सर्जिकल स्ट्राइक नि राजकीय हल्ले

शशिकांत पित्रे
मंगळवार, 10 जुलै 2018

‘सर्जिकल स्ट्राइक’च्या व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला. या लष्करी कारवाईचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांच्या मानगुटीवर बसलेले ‘सर्जिकल स्ट्राइक’चे भूत जितक्‍या लवकर उतरेल तितके बरे!

‘सर्जिकल स्ट्राइक’च्या व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला. या लष्करी कारवाईचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांच्या मानगुटीवर बसलेले ‘सर्जिकल स्ट्राइक’चे भूत जितक्‍या लवकर उतरेल तितके बरे!

सै न्यदलांच्या व्यावसायिक साहित्यात आणि प्रबोधनात एकवाक्‍यता आणण्यासाठी सैनिकी परिभाषिक शब्दांची सर्वसमावेशक सूची तयार करण्यात आली आहे. सैन्यातील शिपायापासून जनरलपर्यंत सर्वांनी विविध परिभाषांचा एकच अर्थ लावावा आणि विशिष्ट परिभाषेबद्दल प्रत्येकाच्या आकलनात समानता यावी ही त्यामागील कल्पना. या पुस्तिकेचे शीर्षक आहे : ‘ग्लॉसरी ऑफ मिलिटरी टर्म्स’. प्रत्येक सेनाधिकाऱ्यासाठी व्यावसायिक ज्ञानाचे हे ‘बायबल’ म्हणता येईल. प्रवेशापासून ते निवृत्तीपर्यंत या परिभाषांचे अनेकदा पारायण आणि चिंतन होत राहते. त्यात नवनवीन परिभाषांची मिळवणी होत राहते, परंतु ती नव्या परिभाषेच्या आशयाची सर्वांगीण चिकित्सा झाल्यावर आणि त्याला सर्वोच्च स्तरावरून संमती मिळाल्यावरच. पण या ‘ग्लॉसरी’मध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’ या शब्दप्रचाराचा अद्याप समावेश नाही. दुर्दैवाने सैनिकी परिभाषेबद्दल पूर्ण अनभिज्ञ असलेल्या राजकीय पंडितांमध्ये या शब्दाचे विविध अर्थ लावून त्याचे आपल्याला फायदेशीर होईल असे भांडवल करण्याची स्पर्धा लागली आहे. कोणत्याही प्रसंगाचे किंवा संहितेचे आपल्याला अनुकूल, मग ते कितीही परस्परविरोधी असेनात, असे अर्थ लावून त्यातून लभ्यांश साधणे हा पक्षीय राजकारणाच्या डावपेचांचा अविभाज्य भाग आहे. परंतु, त्या वादात सैन्यदलांना ओढणे गैर आहे.

‘सर्जिकल स्ट्राइक’ ही संज्ञा प्रामुख्याने अमेरिकी सैन्याच्या शब्दकोशामधील. ओसामा बिन लादेनवर अमेरिकेच्या ‘नेव्ही सील्स’नी केलेला हल्ला हे तिचे समर्पक उदाहरण. अलीकडेच भारतीय लष्कराच्या वापरात मोठ्या गाजावाजा करीत ती घुसली आहे. २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्याने काश्‍मीरमधील ताबारेषेपार पाकिस्तानी दहशतवाद्यांवर केलेल्या यशस्वी एल्गारानंतर त्याला अवास्तव चालना व प्रसिद्धी मिळाली आहे. शत्रूवर छोट्या प्रमाणात अचानक गुप्त हल्ले चढवण्याच्या संदर्भात ती वापरली जाते. भारतीय लष्करात अशा छुप्या हल्ल्यासाठी ‘रेड’ म्हणजे ‘गनिमी हल्ला’ असा साधासुधा शब्द वापरात आहे. ‘स्पेशल फोर्सेस’, कमांडो किंवा इन्फन्ट्री बटालियनच्या विशेष प्रशिक्षित ‘घातक’ प्लॅटून यांच्याकरवी सुगावा लागू न देता शत्रूवर विजेच्या वेगाने झंझावाती हल्ला चढवून, त्याची मोठी हानी करून सुरक्षित परतायचे, हा या दोन्ही कारवायांचा आत्मा.

जगभर लष्करी कारवायांच्या स्वरूपात झपाट्याने होणाऱ्या स्थित्यंतरांमुळे ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘रेड’ यांच्यात आता एक मूलभूत अंतर निर्माण झाले आहे आणि त्याची तीन प्रमुख परिमाणे म्हणजे निर्णयाची पातळी, संसाधनांचे प्रमाण आणि त्यातून उद्‌भवणारी संभाव्य राजकीय परिणती. ‘रेड’ची कारवाई सीमारेषेवर तैनात असलेली बटालियन किंवा ब्रिगेड योग्य संधी आणि माहिती मिळाल्यावर उपलब्ध मनुष्यबळ आणि हत्यारे वापरून पार पाडते. त्याची सूचना वरिष्ठ मुख्यालयाला दिली जाते. परंतु, त्याच्या परवानगीसाठी थांबण्याची गरज नसते. कोणत्याही पातळीवरील सरकारी संमतीचा यात प्रश्नच उद्‌भवत नाही, कारण अशा कारवाईचे आंतरराष्ट्रीय पडसाद नगण्य असतात. अशा अनेक ‘रेड’ सीमेवरील भारतीय तुकड्या नेहमी करत असतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’ मात्र सीमेवर सातत्याने घडणाऱ्या हितशत्रूंच्या खोडसाळपणाला प्रत्युत्तर म्हणून किंवा राजकीय धोरणाचा भाग म्हणून केला जातो. त्याचे राजकीय पडसाद हाताबाहेर जाण्याची शक्‍यता असल्याने त्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च पातळीवर होतो. त्यासाठी निःसंदिग्ध माहिती हाताशी असणे आणि लक्ष्याच्या सान्निध्यातील ‘ऑपरेशनल सिच्युएशन’ आपल्याला अनुकूल असणे अपरिहार्य असते. कारवाईसाठी ‘स्पेशल फोर्स कमांडों’चा वापर केला जातो. लष्कराकडील उपलब्ध आधुनिक हत्यारे, साहित्य, संपर्कसाधने आणि वाहतुकीची माध्यमे वापरात आणण्यावर बंधन नसते. त्याचबरोबर आवश्‍यकतेनुसार हवाई दल, नौदलाचे साह्य घेण्यास संमती दिली जाते. थोडक्‍यात या कारवाईच्या यशाची खात्री करण्यात किंचितही कसर ठेवली जात नाही. कारण ‘सर्जिकल स्ट्राइक’ अयशस्वी झाला, तर त्याचे सामरिक आणि राजकीय परिणाम गंभीर असू शकतात.
सप्टेंबर २०१६चा काश्‍मीर ताबारेषेवरील ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा भारतीय सैनिकी इतिहासातील अजोड अध्याय होता. त्याचा अर्थ १९७१ मधील निर्णायक आणि अद्वितीय विजयाशी त्याची तुलना होते आहे वा ‘१९७१’चे अवमूल्यन होत आहे असे निष्कर्ष काढणे अवास्तव आहे. या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा निर्णय सर्वोच्च स्तरावर घेतला गेला होता. तो अत्यंत जोखीमपूर्ण होता यात शंका नाही. म्हणूनच शासनकर्त्यांना या निर्णयाचे श्रेय देण्यात काहीच गैर नाही. देशाला या महत्त्वाच्या लष्करी कारवाईची माहिती देणे आणि त्यामुळे राष्ट्रीय मनोधैर्य उंचावणे अपेक्षित होते. अद्वितीय व्यावसायिक कौशल्य, कार्यनिष्ठेची उच्च पातळी, खडतर प्रशिक्षणाची गुणवत्ता, विविध घटकांच्या सामरिक एकवाक्‍यतेचे तादात्म्य या आणि इतर अनेक क्षमतांसाठी लष्कराची पाठ थोपटली जाणे आवश्‍यक होते.
उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अतोनात राजकीय आणि सामाजिक दबाव येत असूनही ‘आम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे सडेतोड उत्तर देऊ,’ असे आश्वासन लष्कराने दिले आणि त्यानुसार २९ सप्टेंबरला ‘डीजीएमओ’नी या कारवाईची माहिती जाहीर केली. लष्कराने याबाबत कोणतेही फाजील श्रेय न घेता सत्य परिस्थिती देशासमोर ठेवली. त्यानंतर मात्र या कारवाईचे राजकारण करण्याचा आणि त्यातून अधिकाधिक राजकीय लाभ घेण्याच्या स्पर्धेला पेव फुटले. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ही कारवाई झालीच नाही, असा दावा केला. भारतीय लष्कराची ही अवहेलना होतीच; पण आपल्याच लष्कराच्या नैतिक मूल्यांबाबत घोर अज्ञानाचे हे हास्यास्पद प्रदर्शन होते. लष्कराचा कोणताही वरिष्ठ अधिकारी खोटे दावे करणार नाही. कारण त्याला माहीत आहे की तो त्यामुळे आपल्या जवानांचा विश्वास गमावून बसेल. नंतर अनेक पुरावे समोर येऊनही एकाही नेत्याने लष्कराची माफी मागण्याचे सौजन्य दाखवले नाही. किंबहुना लष्करी अध्यायातील हे सोनेरी पान सैन्याच्या सिंहावलोकनासाठी सोडून देऊन, त्याचा संदर्भ राजकीय सभांमध्ये टाळणे योग्य ठरले असते. परंतु, सत्ताधारी घटक मतपेटीच्या राजकारणासाठी त्याचा उपयोग करण्याचा मोह टाळू शकले नाहीत. हे लष्कराच्या धाडसाला दिलेले दुर्दैवी वळण होते. मग ‘रक्ताच्या दलालीच्या’ भाषेने तर सैन्याच्या कामगिरीला अमंगळ स्वरूप दिले गेले. भारतीय सैन्यदले त्यांचा काहीही दोष नसताना विनाकारण खिंडीत अडकवली जात होती. ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘रेड’ यातील फरक न जाणता पूर्वीसुद्धा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आले होते, असा व्यर्थ युक्तिवाद सुरू झाला. दोन्ही वेळी तेच सैन्य कार्यरत होते, याचा संबंधितांना विसर पडला होता. दुसरीकडे ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या व्हिडिओचा काही भाग वाहिन्यांनी प्रसारित केला. पण कळस म्हणजे ते दाखवताना काही वाहिन्यांवरील चर्चेत राजकीय नेत्यांनी हे व्हिडिओ खोटे असल्याचा दावा करून लष्कराचा अपमान केला. ‘सर्जिकल स्ट्राइक’ ही एक लष्करी कारवाई होती. त्यात वापरलेल्या सामरिक डावपेचांची जंत्री गुप्त ठेवणे अत्यावश्‍यक आहे. तेव्हा राजकारण्यांच्या मानगुटीवर बसलेले ‘सर्जिकल स्ट्राइक’चे भूत जितक्‍या लवकर उतरेल तितके बरे!

Web Title: editorial shashikant pitre write surgical strike article