आपण रोज नवे असतो...

शेतात राबताना जगण्याची भ्रांत मिटवण्याच्या रोजच्या छोट्यामोठ्या लढाईत कधी जय, तर कधी पराजय वाट्याला येत राहतो. जय असा, की बांधापलिकडून ‘पराजय’ त्याला हिणवत उभा राहतो. पराजय असा, की त्याच बांधापलिकडून ‘जय’ आशेची स्वप्न दाखवत उभारी देत राहतो.
 आपण रोज नवे असतो...
आपण रोज नवे असतो...sakal
Updated on

शेतात राबताना जगण्याची भ्रांत मिटवण्याच्या रोजच्या छोट्यामोठ्या लढाईत कधी जय, तर कधी पराजय वाट्याला येत राहतो. जय असा, की बांधापलिकडून ‘पराजय’ त्याला हिणवत उभा राहतो. पराजय असा, की त्याच बांधापलिकडून ‘जय’ आशेची स्वप्न दाखवत उभारी देत राहतो. शेतकरी कायमच या दोलायमान मध्यावर तोल सांभाळत उभा. खचून जात नाही अगदीच. पावसाळ्यात पावसानं यावं, आणि सर्वांना सुखी ठेवावं एवढीच मागणी पांडुरंगाकडे करत राहतो. पांडुरंगाला कोणताही नवससायास तो करत नाही. कर्मकांडं करत नाही.

फक्त आषाढात आकाशाचं आभाळ होऊन जातं आणि काळेसावळे पावसाळी ढग वाऱ्यासोबत वारीला निघतात तेव्हा तोही त्या गर्दीत पांडुरंगाच्या भेटीला निघतो. तेही काही मागायला नाही. गर्दीत दिसलाच पांडुरंगाचा नि रखुमायचा चेहरा, तर वर्षभर गावात, नातलगांना, मित्रांना सांगत रहायला एक गोष्ट मिळते. जी स्वत:सह सगळ्यांनाच जगण्याची उभारी देत राहते. कधी गर्दीत नाहीच दिसला चेहरा, तर रखुमायचा चेहरा तरी काय वेगळा आहे? मागील वेळी पाहिलेला पांडुरंगाचा चेहरा यावेळी पाहिलेल्या रखुमायच्या चेहऱ्यात मिसळून जातो. अभंग फार पाठ नाहीत त्याला; पण वारीत सहभागी झाल्यावर शेकडो वारकऱ्यांनी केलेला गजर हाच आपला आवाज वाटायला लागतो. कितीतरी लोक.

कुठून कुठून आलेले. आभाळ आणि जमिनीला सांधत चाललेली जणू पांढरीशुभ्र रेषाच. एकदा का त्या काळ्याशार गाभाऱ्यातलं सावळगोंदण पाहिलं, की मनातला सारा काळोख दूर होऊन जातो. जीवनात कधी उन्हाळा ठाण मांडून जाळत राहतो; पण कधी पाऊस येऊन उन्हाळ्याला दंतकथा बनवतो. कधी अवकाळी येतो नि झोपेसकट स्वप्नही घेऊन जातो; पण पहाटे मार्केटमध्ये शेतमाल घेऊन गेल्यावर सापडलेला चांगला भाव अवकाळीत उद्ध्वस्त झालेले तंबू पुन्हा करकचून बांधायला हुरूपही देतो. दिवसाचा सूर्य माथ्यावर येऊन शरीरातलं उरलेलं पाणी जाळत राहतो; पण मग रात्री अंगणात झोपल्यावर रात्रीचं टिपूर चांदणं मलमपट्टी करत रात्रभर जागं राहतं. पृथ्वी जुनीच असली, तरी जग रोज नवं असतं. शेत जुनं असलं तरी आपण रोज नवे असतो.

हे त्याला कळतं. तसे आपण कोणी स्पेशल नाहीत, हेही त्याला माहीत असतं. आपला रंग वगळता पांडुरंगाशी आपलं काहीच साधर्म्य नाही, हेही नीट त्याला कळतं. आपण सैनिक नसलो तरी लढत राहणं, हे आपलं संचित आहे, हे त्याला ठाऊक असतं. ती लढाई स्वत:ला जिंकण्यासाठीची असली, तरी ती कोणाला पराभूत करण्यासाठी मात्र नाही, हे तो जाणून आहे. कारण तो शेतकरी आहे. कारण तो वारकरी आहे. प्रतिकूलतेतही संत तत्त्वज्ञान जगले. त्यांच्या जगण्यातून तत्त्वज्ञान निर्माण झालं. आपलं जगणं त्यांच्या तत्त्वज्ञानातून समृद्ध झालं. या पृथ्वीवर एकूण पावभर जमीन आहे. त्यातलीच पाचदहा एकर आपल्या वाट्याला असल्याने या पृथ्वीच्या एका भागाचा आपण मालक असल्याचा त्याला अभिमान आहे. जगणं ही अपरिहार्यता नाही. त्यासाठीच्या तडजोडी अपरिहार्य असू शकतात. तिला त्यानं सिस्टिम असं नाव दिलंय. अंधार थांबून राहात नाही.

उजेडही केव्हातरी येतोच, हे त्याला माहिताय. मुलं शिकावीत, त्यांनी सुधारित शेती करावी. नाही जमलं तर त्यांनी इतरांसारखं गावातून शहराकडे नोकरीधंद्यानिमित्त निघून जावं. त्यांना शहरं सामावून घेतील. कुणी शिपाई, कुणी सिक्युरिटी, कुणी कामगार, कुणी दुकानात. कुणी ड्रायव्हर, कुणी रिक्षावाला. कुणाची हातगाडी, कुणाची टमटम... अजून कितीतरी जागा असतील त्यांच्यासाठी. जगण्यासाठी कसतील. कसण्यासाठी जगत राहतील. आपण स्वीकारलं पाहिजे. सिस्टिम काय काय करेल आपल्यासाठी? तिच्या वाटा नि हेतू वेगळे आहेत. कदाचित नव्या जगाला ती साजेशी असेल. हा संक्रमणाचा काळ आहे. शेतकरी म्हणून आपण आशावादी असावं. कारण पुढं हळूहळू आपल्या गावासकट अनेक गावं बदलतील. त्यांची शहरं होतील किंवा ती ओस पडतील. आपल्यालाही ही जमीन पारखी होईल. गावातल्या निम्म्या जमिनी एन.ए. झाल्या. आपलीही होईल कधीतरी. याचा अर्थ तिच्यातून काहीच उगवणार नाही, असं नाही. सूर्य तर नक्कीच उगवत राहील. एक ओंजळ उजेड पुरेसा आहे. उद्यासाठी…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.