‘बुआ-भतीजां’चा विजय (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

भाजपच्या अवाढव्य यंत्रणेला चकविणारी राजकीय समीकरणेही मांडता येतात आणि यशस्वी होतात, हे पोटनिवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले. त्यातून विरोधकांचा आत्मविश्‍वास वाढेल.

भाजपच्या अवाढव्य यंत्रणेला चकविणारी राजकीय समीकरणेही मांडता येतात आणि यशस्वी होतात, हे पोटनिवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले. त्यातून विरोधकांचा आत्मविश्‍वास वाढेल.

कोणतीही निवडणूक गांभीर्याने घेणाऱ्या भाजपला उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत दणका बसला. त्या पक्षाला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हा इशारा आहे. पोटनिवडणुकांतून फार व्यापक अर्थ काढायचे नसतात; मात्र ज्या रीतीने योगींच्या घरच्या मैदानावर समाजवादी पक्षाने(सप) भाजपला धूळ चारली, ती दखलपात्र आहे. एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती करूनही पराभव झालेल्या ‘सप’ साठी आणि अस्तित्वासाठी झगडत असलेल्या मायावतींसाठीही हा विजय दिलासादायक आहे. भाजपला रोखता येऊ शकते, हा आत्मविश्‍वास त्यातून निर्माण होऊ शकतो. बिहारमध्ये तुरुंगातील लालूप्रसादही नितीशकुमारांसह भाजपला दणका देऊ शकतात, हे दिसले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर हा योगींचा मतदारसंघ; तर फुलपूर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा. राज्याचे नेतृत्व करणारे दोन्ही नेते घरच्या आखाड्यात चारी मुंड्या चीत व्हावेत, हे पक्षासाठी चांगले लक्षण नाही. आदित्यनाथ यांचे राजकारण उघड हिंदुत्वाचा प्रचार करणारे आहे. ऐन निवडणुकीत मतदारांचे ध्रुवीकरण करणे, ही रणनीती उत्तर प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात यशस्वी झाली होती त्याचे बक्षिसही योगींना मिळाले, इतकेच नाही तर ते स्टार प्रचारक म्हणून गुजरात, त्रिपुरापासून कर्नाटकपर्यंत मुलूखगिरी करू लागले होते. यात अर्थातच त्यांच्या उग्र हिंदुत्ववादी प्रतिमेचा लाभ घेण्याचे राजकारण होते; मात्र आपल्याच पाच वेळा जिंकलेल्या मतदारसंघात पक्षाचा पराभव झाल्याने योगींच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. भाजपपेक्षा योगींसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. सप विजयी झाला, याचे एक कारण मायावती आणि अखिलेश यादव हे बुआ-भतीजा एकत्र येण्यात नक्कीच आहे. कधीकाळी  मुलायमसिंह आणि कांशिराम यांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली होती. ती युती तुटली आणि पुढे कटुता निर्माण झाली. दोन्हींच्या मतपेढ्यांतील स्पर्धा उघड आहे. मुलायमसिहांनी यादव -मुस्लिम मतपेढी बांधण्यात यश मिळविले, तर मायावतींनी दलितांसोबत कधी ब्राह्मणांसह वरिष्ठ मानल्या जाणाऱ्या जाती, तर कधी यादवेतर ओबीसी यांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न केला. भाजपच्या झंझावाताने या साऱ्याच मतपेढ्या आणि त्याभोवतीची पारंपरिक गणिते लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत उद्‌ध्वस्त झाली होती. यातून भाजपने साकारलेले समीकरण अजिंक्‍य असल्याचा समजही तयार केला गेला. मात्र राजकारण प्रवाही असते, याचे प्रत्यंतर हे निकाल देत आहेत. एकत्र येणे ही सप - बसपची राजकीय अनिवार्यता होती. मात्र अशा प्रकारच्या समझोत्यात मते एकमेकांकडे वळवणे सोपे नसते. या निवडणुकीत बसपची मतपेढी सपाकडे वळविण्यात आलेले यश उत्तर प्रदेशातील पुढच्या राजकारणासाठी मॉडेल ठरू शकते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विचार करता भाजपसाठी हा जास्त चिंतेचा विषय ठरतो. या दोन्ही मतदारसंघांत सप-बसपच्या त्यावेळच्या एकत्रित मतांहूनही सुमारे दहा टक्के जादा मते सपच्या उमेदवारांना मिळाली. म्हणजेच भाजपची तेवढी मते फिरली. बिहारमध्येही लालूंच्या राजदच्या मतांत आठ टक्‍क्‍यांची वाढ झाली. बिहार आणि उत्तर प्रदेश ही देशातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आणि मोक्‍याची राज्ये आहेत. नरेंद्र मोदींचा २०१४ च्या विजयात याच राज्याचा वाटा मोठा होता. तिथल्या विजयानंतरच अमित शहांच्या रणनीतीचा, `पन्ना प्रमुख़ां’सारख्या रचनेचा बोलबाला सुरू झाला. या पार्श्‍वभूमीवर पोटनिवडणुकांचे निकाल काही बदलत्या हवेचे संकेत देत असतील, तर ती बाब मरगळलेल्या विरोधकांत जान फुंकणारी असेल. जिथे प्रादेशिक पक्ष बलदंड आहेत, तिथे विरोधकांची मोट बांधणे भाजपला रोखणारे ठरेल काय, या सूत्राची बांधणी करण्यासाठी हे निकाल आधार ठरतील.कधीकाळी काँग्रेसला हरविण्यासाठी सारे मतभेद बाजूला टाकून बिगर काँग्रेसवादाचा आधार घेतला जात असे. आज काँग्रेसची ती जागा देशात मोदींच्या भाजपने घेतली आहे. यात सप-बसपसारख्या पक्षांपुढे अस्तित्वाचा मुद्दा आहे, अशावेळी मागचे विसरून एकत्र येण्याचे राजकीय शहाणपण बुआ- भतीजा पुढेही दाखवतील का, हा कळीचा मुद्दा असेल. भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची स्वप्नेही अनेकांना पडू लागली आहेतच. अर्थात, असे  ‘तिसरे’ प्रयोग पहिल्यादा चर्चेत येत नाहीत. यात प्रादेशिक नेत्याच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांचा अडसर कायम आहे. सोनियांच्या पुढाकाराने २० पक्षांच्या नेत्यांची नुकतीच झालेली बैठकही भाजपविरोधातली चाचपणी करण्यासाठीच होती. भाजपसमोर देशव्यापी आव्हान ठेवणे आजघडीला सोपे नाही, प्रत्येक निवडणूक आपली निराळी वैशिष्ट्ये घेऊनही येते. साहजिकच पोटनिवडणुकीच्या निकालांवरून अंतिम निष्कर्ष काढणे घाईचेच; मात्र भाजपच्या अवाढव्य यंत्रणेला चकविणारी समीकरणेही मांडता येतात, एवढा दिलासा विरोधकांना उभारी देणारा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial uttar pradesh election politics