आदरांजलीचे सुरेल माध्यम

गंधार संगोराम
Saturday, 23 February 2019

खरंतर मला पाश्‍चात्त्य शास्त्रीय संगीताची आवड खूप उशिरा लागली. जसं ऐकू लागलो तसं कळत गेलं, की भावनांचे अंतरंग तेच, भावना त्याच, पण त्या वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या वाद्यांतून कशा निर्माण करता येतात, हे या संगीतात कळतं. मग जाणीवपूर्वक आणि बारकाईनं ऐकू लागलो. मोझार्ट, बिथोवन, बाक, शुबर्ट, शॉपॅन, विवाल्डी यांचं संगीत कमालीचं आवडू लागलं. त्यातून मग पाश्‍चात्त्य संगीतातले वेगवेगळे संगीतप्रकार काय असतात, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मोझार्टचा ‘मूनलाइट सोनाटा’, बिथोवनचे ‘फ्युर एलिस’ किंवा यांसारख्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून कुठे तरी ऐकत आलो आहोत.

खरंतर मला पाश्‍चात्त्य शास्त्रीय संगीताची आवड खूप उशिरा लागली. जसं ऐकू लागलो तसं कळत गेलं, की भावनांचे अंतरंग तेच, भावना त्याच, पण त्या वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या वाद्यांतून कशा निर्माण करता येतात, हे या संगीतात कळतं. मग जाणीवपूर्वक आणि बारकाईनं ऐकू लागलो. मोझार्ट, बिथोवन, बाक, शुबर्ट, शॉपॅन, विवाल्डी यांचं संगीत कमालीचं आवडू लागलं. त्यातून मग पाश्‍चात्त्य संगीतातले वेगवेगळे संगीतप्रकार काय असतात, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मोझार्टचा ‘मूनलाइट सोनाटा’, बिथोवनचे ‘फ्युर एलिस’ किंवा यांसारख्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून कुठे तरी ऐकत आलो आहोत. रिव्हर्स हॉर्न म्हणून किंवा लिफ्टचं संगीत म्हणून ते आपल्या जगण्याचा भाग बनून गेले आहेत. पण एका संगीतप्रकाराकडे माझं विशेषत्वानं लक्ष गेलं. त्याविषयी सांगावं असं आवर्जून वाटतं. हा वेगळा संगीतप्रकार म्हणजे रिक्विम.

रिक्विम म्हणजे रूढार्थाने ख्रिस्ती समाजात अंत्यसंस्कारामधील एक भाग. खरंतर रिक्विम हे त्या संस्काराला दिलेलं नाव आहे; पण पाश्‍चात्त्य शास्त्रीय संगीतात काही दिग्गज संगीतकारांनी त्याला संगीतबद्ध करून गाण्याचं स्वरूप दिलं. त्यातलं सर्वांत महत्त्वाचं नाव आहे मोझार्ट. मोझार्ट अतिशय चंचल आणि दिलखुलास होता असं म्हणतात. मोझार्ट ३५व्या वर्षी गेला; पण आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यानं प्रगल्भ असं काम केलं. आयुष्यातली बरीच वर्षे हलाखीच्या परिस्थितीत काढल्यानंतर त्याला आर्थिक सुबत्ता मिळाली. पण तीसुद्धा फार काळ टिकली नाही. मृत्यूपूर्वी मोझार्टने स्वतःसाठी रिक्विम लिहायला सुरवात केली. त्यापूर्वी संगीतकारांनी रिक्विम लिहिण्याचे संदर्भ इतिहासात सापडतात; पण स्वतःच्या मृत्यूनंतर स्वतःच रचलेला रिक्विम सादर केला जावा, अशी मोझार्टची इच्छा होती. संगीत हे भावनांचं वाहन आहे, असं म्हणतात. आपण सर्व भावना या संगीतातून निश्‍चितपणे लोकांपर्यंत पोचवू शकतो, याची मोझार्टला खात्री होती. मग त्याला मृत्यू हा का अपवाद असावा? दुर्दैवानं रिक्विम अर्धवट राहिली आणि मोझार्ट गेला. मोझार्टच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यानं हा रिक्विम पूर्ण केला असं म्हणतात व तो आजही आपल्याला ऐकायला मिळतो.
भारतीय संगीतात व परंपरेत निधनानंतर अभिजात दर्जाचं संगीत सादर केलं जात असल्याची नोंद फारशी दिसत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रात अंत्ययात्रेत भजन सादर केल्याच्या नोंदी सापडतात; पण त्या व्यतिरिक्त मृतदेहासमोर संगीत सादर केल्याच्या फार नोंदी नाहीत. मृत्यू हा अटळ असतो. निधन झालेल्या व्यक्तीला आदरांजली म्हणून संगीत सादर करावेसं वाटणं हे खरंतर किती स्वाभाविक आहे! सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ते संगीत शोक निर्माण करणारं असावं, असाही खरंतर हट्ट असण्याचं काहीच कारण नाही. रिक्विम हा गेलेल्या व्यक्तीबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करणारा संगीतप्रकार आहे. तो आनंदीही असू शकतो, कारण गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या आणि आनंदी आठवणी जतन करायचा तो एक प्रयत्न असतो. व्यक्ती गेल्यानंतर शोक व्यक्त करण्याच्या अनेक तऱ्हा असू शकतात, पण संगीतातून आदरांजली वाहणं ही खरंतर कलेची आणि संगीताची ताकद आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर काहीच दिवसांत आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अर्ध्य’ नावाचा संगीत महोत्सव आयोजित केला होता. भीमसेनजींना संगीतातून आदरांजली वाहण्याचा हा एक अनोखा प्रयत्न होता. भारतीय अभिजात संगीतातील सर्व दिग्गज या महोत्सवात आपले संगीत सादर करण्यासाठी हजर होते. त्या संगीतातून भीमसेनजींबद्दलचे प्रेम व आदर व्यक्त झाला. प्रत्येक श्रोत्याच्या मनात भीमसेनजींबद्दल प्रेम आणि त्याच वेळी ते आपल्यात नसल्याचे दुःख व्यक्त होत होतं. पण तिथं सादर केलेलं संगीत हे आनंददायी आणि हृदयस्पर्शी असं होतं.

जगातल्या सर्व संगीतामध्ये भावना सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. अगदी शास्त्रीय संगीतामध्ये देखील भावनिर्मिती अग्रगण्य मानली जाते. संगीतकाराला तटस्थपणं जगाकडे बघावं लागतं, तरीही प्रत्येक भावनेचे पदर त्याला समजून घ्यावे लागतात. जन्म आणि मृत्यू हे मनुष्याच्या हातात नसतात. जगभरात जन्म आणि मृत्यू याविषयी अनेक कलाकारांनी आपल्या कलेतून मते मांडली आहेत. पेंटिंग्समध्ये तर असे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. पण संगीतात असे संदर्भ क्वचितच सापडतात. स्वतःच्या मृत्यूकडे तटस्थपणे बघू शकणाऱ्या आणि तरीही स्वतःच्या मृत्यूनंतर स्वतःच रचलेला रिक्विम सादर केला जावा, अशी इच्छा असणाऱ्या मोझार्टसारखे संगीतकार पुन्हा जन्माला येतील काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gandhar sangoram write youthtalk article in editorial