सारांश : असंघटितांचा लढा तडीला नेऊ (बाबा आढाव)

शारदा वाडेकर
शनिवार, 1 जून 2019

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे एक आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव आज (ता. 1 जून) नव्वदीत प्रवेश करीत आहेत. असंघटितांच्या, वंचितांच्या प्रश्‍नावर लढे उभारण्याचे संकल्प या टप्प्यावरही करीत असलेल्या या नेत्याची मुलाखत.

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे एक आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव आज (ता. 1 जून) नव्वदीत प्रवेश करीत आहेत. असंघटितांच्या, वंचितांच्या प्रश्‍नावर लढे उभारण्याचे संकल्प या टप्प्यावरही करीत असलेल्या या नेत्याची मुलाखत.

प्रश्‍न - राष्ट्र सेवादल व महात्मा फुले यांची सत्यशोधकी चळवळ याकडे आपण कसे आकर्षित झालात? 

उत्तर - स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी मी 17 वर्षाचा होतो. माझे मामा राष्ट्रसेवादलात नियमित जात. त्यांच्यासह मीही 1941 पासून सेवादलात जाऊ लागलो. साने गुरुजींनी पंढरपूरला अस्पृश्‍यांच्या मंदिर प्रवेशासाठी उपोषण केले होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढाही जोरात सुरू होता. लहान वयातच स्वातंत्र्य आंदोलन व साने गुरुजींचे राष्ट्रसेवादल या विचारांकडे नकळतपणे ओढला गेलो. 

महात्मा फुले वाड्याजवळ आमचे मित्र कल्याणकर यांनी "महात्मा फुले मंडळा'ची स्थापना केली होती. तिथे महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची ओळख झाली. त्यानंतर महात्मा फुल्यांचे मृत्युपत्र आम्हाला सापडले. ते आम्ही प्रकाशित केले. त्यातून जोतिराव फुले यांचे कार्य व सावित्रीबाईंची मुलींच्या शिक्षणाबद्दलची तळमळ समजून घेता आली. महात्मा फुलेंच्या स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे शिक्षण, दलित समाजास शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, अस्पृश्‍यता निर्मूलन या सर्व कृतिशील कामांचा व त्यांच्या सत्यशोधकी विचारधारेचा मनावर पगडा बसला. 

प्रश्‍न - डॉक्‍टरी व्यवसायात आल्यानंतर डॉक्‍टरकीचा व्यवसाय सोडून समाजाचे डॉक्‍टर होणे का पसंत केले? 
उत्तर - डॉक्‍टरकीची पदवी घेतल्यानंतर काही वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला. परंतु, लहानपणी झालेल्या चळवळीच्या संस्कारांमुळे मनात सारखे यायचे की फक्त सत्तासंपत्तीच्या मागे लागण्यापेक्षा समाजाच्या उपयोगी पडेल असं काम करावं. त्या वेळी राष्ट्रसेवादलाच्या शाखेत थोरांच्या भेटी व्हायच्या.

नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, भाई वैद्य यासारख्या नेत्यांचा सहवास लाभला. एकदा एसेम म्हणाले, "राष्ट्रसेवादल म्हणजे लोकशाही समाजवादाचे आदर्श नागरिक निर्माण करणारी संस्था आहे.' नकळतपणे सेवादलाची ही व्याख्या जन्मभर निभावण्याची मी मनोमन शपथ घेतली. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय भरभराटीला आलेला असतानाही कामगारांसाठी मोफत वैद्यकीय मदत करण्याचा निर्धार केला. सामाजिक चळवळीत पूर्णवेळ काम सुरू केले. महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना 1971 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत लोकसहभागातूनच चळवळीच काम चालू आहे.

प्रश्‍न - "एक गाव एक पाणवठा'ची चळवळ आपल्याला का करावीशी वाटली? 

उत्तर - 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडलेला होता. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी भरण्यासाठी तासन तास तिष्ठत बसावे लागे. माणसांच्या मनात खोलवर रुजलेली जातीयता समूळ नष्ट करावी, गावातील सवर्ण-दलित यांच्यातील मनोमिलन घडून आणावे व ज्यांच्यापुढे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून गावातून जातीयता हद्दपार करावी या विचाराने ही चळवळ सुरू करण्यात आली. 

प्रश्‍न - तुम्ही राजकारणापासून विरक्ती का घेतली? 

उत्तर - 1962 ते 1970 पर्यंत लौकिक अर्थाने मी राजकारणात सक्रिय होतो. परंतु, समाजवादी पक्षाने आणीबाणीत पक्ष विसर्जित केला. ही ऐतिहासिक चूक समाजवादी मंडळीकडून झाली. अशा प्रकारची चूक डाव्यांनी केली नाही किंवा जनसंघानेदेखील केली नव्हती. असो. आमच्या राजकीय धुरिणांनी मला एकदा बजावले की, समाजकारणाचे जोडे दाराच्या बाहेर ठेवून पक्षीय राजकारणात या. द्विधा मनस्थितीत काम करण्यापेक्षा सामाजिक चळवळीत झोकून देण्याचा मी निर्धार केला.

प्रश्‍न - तुम्ही असंघटित कामगारांसाठी आंदोलने केली. या चळवळीला यश मिळाले, असे वाटते? 

उत्तर - गेली अनेक वर्षे मोर्चे, जेलभरो आंदोलन, पुणे ते दिल्ली मोटारसायकलने महामोर्चा अशी अनेक आंदोलने झाली. त्यांचं फलित म्हणजे सामाजिक सुरक्षा कायदा 2008 मध्ये सरकारने असंघटित वर्गासाठी मंजूर केला.

1969च्या माथाडी कायद्याच्या मॉडेलला आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांनीदेखील "आदर्श प्रारूप' म्हणून मान्यता दिली. अलीकडे केंद्र सरकारने घाईघाईत पेन्शनची योजना मांडली आहे. परंतु, त्याचा भार कामगारांकडूनच लेव्ही वसुलीतून भागवला आहे. तो आम्हाला मान्य नाही. प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाचा कायदा मंजूर करून घेण्यात यश आले. चळवळींच्या माध्यमातून देवदासी प्रथा निर्मूलन कायदा, घरेलू कामगार कायदा इत्यादी कायदे मंजूर करून घेतले. थोड्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे. परंतु सर्व सामाजिक सुरक्षा तरतुदी पदरात पाडून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार रहावे लागणार आहे.

प्रश्‍न - मध्यमवर्गीय लोकांचे चळवळीत काय स्थान आहे? 

उत्तर - मध्यमवर्गीय लोकांचा चळवळीत खूप कमी सहभाग आहे. तो वाढायला हवा. सध्या यातील बरेच जण स्वतःच्या चौकोनी कुटुंबात अडकले आहेत. या वर्गाला नवमध्यमवर्गात जायची घाई आहे. आपल्याला मदत करणाऱ्या कष्टकरी वर्गाची त्याला आठवण राहत नाही. उदा. मोलकरणी, कचरावेचक महिला. त्यांच्यामुळे आपण कामावर, ऑफिसला वेळात जाऊ शकतो, याचा मध्यमवर्गीय मालकीणबाईला विसर पडतो. मोलकरीण आजारी पडली तर तिच्या खाड्याचा हिशोब काटेकोरपणे केला जातो.

प्रश्‍न - चळवळीत येणाऱ्या नवीन कार्यकर्त्याला काय संदेश देणार? 

उत्तर - समर्पित भावनेने चळवळीत आले पाहिजे. शोषितांना न्याय मिळवून देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात आपला आनंद कार्यकर्त्याने शोधला पाहिजे. 

प्रश्‍न - जगभर उजव्या विचारसरणीचे सरकारे सत्तेवर येत आहेत. 

उत्तर - लोकांच्या धार्मिक भावनांना, श्रद्धास्थानांना हात घालून सत्तेवर येणे हा प्रकार जगभर दिसतो. भारतही त्याला अपवाद नाही. त्यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्षता संकल्पनेला धोका पोचू शकतो. विरोधी पक्षाचे अस्तित्वच संपणे व अल्पसंख्याकामध्ये भीतीचे वातावरण असणे या लोकशाहीस हानी पोचवणाऱ्या घटना आहेत. भारतीय संविधानाची मूल्ये रुजविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी परिवर्तनवादी चळवळींनी जनआंदोलन उभारण्याची आवश्‍यकता आहे. 

प्रश्‍न - समाजाचा संसार करताना आपण आपल्या कुटुंबीयावर अन्याय केला का? 

उत्तर - अजिबात नाही. पत्नी राष्ट्रसेवादलाच्या परिवारातून आलेली असल्याने तिच्यामध्ये देखील समाजाप्रती दायित्वाची भावना आहे. लग्नापूर्वीच तिला माझ्या चळवळ्या स्वभावाची, कामाची पूर्णपणे कल्पना होती, नव्हे तिला मी असे काम करणे आवडत असल्यानेच आमचा सुखी संसार झाला. परंतु हे मान्य करावे लागेल की, एकटीनेच कुटुंबाची जबाबदारी पाड पाडली. दोन्ही मुलींना उच्चविद्याभूषित केले. त्यामुळे कायम मी तिचा ऋणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the fight of Unorganized Peoples article by Baba Adhav