारूगोळा त्यांच्यापाशी आहे. तो या जमाल खशोगी प्रकरणात वापरून बिन सलमान यांनी आपल्या कारभाराची दिशा सूचित केली आहे. गेल्याच आठवड्यात ‘इंटरपोल’चे प्रमुख चीनमध्ये जाऊन असेच ‘गायब’ झाले होते. नंतर त्यांनी चीनमधूनच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, टीकाकारांना ‘शांत’ करणाऱ्यांच्या पंक्तीत रशियाचे व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग यांच्यासोबत आता बिन सलमान जाऊन बसले आहेत.

एकीकडे सर्वसामान्य सौदी समाजात आणि त्यांच्या राहणीमानात मूलभूत बदल घडवण्याच्या मुलाम्याच्या आड बिन सलमान आपला खरा चेहरा दडवत आहेत हे आता उघड होत आहे. खशोगी बेपत्ता होण्याच्या संदर्भात हाती लागलेले सर्व पुरावे जाहीर करीत तुर्कस्तान आणि अमेरिका आता बिन सलमान यांना जाब विचारणार काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कतारला वाळीत टाकण्याच्या प्रकरणात सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे, सौदी अरेबियाची कोंडी करण्याची चालून आलेली ही आयती संधी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप एर्दोगन घालवणार नाहीत असे म्हणायला वाव आहे. पण, एर्दोगन हे चाणाक्ष आणि संधिसाधू समजले जातात. सीरियाच्या युद्धाच्या सुरवातीला सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधाची भाषा करणारे एर्दोगन आता आठ वर्षांनंतर असद गटाभोवती घुटमळताना दिसतात. तसेच, तुर्कस्तानमध्ये देशांतर्गत पत्रकारांना आणि टीकाकारांना गप्प करण्यात एर्दोगन यांची राजवट बिन सलमान यांच्या तोडीस तोड आहे. त्यामुळे ते कोणत्या नैतिकतेच्या आधारावर बिन सलमान यांना जाब विचारणार हा प्रश्न उरतोच. राजकारण एरवी कायमच नैतिकतेच्या पलीकडे सुरू होत असताना, एर्दोगन आपल्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी जमाल खशोगी प्रकरणाचा वापर करीत सौदीच्या बिन सलमान यांच्याकडून बरीच माया उकळतील असा कयास आहे. दुसरीकडे, बिन सलमान आणि ट्रम्प हे दोघेही तसे एकमेकांचे विशेष स्नेही. ट्रम्प हे बिन सलमान यांच्यासारखी निर्विवाद सत्तेची आस राखतात, तर बिन सलमान यांना ट्रम्प यांच्याकडे असलेले अमर्याद सामर्थ्य खुणावते. या दोघांनाही लोकशाहीचे आणि पत्रकारांचे विशेष कौतुक नाही, असलाच तर दुःस्वास आहे. त्यामुळे, जुजबी लक्ष घालण्यापलीकडे ट्रम्प या प्रकरणात जास्त काही करतील असे वाटत नाही. सौदी अरेबियाला शस्त्रास्त्रे विकून मुबलक फायदा होत आहे तोपर्यंत अमेरिका याकडे दुर्लक्ष करील. अमेरिकेच्या अशाच धोरणामुळे अनेक हुकूमशहा तयार झालेले जगाने पाहिले आहेत. मात्र, बिन सलमान मात्र यातून सहीसलामत वाचल्यास, ते कोणत्या टीकाकाराला आपला पुढचा बळी बनवतील याचा नेम नाही. त्यासाठी आता जागेचेही बंधन नाही. म्हणूनच सगळे पुरावे विरोधात जात असल्याने हे प्रकरण अंगाशी येत असताना, अमेरिका, तुर्कस्तान, तसेच समाजमाध्यमे यांना झुलवत बिन सलमान हे प्रकरण कसे दडपून टाकतात हे बघावे लागेल. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करता त्यांच्या या ‘कौशल्या’वरच त्यांच्या पुढील राजकारणाचा आणि कार्यशैलीचा रोख स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com