ईशान्य भारताच्या ‘हार्वर्ड’चा कुलगुरू !

ईशान्य भारतात राष्ट्रवादी विचारांची रुजवण करण्यासाठी अथक परिश्रम करणारे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचे नुकतेच निधन झाले
Former Governor Padmanabha Acharya passed away perugate bhave high school
Former Governor Padmanabha Acharya passed away perugate bhave high schoolSakal

ईशान्य भारतात राष्ट्रवादी विचारांची रुजवण करण्यासाठी अथक परिश्रम करणारे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात पेरुगेट भावेस्कूल येथे गुरुवारी सायंकाळी (ता. ३०) सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त.

- सुधीर जोगळेकर

हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रारंभीच्या कार्यकाळाबद्दल तज्ज्ञांचा असा अभिप्राय होता की, ‘इट हॅड नो मेथड, बट इट वर्क्ड’. ईशान्य भारतात काम करणाऱ्या भय्याजी काणे यांच्यासारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनाबाबत ‘इट हॅड हिडन मेथड, ॲंड इट वर्क्ड, असे म्हणता येईल.

अर्थात ही ‘हिडन मेथड’ ईशान्य भारतात त्याहीआधीपासून काम करीत होती.अनेक स्वयंसेवक त्यात होते. ईशान्य भागाला भारतापासून विलग करण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण केली ती या कार्यकर्त्यांनी.

तुलना करायची नाही, तरीही भय्याजी हे जर ईशान्य भारताच्या ‘हार्वर्ड’वे प्राध्यापक मानले, तर पद्मनाभ आचार्य हे त्याचे ‘कुलगुरू’ मानावे लागतील. त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर हे विचार मनात आले. आचार्य यांनी त्यांनी या भागात राष्ट्रीय एकात्मतेची बिजे पेरली. ईशान्येतील विविध राज्यांचे राज्यपालपद भूषवताना आपल्या कामाचा ठसा उमटवला.

पद्मनाभजी मूळचे उडुपीचे. संघाशी त्यांचा लहानपणापासून संबंध होता. नोकरी-व्यवसायासाठी ते मुंबईत आले. माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजचे कॅंटिन त्यांनी चालवायला घेतले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे ते आकृष्ट झाले.

मुंबई विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या अनेक नव्या उपक्रमांचा प्रारंभ झाला. गुणवंत विद्यार्थीसत्कार, पुस्तकपेढी, रोजगार योजना हे त्यातील काही. यात ‘साहचर्य संध्या’ हा उपक्रम गाजला.

महाविद्यालयांची संमेलने आणि धांगडधिंगा, धुडगूस, मारामाऱ्या हे जणू समीकरण बनते होते. त्याला विधायक, रचनात्मक संमेलनाची दिशा दिली ती या उपक्रमाने. तीन-चार हजार विद्यार्थी चार-पाच तास एका ठिकाणी जमतात, विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र असूनही अमंगल काही घडत नाही, हे त्यांचे मोठे यश होते.

१९६२च्या चिनी आक्रमणाने ईशान्य भारतातील अराष्ट्रीय शक्तींचे जे दर्शन उर्वरित भारताला झाले, त्याने अस्वस्थ झालेल्यांत पद्मनाभजीही होते. तीन- चार कार्यकर्त्यांना घेऊन ते तेथे गेले. ‘इंडियन ॲंड डॉग्ज गो बॅक’ अशी पोस्टर पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले.

यावर फार मूलभूत उपाय योजावे लागतील, हे त्यांना जाणवले. ईशान्य भारतातील तरुण पिढीचे चिन्यांनी पुरते ब्रेनवॉशिंग केलं आहे. उर्वरित भारताशी आपले काहीही नाते नाही, अशी त्यांची भावना बनली आहे, हे त्यांना या प्रवासात उमगले होते.

त्यामुळे या तरुणांना विविध राज्यांत आणावे, आठ पंधरा दिवस त्यांना येथील घरा-घरात ठेवावे, भारतीय कुटुंबांमार्फत त्यांना संस्कृतीपरिचय घडवावा, अशा काही कल्पना त्यांच्या डोक्यात आकार घेत होत्या..

‘मेरा घर भारत देश'' या प्रकल्पाचा त्यातून जन्म झाला. या एका प्रकल्पाने विद्यार्थी परिषदेची सामाजिक-सांस्कृतिक प्रतिमा समाजमनात उंचावली. ईशान्य भारतातील शाळकरी मुलांना मुंबईत आणून काही कुटुंबांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

शालेय, महाविद्यालयीन शिक्षणदेखील त्या त्या कुटुंबात राहून मुले घेत राहिली आणि त्यांना मिळणारी आपुलकीची वागणूक पाहून त्यांच्या पालकांचीही पूर्वग्रहदूषित मने बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली.

राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने परिषदेने टाकलेले हे पाऊल हे पद्मनाभजींची मोठी कामगिरी होती. जनकल्याण समितीमार्फत ते काम आजही जोमाने सुरू आहे. संपर्क, संभाषण, संवाद, संबंध आणि संग्रहातून संघटनेसाठी जन-मन-धन कसे मिळवायचे, हे पद्मनाभजींनी परिषदेतील अनेक पिढ्यांना शिकवले.

परिषदेत विविध कार्यक्रमातून, प्रकल्पांतून चैतन्याचे वादळवारे आणले तेही पद्मनाभजींनी. १९६९ ते १९७३ अशी चार वर्ष त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मला लाभली. ईशान्य भारतातील जनजातींच्या बोलींचा अभ्यास भारतातील विद्यापीठात व्हावा,

त्यांच्यासाठी रोमनऐवजी स्थानिक लिपी उपलब्ध व्हावी यासाठी संशोधनाचा त्यांचा प्रयत्न तेव्हापासूनच राहिला. राणी माँसह दहा जनजाती नेत्यांची चरित्रे त्यांनी ‘ॲकॅडेमी फॉर इंडियन ट्रायबल डायलेक्ट्स’च्या माध्यमातून प्रसिद्ध केली. या जनजातींच्या बोलीमधील म्हणी, लोककथा, कविता यांचेही प्रकाशन त्यांनी घडवून आणले.

भाजपच्या माध्यमातून कार्य

भाजपशी १९८० मध्ये ते जोडले गेले. तेथेही उत्तम काम करीत ते स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचले. १९९१ मध्ये भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली आणि ईशान्य भारताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि नागालँडचे ते प्रभारी झाले. १९९५मध्ये पक्षाचे ते ‘राष्ट्रीय सचिव’ बनले. हळूहळू जबाबदाऱ्या वाढत गेल्या. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये भाजपचे सरकार केंद्रात आले आणि आचार्य यांच्या ईशान्येशी असणाऱ्या संबंधांची योग्य दखल घेतली गेली.

१४ जुलै २०१४ ते १२ डिसेंबर २०१४ असा सहा महिन्यांचा त्रिपुराच्या राज्यपालपदाचा कार्यभार त्यांच्याकडे राहिला. १२ डिसेंबर २०१४ ला त्यांच्यावर आसामच्या राज्यपालपदाची अतिरिक्त धुरा सोपवण्यात आली; परंतु त्रिपुराची सूत्रे १९ मे २०१५ पर्यंत त्यांच्याकडे राहिलीच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्य दौऱ्यावर असताना पद्मनाभजींनी ईशान्य भारतात राबवलेल्या अनेक उपक्रमांची माहिती त्यांना दिली. त्यानंतर २०१७मध्ये अरुणाचल प्रदेशाच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविली गेली.

इतक्या राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारणारे व्यक्तिमत्व एवढेच त्यांचे वेगळेपण नव्हते, तर या कार्यकाळात पार पडलेल्या जबाबदा-या अहवालरुपाने जनतेला सादर करणारा पहिला राज्यपाल अशी त्यांच्या कार्याची नोंद घेतली गेली.

१९३१चा जन्म आणि १० नोव्हेंबर २०२३ ला निधन. तब्बल ९२ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्यातली ७५ वर्षे त्यांनी संघ, परिषद, भाजपा आदी संस्थांमध्ये सक्रिय राहून व्यतीत केली. यथावकाश वयोमानापरत्वे पद्मनाभजी राज्यपालपदावरून निवृत्त झाले खरे;

परंतु वैद्यकीय तपासण्यांच्या निमित्ताने ईशान्य भारतात डॉक्टरांना पाठवणे, शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतून वैद्यकीय पथके घेऊन जाणे, आयएनएफसी, ईश्वरपूरम (पुणे) पासारख्या संस्थांसाठी ईशान्य भारतातून निवडक विद्यार्थी आणणे,

त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, त्या मुलाशी त्यांच्या त्यांच्या भाषेत संवाद साधणे, नागालॅंड-अरुणाचल प्रदेश सरकारांकडून या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे निवृत्तीनंतरही पद्मनाभजी करत राहिले.

१९६५ पासून पद्मनाभजींचा ईशान्य भारताशी जो आत्मीय संबंध राहिला, त्याचीच परिणती या सर्व राज्यांत राष्ट्रवादी विचारांची आणि केंद्रातील मोदी सरकारच्या हातात हात घालून चालणारी सरकारे स्थापन होण्यात झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com