चित्रपट स्त्रीवादी नजरेतून 

चित्रपट स्त्रीवादी नजरेतून 

एकदा एका बौद्ध भिक्षूने त्याच्या शिष्यांचे लक्ष 5-6 हत्तींच्या कळपाकडे वळवले. त्या हत्तींचे पाय बाजूच्या झाडाला एका सुतळीने बांधलेले होते. इतका महाकाय प्राणी असा बांधलेला कसा राहू शकतो, याचे आश्‍चर्य शिष्यांच्या चेहऱ्यावर उमटले. ''जन्मापासून त्याच सुतळीच्या बंधनात राहण्याची त्यांची सवय असल्यामुळे ती सुतळी तोडून टाकायचा साधा विचारसुद्धा त्या हत्तींनी कधी केला नव्हता. केला असता, तर ते सहज मुक्त होऊ शकले असते.'' बौद्ध भिक्षूच्या त्या वचनाप्रमाणे 'सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे' हा बोध शिष्यांना लगेच झाला. 

नव्या पिढीची अवस्था जोखडमुक्त असण्यातले स्वातंत्र्य न भोगलेल्या त्या हत्तींसारखी होऊ नये, या प्रेरणेने 'दक्षिणायन'ने अजेय चित्रपट मालिकेचे आयोजन केले आहे. वर्षभर चालू राहणाऱ्या या उपक्रमाची सुरवात 4 मार्च 2017 ला महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांतील सुमारे 60 ठिकाणी एकाच वेळी झाली. 

बुरसटलेल्या रुढींच्या, अंधविश्‍वासांच्या वा खोट्या भीतींच्या कुंपणात अडकून राहण्याऐवजी स्वतंत्र विचारांचा मोकळा श्‍वास घेत जगणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा या सिनेमांच्या रंजक कहाण्यांमधून आपल्याला भेटत राहतील. स्वातंत्र्यासाठी लढा देत न्याय मिळवण्यासाठी वा सत्यापर्यंत पोचण्यासाठी केलेल्या त्यांच्या धडपडीतून आपल्याला ताकद मिळेल. निदान निर्णायक क्षणी कच न खायला त्यातले कोणते तरी पात्र आपल्याला प्रेरित करेल.'' 

वरील माहितीपत्रक लिहिताना आणि चित्रपट निवडताना 'स्त्रीवादी दृष्टिकोन बाजूला ठेवा,' अशी मागणी नसणं गृहीत धरलं होतं. ''काही गोष्टींकडे तरी नुसत्याच कलाकृती म्हणून का बघत नाही? ज्यात त्यात स्त्रीवाद कशाला?'' असा एक उघड वा अप्रकट सूर मला विशेषतः पुरुषांमध्ये जाणवत असतो; पण किमान साहित्य, कला यांचं स्त्रीवादी विश्‍लेषण झालं पाहिजे. या सर्व माध्यमांचा समाजमनावर परिणाम घडतो, तसंच समाजमनाचं प्रतिबिंब या माध्यमांतून आविष्कृत होतं. स्त्रीला आदराची व समानतेची वर्तणूक मिळण्यासाठी, बौद्धिक शिस्त आणि रसास्वादाची संपूर्ण अनुभूती घेण्यासाठी, समाज नजर बदलण्यासाठी कलाकृतींचा स्त्रीवादी विचार झाला पाहिजे. 

1929 साली व्हिर्जिनिया वुल्फने एक टिपण केलं होतं - 'जेन ऑस्टिनपर्यंत लिहिल्या गेलेल्या साहित्यातल्या स्त्रिया फक्त त्यांच्या पुरुषांच्या संदर्भातच का रंगवल्या गेल्या? त्या मुली, आया, बहिणी, मैत्रिणीही आहेतच ना? मग त्यांच्या एकमेकींबरोबरच्या नात्यांचा विचार का होत नाही?' त्याच सुमारास स्पॅनिश कलाकार साल्वेदोर दाली आणि ब्युनेलच्या ''ऍन अंदाल्युसीअन डॉग' या चित्रपटाची सुरवात 'एक पुरुषाचा हात एका बाईचा डोळा कापतो आहे' अशा दृश्‍याने झाली. नंतर त्या सिनेमावर स्त्रीद्वेष्टी कलाकृती म्हणून खूप टीका झाली. 1930 ते 1970 च्यादरम्यान झालेल्या चित्रपटांमधील स्त्रीचे चित्रण बघून अस्वस्थ झालेल्या लॉरा मूलव्हेने 1975 साली खळबळजनक लेख लिहिला. तिच्या मते सिनेमात सातत्याने 'निष्क्रिय, भोगवस्तू अशी बाई आणि तिला टेहाळणारा, तिच्यावर सत्ता गाजवणारा सक्रिय पुरुष' असं चित्रण दिसतं. तसं असण्यामागची दोन कारणं तिने फ्रॉइडियन परिभाषेतून मांडली. एकतर 'बघणं' हा स्वतंत्रपणे सुखाचा स्रोत असतो. शिवाय, दुसऱ्याकडे 'लैंगिकता उद्दीपित करणारी वस्तू म्हणून बघणं' वा 'जे निषिद्ध त्या गोष्टीकडे बघण्याची आंतरिक उर्मी' (scopophilia) स्वर्गसुख देते. त्यामुळे लैंगिक सुख मिळणारं साधन अशा रूपात स्त्रीला दाखवणं अपरिहार्य होतं; पण त्याचबरोबर स्त्रीला पुरुषलिंग नसल्यामुळे पुरुषाची लिंगहीनतेची भीती (castration anxiety) स्त्रीमध्ये गठीत होते. (स्त्रीला बघून पुरुषाची ती भीती बळावते, असं फ्रॉइडियने फार पूर्वीच मांडून ठेवलं होतं.) या भीतीवर मात करण्यासाठी आणि 'हवी तर आहेच; पण भीतीही वाटते' या द्वंद्व पेचातून मार्ग काढण्यासाठी 'स्त्रीवर अंकुश ठेवणारा' अशी पुरुषाची भूमिका रूढ झाली आणि आजही ती तशीच प्रचलित आहे.

लॉराच्या या सिद्धांताने प्रेरित होऊन 1985 मध्ये ऍलिसन बेखडेल हिने एक चाचणी तयार केली, जी 'बेखडेल टेस्ट' म्हणून प्रसिद्ध आहे. कोणताही चित्रपट ही चाचणी पास होतो की नापास हे ठरविण्याचे तीन निकष - 1. चित्रपटात किमान दोन स्त्रीपात्रं आहेत का? 2. ती दोन पात्रं एकमेकींशी बोलतात का? 3. 'पुरुष' हा विषय वा संदर्भ सोडून त्या इतर काही बोलतात का? 

इतक्‍या किमान अपेक्षेने जवळजवळ पाच हजार सिनेमा जोखले गेले. त्यावरूनच 2006 साली असे निष्कर्ष निघाले, की 'चित्रपटात प्रत्येक स्त्रीपात्राच्या तुलनेत किमान दोन पुरुषपात्रं अशी सरासरी असते. लैंगिक दृश्‍यात पुरुषपात्रांपेक्षा दुप्पट संख्येने स्त्रीपात्रं दाखवली जातात. हिंसेची बळी या रूपात स्त्रीपात्राचं आयोजन केलं जातं. स्त्रीपात्र काय आहे? यापेक्षा ते पात्र किती उद्दीपित करतं, हे जास्त महत्त्वाचं असतं.' 

संहितेतल्या पात्र रचनेबरोबरच संकलन, चित्रीकरणाची जागा, कॅमेऱ्याची भिंगं आणि angles ची निवड, वेशभूषा अशा अनेक पातळ्यांवर पुरुषी नजर स्त्रीपात्रांचे दुय्यमत्व अधोरेखित करत असते. हे दाखवून देण्याचं काम स्त्रीवादी विश्‍लेषणातून अपेक्षित असतं. 

भारतीय मुख्यधारेच्या हिंदी वा प्रादेशिक चित्रपटांचं स्त्रीवादी मूल्यमापन करायला बेडखेलसारखे 'किमान' निकष लावूनही बहुतांशी समकालीन चित्रपट नापास ठरतात. आजही स्त्रीची अवहेलना करणारा, अत्यंत असभ्य व निंदनीय स्त्रीपात्रांच्या चित्रणाने भरलेला, दर्जाहीन चित्रपट नाकारला जात नाही, ही शोकांतिका आहे. स्त्रीपात्रं गाळली तरी आशयामध्ये (आशय असल्यास) काहीही फरक पडणार नाही. तरी eye-candy म्हणून ती गोष्टीत कोंबणं हा रिवाज खेदजनक आहे. टीव्ही वाहिन्यांवरच्या कार्यक्रमांना बुद्धी गहाण ठेवून आपण स्त्रीप्रेक्षक कसं सामोरं जातो, हे मला अतर्क्‍य आहे. चित्रपटात स्त्रीप्रतिमा कशा रंगवल्या आहेत, हा कलाकृतीच्या मूल्यमापनाचा भाग असलाच पाहिजे, हा आवेश वा अभिनिवेश नसून ही गरज आहे. 

इथे मुद्दा फक्त लिंगभावविषयक संवेदनशीलतेचा नसून, मानवतेच्या व्यापक जाणीवांना आत्मसात करण्याचा आहे. 

हे लिहून बाजूला ठेवणार इतक्‍यात रामगोपाल वर्मा या एकेकाळी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिग्दर्शकाचे ट्‌विट समोर आलं आहे. ''प्रत्येक महिलेने सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना आनंद द्यायला हवा.'' जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना असा संदेश देणारा रामू प्रातिनिधिकच नव्हे का? ही निंदनीय परिस्थिती बदलण्यासाठी स्वायत्त ऊर्जेने एकत्रित येऊन चांगले सिनेमा बघूया, एवढे किमान आवाहन 'दक्षिणायन'सारख्या उपक्रमांद्वारे करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com