मराठी चित्रपटाची पताका अमेरिकेत

अमेरिकेत सुरू केलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) च्या वतीने आणि ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’च्या (पीफ) सहयोगाने कॅलिफोर्नियात २७ व २८ जुलैला मराठी चित्रपट महोत्सव होत आहे. यानिमित्त अभिजित घोलप यांच्याशी अरुण सुर्वे यांनी साधलेला संवाद...
Abhijit Gholap
Abhijit Gholapsakal
Updated on

राष्ट्रीय पुरस्कार विजेते, मराठी चित्रपटनिर्माते अभिजित घोलप यांनी अमेरिकेत सुरू केलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) च्या वतीने आणि ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’च्या (पीफ) सहयोगाने कॅलिफोर्नियात २७ व २८ जुलैला मराठी चित्रपट महोत्सव होत आहे. यानिमित्त अभिजित घोलप यांच्याशी अरुण सुर्वे यांनी साधलेला संवाद...

प्रश्न : अमेरिकेत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्याची गरज का वाटली?

उत्तर : मी पहिला ‘देऊळ’ हा चित्रपट केला आणि त्याला सुवर्णकमळ नॅशनल ॲवॉर्ड  मिळाले. यानिमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला १९५३ मधील ‘श्यामची आई’नंतर पहिल्यांदाच सुवर्णकमळ मिळाले. आपल्याकडे मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. मुंबई, कोल्हापूर आणि पुण्यात चित्रपटसृष्टी बहरत गेली. मात्र अमेरिकेत ५० ते ६० वर्षांपासून जे मराठी कुटुंबीय स्थलांतरित होत आहेत, अशा लोकांची संख्या पाच ते सहा लाखांच्या आसपास आहे. त्यांचे स्वतःचे विषय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे छंद आणि आवडीनिवडी असतात. त्याला अनुसरून आपणही अमेरिकेत मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचार आला. त्यातून त्यांच्या आवडीनिवडी जोपासल्या जातील आणि जास्तीत जास्त लोक मराठी चित्रपटांकडे वळतील. हेच विषय घेऊन इतर देशांमध्येही ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट दाखवता येतील, असा विचार मनात आला. त्यासाठी ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ची स्थापना केली. त्यातून चित्रपटांची निर्मिती, वितरण आणि फिल्म फेस्टिवलचे आयोजन करत आहोत. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या प्रेरणेतून आम्ही अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

अमेरिकेत पहिला महोत्सव आयोजित करताना कोणत्या अडचणी आल्या?

: महोत्सव आयोजित करण्याबाबत कोणकोणत्या गोष्टी लागतात, याची आम्हाला फारशी माहिती नव्हती. त्यासाठी आम्ही ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’चे (पीफ) प्रमुख डॉ. जब्बार पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ‘पीफ’ आणि आमची ‘नाफा'' यांनी पार्टनरशिप केली. त्यामुळे चित्रपट महोत्सव कसा आयोजित करायचा?, कोणकोणते चित्रपट दाखवायचे? नियोजन कसे करायचे? या सर्व गोष्टींची माहिती ‘पीफ’च्या टीमकडून आम्हाला मिळाली. डॉ. पटेल यांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला प्रोत्साहन व मार्गदर्शन केलं. 

महाराष्ट्रातील कलाकारांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिला?

: मराठी कलाकारांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला. डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर, अशोक व निवेदिता सराफ, नाना पाटेकर, महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, सलिल कुलकर्णी, सुबोध भावे, प्रसाद ओक, अश्विनी भावे असे मान्यवर कलाकार सहभागी होत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीची आम्ही अमेरिकेत सुरुवात करतोय. त्यासाठीच हा सगळा प्रयत्न. महाराष्ट्रात आपल्याला लातूर, कोल्हापूर, सोलापूर, कोकण, विदर्भ व मराठवाड्यातील विषयांवर चित्रपट पाहायला मिळतात. पण आता ‘नाफा’च्या माध्यमातून अमेरिकेतील विषयांवरील आणि मराठी भाषेतील चित्रपट सगळ्यांना पाहायला मिळतील. अमेरिकेत आम्ही मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून त्यांचे प्रदर्शन या चित्रपट महोत्सवात २७-२८ जुलैला सॅन होजे कॅलिफोर्नियात होणार आहे.

अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांची या महोत्सवाबाबत काय भावना आहे? बुकिंग कसे केले?

: अमेरिकेतून जवळपास एक हजार लोकांनी नोंदणी केली. मोठा प्रतिसाद आहे. महाराष्ट्रातील १७ नामांकित कलाकार यात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर करणार आहोत. यात महेश मांजरेकर यांचा ‘सलतात रेशीमगाठी’ हा चित्रपट पहिल्यांदाच रिलीज होतोय. मोहन आगाशे यांचा ‘दिठी’ हा चित्रपट तर ‘पिफ’ विजेता ‘स्थळ’ या महोत्सवात वितरित होईल. प्रसाद ओक यांचा मुख्य अभिनय असलेल्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा ट्रेलर महोत्सवात दाखविण्यात येईल. सुबोध भावे यांच्यासोबत त्यांच्या आगामी ‘मानापमान’ चित्रपटाच्या निमित्ताने संवाद आयोजित केला जाईल. मी स्वतः अमेरिकेत निर्मिती केलेल्या ‘पायरव’ आणि ‘निर्माल्य’ या दोन शॉर्ट फिल्मही यामध्ये प्रसारित करणार आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही चित्रपटांची संहिता आणि दिग्दर्शन अमेरिकेतील लोकांनीच केलेले आहे. आम्ही टेक्सास आणि अरायोझोना फिलिप्समध्ये स्टुडिओ सेटअप केला आहे. महोत्सवासाठी Nafafilmfestival.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही नोंदणी केली आहे. 

अमराठी प्रेक्षकही येणार आहेत का?

: अमेरिकेत हॉलीवूड असल्यामुळे फिल्म एज्युकेशन मिळत आहे. तसेच न्यूयॉर्क व कॅलिफोर्नियामध्ये फिल्म एज्युकेशन्सचे कॉलेजेस आणि स्कूलमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. मराठी चित्रपटांना आम्ही इंग्लिश सब टायटल दिले आहे.

या महोत्सवाचे वेगळेपण काय? वेगळी कुठली कल्पना राबवली आहे का?

: चित्रपट दाखविण्याबरोबर आम्ही येथे मास्टर क्लासेसही घेत आहोत. महाराष्ट्रातून  येणारे कलाकार एक-एक तासाचे वर्कशॉपही येथे घेणार आहेत. दिलीप प्रभावळकर अभिनयाबद्दल बोलणार आहेत. त्याचप्रमाणे उमेश कुलकर्णी व सलिल कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेतील आगामी प्रोजेक्टसाठी आम्ही ऑडिशन्सही घेणार आहोत. ‘कान’ महोत्सवाप्रमाणेच आम्ही ‘अमेरिकेतील रेड कार्पेट इव्हेंट- फॉर मराठी फिल्म फेस्टिवल’ही घेणार आहोत. यामध्ये सिलिकॉन व्हॅलीतील लोक सहभागी होणार आहेत. त्यांना चित्रपट पाहण्याची व कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे.

या निमित्ताने वर्षभर काही उपक्रम राबविणार आहात का?

: नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या (नाफा) माध्यमातून आम्ही चित्रपटनिर्मिती, चित्रपटांचे वितरण आणि  फिल्म फेस्टिवलचे आयोजन करणार आहोत. त्यासाठी वर्षभरापासून चित्रपटनिर्मितीच्या कार्यशाळा, टॉक शो, सेमिनार आयोजित केले होते. त्यात सचिन खेडेकर, समीर चौगुले, मृणाल कुलकर्णी, उमेश कुलकर्णी यांनीही सहभाग घेत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com