तंत्राबरोबर बदलावा शिक्षणाचा मंत्रही

प्रसाद मणेरीकर
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

बदलतं तंत्रज्ञान कुणीही न शिकवता मुलं सहजपणे आत्मसात करताहेत. मुलांच्या या क्षमतेचा उपयोग आपल्याला शिक्षणात करून घ्यायचा आहे.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या पिंपरीतील अधिवेशनात (ता. 27) यावर विस्तृत ऊहापोह होणार आहे. त्यानिमित्ताने.

'Everybody is a genius. But if you judge a fish by its ability to climb a tree, it will live its whole life believing that it is stupid.'

हे विधान वाचल्यावर यातला विरोधाभास आणि फोलपणा लक्षात आल्यामुळे आपल्याला हसूही येतं आणि आपण अंतर्मुखही होतो. आपल्या आजच्या शिक्षणाचं हे वास्तव आहे हे आपण मनाशी कुठेतरी मान्य करतो. मात्र आपल्या बाबतीतला विरोधाभास असा की, हे सगळं समजत असूनही बदलाची मात्र आपली फारशी तयारी नाही. शिकण्याला पूरक अशी शिक्षणाची रचना हा कळीचा मुद्दा आहे. झपाट्याने येत असलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा विचार व वापर जाणीवपूर्वक करायला हवा. कारण मुलं या तंत्रज्ञानाच्या बरोबरीने वाढताहेत. शिक्षणात तंत्रज्ञान याचा अर्थ केवळ छापील पुस्तके ई-बुक स्वरूपात आणणं इतकाच मर्यादित नाही. उलट भोवतालचं शेतीपासून ते अत्याधुनिक रोबोंपर्यंतचं विविध प्रकारचं, विविध क्षेत्रातील तंत्रज्ञान काम कसं करतं, हे मुलांना उलगडून पाहता येईल, अशी व्यवस्था तयार करावी लागेल. आपले विषय त्याच्याशी जोडावे लागतील. कॉम्प्युटर वापरायला मुलं सहज शिकतील; पण तो काम कसं करतो, हे उलगडून दाखवणं त्यांना भविष्याकडे घेऊन जाईल. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार ज्या वेगाने वाढतोय ते पाहता मशीन चालवण्यासाठी माणूस ही कल्पनाच मोडीत निघेल.

Web Title: education news technology sakal editorial