संशोधनात उद्योगांची भूमिका कळीची

सम्राट कदम 
Tuesday, 13 October 2020

मराठवाड्यातील उदगीरसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) वरिष्ठ वैज्ञानिक पदापर्यंत पोहोचलाय. त्यांच्याशी केलेली बातचीत.

मराठी माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले डॉ. अमोल कुलकर्णी यांना देशातील सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान म्हणजेच ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार घोषित झाला. मराठवाड्यातील उदगीरसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) वरिष्ठ वैज्ञानिक पदापर्यंत पोहोचलाय. त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्‍न - तुमच्या संशोधनाचे स्वरूप नेमके काय आहे? पुरस्कार मिळवल्यानंतरच्या तुमच्या भावना काय आहेत? 
डॉ. कुलकर्णी - मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील संशोधन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २००४ मध्ये मी जर्मनीला गेलो. तिथे तळहातावर बसतील एवढे लहान `मायक्रोरिॲक्‍टर’ पाहिले. उणे तापमानातील मोठ्या रासायनिक अभिक्रिया ते अत्यंत कमी ऊर्जेत, तेही सामान्य तापमानाला करते. नवीन असलेल्या या क्षेत्रातील संशोधनाला आम्ही ‘एनसीएल’मध्ये २००५ नंतर सुरुवात केली. ‘एनसीएल’चे तेव्हाचे संचालक डॉ. शिवराम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विवेक रानडे, डॉ. बी. डी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने ‘कंट्युनिअस फ्लो मायक्रोरिॲक्‍टर’वर संशोधन गट स्थापन केला. जगातला सर्वांत मोठा रासायनिक उद्योगसमूह भारतात आहे. त्याची गरज ओळखून कमी खर्चात आणि ऊर्जेत अभिक्रिया करणारे मायक्रोरिॲक्‍टर देशातच विकसित करण्याचे ठरवले. रसायन उद्योग, उत्पादक आणि ‘एनसीएल’ने एकत्रितरित्या यावर काम केले. आज सुमारे ७० कंपन्या असे रिॲक्‍टर वापरत आहेत. परंतु ही नुसती सुरवात आहे. यामुळे २०० कोटींहून अधिक परकी चलन वाचले. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाल्याने मला सुखद धक्काच बसला. जबाबदारीदेखील वाढली. या क्षेत्रात अजूनही विविधांगी संशोधन करायचे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी यांच्या मिलाफाचे हे क्षेत्र संशोधनासाठी कसे निवडले? 
- उदगीरच्या लालबहादूर शास्त्री मराठी शाळेत माझे शिक्षण झाले. आई विज्ञानाची शिक्षक. विज्ञानाचे महत्त्व आणि उपयोगिता मला माहीत होती. बारावीनंतर मुंबईच्या रसायन अभियांत्रिकी महाविद्यालयात (आयसीटी) शिक्षणासाठी गेलो. त्यावेळी प्रा. एम. एम. शर्मा म्हणायचे, की परिश्रमाला पर्याय नाही आणि शिक्षण चालू असताना निश्‍चित ध्येय तुमच्यासमोर असायला हवे. दुसऱ्या वर्षाला असताना मी उन्हाळ्यातील प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केले. ते मंजूर झाले असते तर फेलोशिप मिळाली असती. पण काही कारणाने ती मिळाली नाही. तरीही संबंधित प्राध्यापकांना भेटलो आणि संशोधन करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांनीही प्रयोगशाळेच्या वापराला परवानगी दिली. प्रा. ज्येष्ठराज जोशी आणि प्रा. अनिरुद्ध पंडित यांची ती प्रयोगशाळा होती. मी त्यासंबंधीच्या साहित्याचे प्रचंड वाचन केले. भरपूर प्रयोगही केले. त्यातले निष्कर्ष प्रा. पांगारकर यांना दाखवले. त्यांनी मला स्वतंत्र शोधनिबंध प्रसिद्ध करायला लावला आणि तो स्वीकारलाही. त्याचवेळी संशोधनाला वेळ द्यायचा हे पक्के ठरवले. इतर मुले पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यासाठी प्रयत्नात होती, पण पुढील अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा मी कधी विचार केला नव्हता. प्रा. जोशींच्याच प्रयोगशाळेत पीएचडी केली. त्यानंतर २००५ मध्ये ‘एनसीएल’मध्ये रुजू झालो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील मायक्रोरिॲक्‍टर संबंधीच्या संशोधनाची स्थिती काय आणि उद्योगांचा सहभाग कसा आहे? 
- तसे पाहता `कंट्युनिअस फ्लो रिॲक्‍टर’ हा जुना विषय आहे. अनेक मोठ्या रासायनिक उद्योगांमध्ये याचा वापर होतो. मात्र मायक्रोरिॲक्‍टरमुळे अति उच्च दर्जाचे उत्पादन आणि क्‍लिष्ट रासायनिक अभिक्रियाही छोट्या जागेत प्रभावीपणे करता येतात. आजपर्यंत आम्ही २० वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया आणि शंभरवर उत्पादने विकसित केली आहेत. अशा संशोधनासाठी विविध विभागातील शास्त्रज्ञांचा शेवटपर्यंत सहभाग आणि समन्वयाने संशोधन गरजेचे आहे. २०१२-१३नंतर देशभरात संशोधकांचे समूह तयार होत आहेत. अजूनही चीन आणि युरोपच्या तुलनेत आपण मागे आहोत. यामध्ये नवे काहीतरी करायची दृष्टी पाहिजे. 

संशोधनामध्ये सुरवातीपासून उद्योगांचा सहभाग असावा का? तुमच्या संशोधनासंबंधीचा अनुभव कसा आहे? 
- निश्‍चितच! उपयोजित विज्ञानातील संशोधनासाठी उद्योगांचा सहभाग गरजेचा आहे. आम्ही संशोधनाला सुरवात केली, तेंव्हा कंपन्यांनी सावध भूमिका घेतली. मोठी गुंतवणूक करायला धजावल्या नाहीत. आम्हाला त्यांच्यासमोर एखादे चांगले उदाहरण प्रस्तुत करणे गरजेचे होते. संशोधनासाठी क्राउंड फंडिंगची पद्धत वापरली. अनेक कंपन्यांकडून निधी जमवला. मिळालेली स्टार्टअप ग्रॅंडही त्यासाठी वापरली. ‘एनसीएल’च्या तेव्हाच्या संचालकांनीही निधी दिला. तेव्हा कुठे काम सुरू झाले. आर्थिकच नाही तर कुशल मनुष्यबळासाठीही उद्योगांची संशोधनातील भूमिका महत्त्वपूर्ण आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औषधांच्या आत्मनिर्भरतेमध्ये `कंटिन्युअस फ्लो मायक्रोरिॲक्‍टर’ची भूमिका काय असेल? 
- आपण जरी औषध उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असलो तरीही त्यासाठीचा कच्चा माल आणि रसायने आयात करतो. आवश्‍यकतेनुसार रसायने आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने ५३ महत्त्वपूर्ण रसायनांची नावे निश्‍चित केली आहेत. त्यांच्या उत्पादनासाठी देशातच स्वतंत्र प्रक्रिया विकसित करायची आहे. अनेक रसायनांच्या निर्मितीचे काम पूर्णत्वाकडे जात आहे, तर काही अजूनही सुरवातीच्याच टप्प्यात आहेत. आपल्याला केवळ आपल्यासाठी नाही तर जगात निर्यात करता येईल, अशा दर्जाच्या स्वस्त रसायनांच्या निर्मितीची गरज आहे. त्यासाठी कंट्युनिअस फ्लो रिॲक्‍टर महत्त्वाचा आहे. त्यामुळे रसायनांचा अपव्यय टळेलच, त्याचबरोबर उत्पादनखर्चही घटेल. कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञांसाठी शैक्षणिक संस्थांचीही यातील भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दृष्टिक्षेपात ठळक मुद्दे
  मायक्रोरिॲक्‍टरमुळे अति उच्च दर्जाचे उत्पादन आणि क्‍लिष्ट रासायनिक अभिक्रियाही छोट्या जागेत शक्य.
  चीन आणि युरोपच्या तुलनेत आपण अद्याप मागे.
  निर्यातक्षम दर्जाच्या व स्वस्त रसायनांच्या निर्मितीची देशाला गरज. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exclusive interview Dr amol kulkarni

Tags
टॉपिकस
Topic Tags: