बदलती गावे : उपासाच्या रताळ्यांना विकासाची गोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलती गावे : उपासाच्या रताळ्यांना विकासाची गोडी

बदलती गावे : उपासाच्या रताळ्यांना विकासाची गोडी

sakal_logo
By
डी. आर. पाटील

उपवासादिवशीच प्रामुख्याने खाल्ली जाणारी रताळी एखाद्या गावाच्या अर्थकारणाचा कणा असू शकतात, हे ऐकल्यानंतर आश्‍चर्य वाटल्यावाचून राहत नाही. पण कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील शाहूवाडी तालुक्यातील पेरीड हे गाव याचे अगदी उत्तम उदाहरण आहे. १९९७-९८ मध्ये या गावात रताळ्याचा वेल पहिल्यांदा रुजला आणि पाहता पाहता त्याच्या उत्पादनाचा वटवृक्ष बनला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत येथे दोन ते अडीच कोटींची उलाढाल होताना दिसते.

पेरीडची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी येथे रताळ्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. पेरीडची रताळी दिसायला लालभडक, पारंपरिक देशी वाण आणि चवीला दर्जेदार यामुळे मागणीही जास्त. प्रारंभी ती मलकापूर आणि परिसरातील बाजारात विकली जात. या रताळ्यांना मुंबई बाजारपेठेचा रस्ता दाखविला गावातील एक चालक बबन धोत्रे यांनी. ते वाशी बाजाराला जाणाऱ्या गाडीवर चालक होते. त्यांनी गावातील एक टेम्पो भरून रताळी मुंबई बाजारात नेली आणि तेव्हा प्रतिकिलो सव्वाचार रुपये असा उत्तम दर मिळाला आणि पेरीडकरांना बाजाराची नस सापडली. आज गावातून वाशी, पुणे, कऱ्हाड, औरंगाबाद, नाशिक, रत्नागिरी येथील बाजारांत रताळी विक्रीस जातात.

नवरात्रोत्सव, गणेशोत्सवात रताळ्यांना मागणी वाढते. या कालावधीत प्रत्येक दिवशी १० ते १२ टन रताळी बाजारात जातात. पारंपरिक ऊस पीक घेण्याचा ट्रेंड बदलून रताळे घेण्यास सुरुवात झाली. यंदाच्या हंगामात ११ ते १२ टन रताळी भरलेले दीडशेवर ट्रक गावातून बाजारपेठेत गेले. यंदा दरही बऱ्यापैकी मिळाला आहे. साधारणपणे अडीच कोटींची रताळे विकली गेली आहेत. पेरीडचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत करुंगळे, आळतूर, निळे, चनवाड, ओकोली, अमेणी, गाडेवाडी, पुसार्ले येथेही रताळे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षातच शाहूवाडी तालुक्यात १२४८ हेक्टर क्षेत्रावर रताळी लावली होती. रताळी पिकाने पेरीडच्या अर्थकारणाला चांगलीच गती आली आहे. गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपली माळरानाची पडीक जमीन लागवडीखाली आणून डोंगर कपारीत रताळ्याची लावण केल्याचे चित्र गावात दिसते. हे पीक पावसाच्या पाण्यावर येत असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठीसुद्धा फारशी ओढाताण करावी लागत नाही. तालुक्यात रताळ्यांचे विक्रमी उत्पादन होत असल्यामुळे गावात किंवा शाहूवाडी तालुक्यामध्ये साठवण क्षमतेची व्यवस्था झाल्यास गावकरी वर्षातून दोन पिके घेण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास गावच्या आर्थिक चक्रास आणखी गती येईल. त्याचबरोबर लघु उद्योगाच्या माध्यमातून रताळ्यांची उपउत्पादनेही तयार करण्यास चालना मिळू शकते.

रताळ्याच्या गोडीमुळे राज्यभर माहिती झालेल्या पेरीड गावात ज्यांना शेती नाही त्यांना, ज्यांच्याकडे शेती आहे ते शेतकरी शेती कसायला देतात व त्यातून रताळ्याचे पीक घेतले जाते हे विशेष. त्यामुळे अपवाद वगळता गावातील प्रत्येक शेतकरी रताळ्याचे पीक घेताना दिसतो. ऊस, दुधाबरोबरच रताळीही या गावच्या अर्थकारणाचा कणा बनली आहेत. रताळ्यांसाठी कष्टाळू मनुष्यबळाची गरज भासते. ती गरजही हातांना काम देऊन भागविली जाते. खुरप्याला पकडणाऱ्या मनगटांना या निमित्ताने रोजगाराचे बळ मिळते. पेरीडच्या विकासात दर्जेदार चवीच्या रताळ्यांनी ठसा उमटविला आहे.

loading image
go to top