सारांश : विवेकी व्यक्तींचे प्रयत्न समाज जोडतील

संजय शिंदे
शनिवार, 1 जून 2019

समाजातील एकजूट टिकविण्यासाठी विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. साळुंखे यांचा उद्या (ता. 2) पुण्यात सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.

समाजातील एकजूट टिकविण्यासाठी विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. साळुंखे यांचा उद्या (ता. 2) पुण्यात सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्‍न : तुम्ही आजपर्यंत 54 पुस्तके लिहिली आहेत. या व्यासंगाकडे कसे वळलात? संशोधनाच्या क्षेत्रातील नव्या पिढीने तुमच्या कार्यातून काय घ्यावे? 

डॉ. साळुंखे : कसे कुणास ठाऊक, पण लहानपणापासून माझ्यामध्ये उत्कट जिज्ञासा आहे. त्यात भर पडली माझ्या भावाने आईसाठी वाचलेल्या पोथ्या ऐकून. या संस्कारांतूनच मी खरेतर एकप्रकारे अधाशी वाचक बनलो आणि न कंटाळता बाह्य सृष्टी जाणून घेण्यासाठी प्रवास करत राहिलो, लोकांशी बोलत राहिलो. प्राथमिक शाळेपासून ते पीएच.डी.पर्यंत जातीपातीच्या पलीकडे जाऊन माझ्यावर प्रेम करणारे शिक्षक, प्राध्यापक मिळाले. विशेषतः मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांचा माझा पाया त्यांनी उत्तम रीतीने घडवला. त्याचा मला उपयोग झाला.

राष्ट्रभाषा पंडित परीक्षेच्या निमित्ताने हिंदी साहित्य वाचले. बंगाली साहित्याची भाषांतरे वाचली. व्यासंगाला खरी सुरवात चार्वाकाच्या अभ्यासापासून झाली. पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी विश्‍वकोशात लेखन करण्याच्या निमित्ताने चर्चा करता आली. दर्जेदार इंग्रजी ग्रंथांचे अनुवाद करता आले. 'विद्रोही तुकाराम' लिहिताना गाथेतील अभंगांचे पुन्हा पुन्हा वाचन केले. बुद्धांवर लेखन करण्यासाठी पाली भाषा शिकलो. चाकोरीत न अडकता अनेक विषय हाताळले. नव्या पिढीतील ज्यांना संशोधनाच्या क्षेत्रात उतरायचे असेल त्यांनी जिज्ञासा, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, चिकित्सक दृष्टिकोन आणि अनुकरणात न अडकता स्वतंत्र बुद्धीने माहितीचा अन्वयार्थ लावणे अशा गोष्टी करायला हव्यात. माझाच नव्हे, तर कुणाचाच शब्द म्हणजे अंतिम सत्य असे न मानता स्वतःची वाट निर्माण करावी. 

प्रश्न : तुम्ही एवढा व्यासंग केला, त्यामागे काही सामाजिक भूमिका होती? 

डॉ. साळुंखे : या व्यासंगामागे निःसंशय भूमिका होती. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची पुनर्मांडणी हे माझे उद्दिष्ट होते. म्हणूनच अज्ञानाला, शोषणाला बळी पडलेल्या आणि कर्तबगार असूनही उपेक्षित राहिलेल्या व्यक्तींना वा विचारधारांना सत्य स्वरूपात लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. पहिला प्रयत्न चार्वाकाच्या बाबतीत केला. समाजहिताचे तत्त्वज्ञान मांडत असूनही त्याला बदनाम करण्यात आले होते. त्याची खरी प्रतिमा पुढे आणून माझ्या व्यासंगाला सुरवात केली. तो माझ्या भूमिकेचा पाया राहिला.

तुकारामांची प्रतिमा असो, बळिराजाची असो की बुद्धांची असो, ती मूळ सत्य स्वरूपात समाजापुढे ठेवली. एकलव्याची बाजू मूळ महाभारताच्या आधारे मांडली. झाशीच्या राणीचे प्राण वाचविण्यासाठी राणीचा वेश धारण करून इंग्रजांबरोबर लढलेल्या झलकारीबाईंचे चरित्र पुढे आणले. लाक्षागृहात आपल्या पाच मुलांसह जळून मरण पावलेल्या आदिवासी स्त्रीची आणि हिडिंबेची कैफियत मांडली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. परंतु या सर्वांमागे व्यक्तिस्वातंत्र्य, समता आणि सर्वांना फुलण्याची संधी मिळणे ही तत्त्वे आहेत. लेखनातून त्यांचा पुरस्कार केला. या भूमिकेसाठी वारंवार प्रचलित प्रवाहाविरुद्ध जावे लागले आणि अनेकांचा रोष पत्करावा लागला.

पुरोगामी चळवळीत असूनही ज्या बाबींवर चळवळीशी मतभेद झाले, तेही मी पुराव्यानिशी निर्भीडपणाने मांडले. राम आणि कृष्ण यांच्याबाबतीतील माझी भूमिका हे त्याचे उदाहरण आहे. कुणाच्याच मागे फरफटत जायचे नाही, आपल्या विवेकाला पटलेल्या गोष्टीवर ठाम राहायचे, ही माझी भूमिका होती.

प्रश्न : सध्या समाजातील वेगवेगळ्या घटकांत दरी निर्माण झाली आहे, असे वाटते काय? 

डॉ. साळुंखे : सध्या वेगवेगळ्या कारणांनी समाजाच्या विविध स्तरांमध्ये दुरावा वाढत आहे. खरे तर आपला समाज धर्म, जाती वगैरे अनेक अंगांनी संमिश्र आहे. ही आपल्या समाजाची उणीव नाही, तर तेच आपल्या समाजाचे खरे सौंदर्य आणि वैभव आहे. म्हणूनच लेखन असो वा समाजातील विविध स्तरांतून वावरणे असो; मी सदैव सर्वसमावेशक भूमिका घेतली. आपण जोडण्याचे काम केले पाहिजे, तोडण्याचे नव्हे. तरच राष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध, समर्थ, संतुलित होईल.

सध्या घडणाऱ्या काही गोष्टी क्‍लेशदायक असून, त्या आपल्या राष्ट्राची प्रतिमा डागाळणाऱ्या आहेत. अशा वेळी निराशेचे क्षण येतात. पण अशा घटनांच्या विरोधात आवाज उठवणारे, माणुसकीच्या बाजूने उभे राहणारे आणि समाजातील सर्व घटकांकडे मायेने आणि करुणेने पाहणारे आणि त्यासाठी सर्वस्वाचे समर्पण करायला तयार असणारे घटकही जरूर आहेत. त्यांच्या प्रयत्नांकडे पाहिले, तर निराशा दूर होते आणि देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याची खात्री पटते. पण हे आपोआप घडणार नाही. विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून हे घडवून आणण्यासाठी एकजुटीने आणि सातत्याने प्रयत्न करायला हवेत. 

समाजाप्रती अत्यंत कृतज्ञ 

प्रश्‍न : काही गोष्टी करायच्या राहून गेल्या, अशी खंत वाटते काय? 

डॉ. साळुंखे : मी जाणूनबुजून कला विद्याशाखेकडे आलो; परंतु त्यामुळे माझा अत्यंत आवडीचा गणित विषय सोडावा लागला. वैचारिक लेखनाकडे वळल्यामुळे प्रिय असलेल्या ललित साहित्याचे वाचन-लेखन करण्यासाठी मी पूर्वीसारखा वेळ देऊ शकलो नाही आणि मला अजून ज्या अनेक भाषा शिकायच्या होत्या, त्या शिकायलाही फुरसत मिळाली नाही. अर्थात, हे दुःख मी जाणीवपूर्वकच स्वीकारलेले आहे. असे असले, तरीही मी तृप्त, कृतार्थ आणि समाजाप्रती कृतज्ञ आहे. कारण, समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी मला अपार प्रेम दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The efforts of the discerning people will be added Article