पहिला गिअर! 

ब्रिटीश नंदी
सोमवार, 28 मे 2018

""साहेब, तुस्सी ग्रेट हो! तुमच्यामुळे आज कर्नाटकात हरदणहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी गौडा सत्तेवर आले. विरोधकांची एकी झाली!,'' विनम्रभावाने आम्ही पायतणांना स्पर्श करून म्हणालो. सर्रकन सरकत साहेब गाडी खालून बाहेर आले. ग्रीसचे हात आमच्या अंगरख्याला पुसून हसले. 

आमच्या शिवाजी पार्कावरील साहेबांना गाडीदुरुस्तीतले फार कळते!! पहावे, तेव्हा ते स्टिअरिंग क्‍लच, गिअर, ह्याच भाषेत बोलत असतात. कालदेखील असेच झाले. आम्ही त्यांच्या ग्यारेजमध्ये होतो. गाडीच्या पार खाली गेलेल्या साहेबांच्या पायातली जाडजूड पायताणे तेवढी दिसत होती. पायताणांचा आकार पाहून आम्ही सुरक्षित अंतरावर जाऊन म्हणालो, 

""साहेब, तुस्सी ग्रेट हो! तुमच्यामुळे आज कर्नाटकात हरदणहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी गौडा सत्तेवर आले. विरोधकांची एकी झाली!,'' विनम्रभावाने आम्ही पायतणांना स्पर्श करून म्हणालो. सर्रकन सरकत साहेब गाडी खालून बाहेर आले. ग्रीसचे हात आमच्या अंगरख्याला पुसून हसले. 

""आम्ही पहिला गिअर टाकला, आणि हे सारं इथवर येऊन पोचलं...बरं!,'" डाव्या हातानं गिअर टाकल्याची ऍक्‍शन करत साहेब म्हणाले, आणि आम्हाला...खरे सांगतो...गदगदून आले... 

""अंहं...तुम्ही पहिला गिअर टाकलात, म्हणून हे सारं इथवर पोचलं!,'' विनम्रतेने आम्ही "आणि'च्या जागी "म्हणून' हा शब्द टाकून किमया साधली. (शब्दांशी खेळावे तर आम्हीच हं!) साहेबांनी आमच्याकडे कौतुकाने पाहियले. कुडी (आमची हं!) धन्य जाहली. ज्याचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे. 

गाडी चालू करणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे. कुणीतरी ष्टार्टर मारावा लागतो. कुणीतरी तेलपाणीहवा चेक करावी लागते. कुणीतरी पंक्‍चर काढावे लागते. कुणीतरी गिअर टाकावाच लागतो. आणि ते "कुणीतरी' आपले माणूस असेल तर क्‍या कहने!! इथे तर साक्षात आमचे लाडके साहेब होते. 

देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, हे उघड आहे. इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईने "आ' वासला आहे. गरिबाला आज मरावे की उद्या, ह्याची भ्रांत पडली आहे. अशा परिस्थितीत साऱ्यांनी एकत्र येऊन केंद्रस्थानी याने की सांबाच्या पिंडीवर बसलेल्या वृश्‍चिकास खेचून काढण्याची गरज होती. 

सांबाच्या पिंडीतें बससी अधिष्ठून वृश्‍चिका आज 
परि तो आश्रय सुटतां खेटर उतरील रे तुझा माज.... 

....साहेबांनी नकळत आर्या गुणगुणली. आम्ही क्षणभर आर्येत रमलो. किती सुंदर आर्या!! सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाला अभय असते ते पवित्र स्थळाचे. तेथून तो हलला की लोकशाहीरूपी खेटराने...जाऊ दे. 

"बाबांनो, सगळ्यांनी एकत्र या, ही वेळ आपसांत भांडण्याची नाही, एकत्र या, आणि ही जुलमी सत्तेला उलथून लावा' असे आवाहन आमच्या साहेबांनी साऱ्या विरोधकांना केले. नव्हे, तसा आदेशच काढला. तेव्हापासून सूत्रे खऱ्या अर्थाने हलली. त्याचे फळ आपण कर्नाटकात आज पाहातो आहोत. शिवाजी पार्कावर बसून बसल्या बैठकीला कर्नाटकाचा दक्षिण दिग्विजय गाजवणारे आमचे साहेब...म्हंजे एकमेवाद्वितीयम! स्वत: बंगळुरास गेले नाहीत, पण साऱ्यांना तेथले तिकीट काढायला लावलेन!! आहे अशी कोणाची बिशाद? आहे अशी कोणाची ताकद? आहे अशी कोणाची किमया? नाही, नाही, नाही!! 

वेळप्रसंग पाहून दूरदृष्टीने साहेबांनी "एकत्र या' असे सांगितले, हाच तो पहिला गिअर!! साहेब नसते, तर हे झाले नसते!! 

केंद्रातील भ्रष्ट-दुष्ट-नष्ट सरकार खाली खेचण्यासाठी बंगळुरात सारे विरोधक एका मांडवात जमा झाल्याचे पाहिल्यापासून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हे आक्रित कसे घडले? त्याचे एकच उत्तर- साहेबांमुळेच! म्हणून (खरे सांगतो,) गदगदून आले... 

""तुम्ही आहात, म्हणून लोकशाही वाचली हं! अन्यथा अनर्थ झाला असता...फ्रांफ्य्रुक ख्रींक फॉश!,'' आम्ही म्हणालो. साहेब प्राणांतिक दचकले. त्यांची चूक नव्हती. वाक्‍याच्या एंडिंगला आम्ही टावेलात नाक शिंकरले, त्याचा आवाज अंमळ मोठा आला. साहेबांनी मळमळल्यासारखा चेहरा केलान. माशी वारल्यासारखे हातवारे करुन ते एवढेच म्हणाले, "" शी:!'' 

एवढे बोलून ते पुन्हा दुरुस्तीसाठी गाडीच्या खाली अदृश्‍य झाले. म्हटले ना, आमच्या साहेबांना गाडीतले फार कळते...इत्यलम. 

Web Title: frist gear (dhing tang news)