- धनवंती हर्डीकर
आधुनिक काळात शालेय, महाविद्यालयीन अभ्यासविषयांची विभागणी विज्ञान, वाणिज्य, कला अशा वेगवेगळ्या कप्प्यांत झाल्यापासून काही साचेबंद प्रतिमाही तयार झाल्या. उदाहरणार्थ, विज्ञान विषयांत कलात्मकता, सर्जनशीलता, संवेदनशीलता यांना फारसा थारा नाही. कलाविषयांत तार्किक चिकित्सा, सांख्यिकी आणि गणिती विचार यांची गरज नाही.
वाणिज्य म्हणजे पैशाचे व्यवहार आणि त्यांच्याशी संबंधित आकडेमोड. या कप्पेबंद विचारांचे प्रतिबिंब त्या त्या शाखांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांत दिसते आणि अनेक पालकही तसाच विचार करताना दिसतात. त्यात भर म्हणजे, विज्ञान आणि वाणिज्य या तुलनेने अधिक आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या शाखा आहेत, असा एक समज असल्याने भाषा, कला, सामाजिक शास्त्रे हे विषय, त्यांच्याशी संबंधित घटक आणि क्षमता यांच्याकडे तर उपेक्षेनेच पाहिले जाते.
विविध शाखांमधील अकरावी प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ म्हणजे शाखा आणि विषयांच्या उतरत्या भाजणीचे चित्र असते. नववी ते बारावी या वयोगटातील मुलांना स्वतःची आवडनिवड थोडी स्पष्ट होऊ लागलेली असते आणि आकांक्षांनाही धुमारे फुटू लागलेले असतात. पण त्यांना नीट आकार येण्यापूर्वीच, या साचेबंद विचारांमुळे वेगवेगळ्या शाखांच्या कप्प्यांकडे मुलांची वाटचाल सुरू होते.
प्रतीक सायन्सचा विद्यार्थी आहे. तो खूप कथा-कादंबऱ्या वाचतो, सिनेमे, वेबसीरिज पाहतो. मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये ते त्यावर चर्चा करतात. नाटके बसवतात. तो अभ्यासाचा वेळ वाया घालवतो आहे, असे त्याच्या आईवडिलांना वाटते.
पण प्रतीकला वाटते, की त्याच्या अभ्यासविषयांपेक्षा या चर्चा, नाटके, त्या कादंबऱ्या, सिनेमे, सीरिज त्याच्या आयुष्याशी थेट जोडलेल्या आहेत. आजच्या जगातील प्रश्न, त्यांची काही उत्तरे खरे तर त्याला त्यांतून मिळत आहेत. हा त्याच्या अभ्यासाचाच भाग असता तर किती बरे झाले असते! स्वानंद स्वतःच्या आवडीने डिजिटल आर्ट शिकायला लागला, तेव्हा गणितातील कितीतरी अल्गोरिदम (गणनविधी) तो वापरायला लागला.
त्याआधी कला शाखेचा विद्यार्थी म्हणून त्याने गणिताकडे लक्ष दिले नव्हते. स्पृहाला संगीत आवडते आणि विज्ञानही. पण तिला अकरावीच्या अभ्यासात त्यांपैकी एकच काहीतरी निवडता येईल. भूषणला इतिहास आणि विज्ञान हे दोन्ही विषय खूप आवडतात. पुढे भारतातील विज्ञानाच्या इतिहासावर एखादा चॅनेल सुरू करावा अशी त्याची खूप इच्छा आहे.
पण अकरावीत त्याला या दोन विषयांतील एकाचीच निवड करावी लागेल. अशी खूप उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. या मुलांना उपलब्ध असलेल्या पर्यायांना ज्या मर्यादा पडतात त्यामागे कोणतेही शैक्षणिक कारण नाही.
त्या आजवरच्या जुन्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत. राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमात आज असलेली लवचिकतासुद्धा वापरली जात नाही, याचे कारण एकेका विद्यार्थ्याला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स अशा वेगवेगळ्या विद्याशाखांतील विषय घेऊ देणे शाळाकॉलेजांना सोयीचे नसते.
पण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यात बदल घडवणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाची आणि पुढील आयुष्याची दिशा मर्जीनुसार निवडता आली पाहिजे. त्यासाठी विद्याशाखांचे पारंपरिक कप्पे मोडून, भरपूर आणि वैविध्यपूर्ण पर्याय देऊन विषययोजनेत लवचिकता आणणे अपेक्षित आहे.
विषयांचे कप्पे न करण्याला शैक्षणिक आधार आहे का? प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी काही वेगळ्या क्षमता लागतात, हे जरी मान्य केले, तरी सर्वच विषय शिकताना स्वयंशिस्त, वेळेचे व्यवस्थापन, प्रामाणिक प्रयत्न अशा क्षमता आत्मसात करणे हा समान धागा असतो.
त्याखेरीज आजवर वेगळ्या काढलेल्या विषयांतही अनेक क्षमतांचा समान पाया असतो. उदाहरणार्थ, एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे घटक आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव तपासून, समजून घेणे अशी विश्लेषणाची क्षमता जशी वैज्ञानिक घटनांच्या अभ्यासासाठी आवश्यक असते, तशी इतिहास-भूगोलातही गरजेची असते; उद्योगव्यवसायाचे स्वरूप ठरवतानाही ती लागते आणि कवितेचे रसग्रहण करतानाही गरजेची असते.
सर्जनशील विचार नव्या साहित्यरचनेसाठी लागतो, तसाच वैज्ञानिक समस्यांची नवी उकल करतानाही लागतो. कलात्मक वस्तूचे सौंदर्य कशात लपले आहे, हे समजून घेताना गणितीप्रमाणे आकृतिबंध कळावे लागतात, तर गणिती विश्लेषण करताना त्यांतील आकृतिबंध, संकल्पनांतील सहसंबध दिसणे हा सौंदर्याचाच आविष्कार असतो. आशयापेक्षा क्षमताविकासावर भर हे तत्त्व स्वीकारले, तर विद्याशाखांच्या कृत्रिम भिंती मोडणे शैक्षणिकदृष्ट्या अवघड नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.